ताज्याघडामोडी

समाधान आवताडेंच्या संघर्षाला यंदा मिळणार परिचारकांची साथ ?

२००७ मध्ये झालेल्या विधानसभा व लोकसभा मतदार संघ पुनर्र्चनेनंतर पूर्वीचा स्वतंत्र असलेला मंगळवेढा मतदार संघ पंढरपूर विधानसभा मतदार संघात विलीन करण्यात आला.मात्र मंगळवेढा तालुक्यातील जनतेने फारसा विरोध न करता हा अन्याय सहजपणे स्वीकारला.यापूर्वीच्या मंगळवेढा मतदार संघाचा राजकीय इतिहास पहिला तर १९९० पासून मूळचे अक्कलकोट तालुक्यातील असेलल्या लक्ष्मण ढोबळे यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. मंगळवेढा तालुका हा शरद पवार यांच्यावर नितांत श्रद्धा असलेला तालुका असल्याने त्यांनी शरद पवार यांनी दिलेला उमेदवार म्हणून लक्ष्मण ढोबळे यांना स्वीकारले. केवळ आपल्या वक्तृत्व शैलीमुळे शरद पवार यांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी ठरलेले ढोबळे हे शरद पवार यांच्या कृपादृष्टीमुळे या तालुक्याचे आमदार झाले. हा मतदार संघ अनुसचीत जातीसाठी राखीव असल्याने येथील जनतेलाही पर्यायी प्रभावशाली उमेदवार नसल्याने ढोबळे याना समर्थन देणे भाग पडले.मात्र तरीही मंगळवेढा तालुक्यात स्व.किसनलाल मर्दा आणि स्व. शहा यांचेच राजकीय वर्चस्व होते.या दोन नेत्यांपैकी एक नेता ज्या उमेदवाराच्या मागे राहील त्याच्या विरोधातील उमेदवारास शहा गट बळ देत आला होता आणि आमदारकी राखीव असल्याने या तालुक्यातील जनता या दोन नेत्यांच्या भूमिकेवर आपली भूमिका निश्चित करीत आली होती.
  स्व.कि.रा. मर्दा यांनी याच काळात या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दामाजी साखर कारखान्याची उभारणी केली खरी पण नदीकाठचा भाग वगळला तर संपूर्ण तालुक्यात असलेली सिंचनाची वानवा यामुळे हा कारखाना चालला तो रडतखतडतच. सोलापूर जिल्हयात उजनी व भाटघर कॅनॉलचे जाळे पसरले जात असताना या तालुक्यावर अन्याय होत होता पण या तालुक्यातील जनतेने शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवत आपली राजकीय भूमिका पार पाडली होती. याच तालुक्याचा विधानसभेसाठी उमेदवार ठरवताना शरद पवार यांनी अचानकपणे तालुक्यात नावही माहित नसलेल्या व सांगोला तालुकयातील डॉ. राम साळे यांना उमेदवारी दिली. अन या तालुक्यातील जनतेने शरद पवार यांनी दिलेला उमेदवार म्हणून विरोध न करता साळेना विजयी केले.ढोबळेंना उमेदवारी का नाकारली हा प्रश्नही कधी येथील जनतेने विचारला नाही पण एवढा विश्वास पवार यांच्यावर असताना देखील या तालुक्यातील जनता आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित होती. पुढे हा मतदार संघ पंढरपूरला जोडला गेला आणि शरद पवार यांनी राखीव झालेल्या मोहोळ मतदार संघातून शरद पवार यांनी ढोबळेंना उमेदवारी देत आमदार व पुढे मंत्री केले पण पाणी पुरवठा मंत्री असलेल्या ढोबळेंनी ज्या तालुक्याचे आपण यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे त्या मंगळवेढा मतदार संघाकडे दुर्लक्ष केले आणि या तालुक्यात सिंचनासाठी काय तर पिण्याच्या पाण्यासाठी तळमळणारी गावे शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी विरोधात गेली.याचीच परिणीती म्हणून आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवणारा आपला हक्काचा आमदार असला पाहिजे हि भावना या तालुक्यात वाढीला लागली.याच दरम्यानकि.रा. मर्दा आणि रत्नचंद शहा यांचे निधन झाले आणि मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली होती.डॉ. राम साळे हे नाममात्र आमदार असल्याने या तालुक्याचे प्रश्न प्रलंबितच होते.अर्थात याच कालावधीत चरणु पाटील हे दामाजी कारखान्याचे चेअरमन होते पण त्यांना तालुक्याचा नेता होण्याची संधी होती पण ती त्यांनी गमावल्याचे या तालुक्याने पहिले आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या तालुकयातील जनतेने शरद पवार याना विरोध म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांना पराभूत करण्यात मोठा वाटा उचलला पण या निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या या जागेसाठी मैदानात उतरण्यास कुणीही प्रबळ दावेदार नव्हता.आ. भालकेंना याचाच फायदा झाला आणि ३५ गावचा पाणीप्रश्न हा अजेंडा करीत स्व.आमदार भालकेंनी बाजी मारली.मात्र याच काळात आपल्या तालुक्यातील आपले प्रश्न समजून घेणारा भूमिपुत्र आमदार असला पाहिजे हि भावना या तालुक्यात वाढीस लागली आणि त्याचीच परिणीती म्हणून २०१४ ला भूमिपुत्र म्हणून समाधान आवताडे हे मैदानात उतरले पण नवखे असलेल्या समाधान आवताडेंना हि निवडणूक जड गेली. पंढरपूर शहर व २२ गावात त्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही आणि आवताडे पराभूत झाले तरीही त्यावेळी त्यांना मंगळवेढा तालुक्याने भरभरून मते देत परिचारकांना तिसऱ्या स्थानावर लोटत दुसऱ्या क्रमांकाची मते दिली.या निवडणुकीनंतर समाधान आवताडे यांनी आपली राजकीय वाटचाल अतिशय जोमाने सुरु ठेवत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत यश संपादन करीत आपला प्रभाव दाखवून दिला होता.
      पुढे २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आपले वर्चस्व सिद्ध केले होते मात्र याच दरम्यान समाधान आवताडे हे पंढरपूर शहर व तालुक्यातील २२ गावच्या राजकीय घडामोडीपासून अलिप्त असल्याचे दिसून आले.पंढरपूर शहर व तालुकयातील ज्या मतदारांनी समाधान आवताडे यांच्याकडे एक सक्षम तिसरा पर्याय म्हणून पहिले होते त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत त्यांना अशा विचारांच्या मतदारांनी मतेही दिली. परिचारिकांच्या २५ वर्षाच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेत निर्माण झालेली अँटीइंक्बन्सीचा फायदा एक लोकाभिमुख नेतृत्व व सक्षम पर्याय म्हणून पुढे आलेल्या आ. भारत भालके यांना २००९ च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करीत जनतेने आमदार केले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे हे तिसरा पर्याय म्हणून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता समाधान आवताडे पराभूत झाले पण मंगळवेढा तालुक्यातील जनतेने त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते दिली.प्रचंड लोकसंपर्क असलेल्या,मंगळवेढा तालुक्यात सर्वसामान्य जनतेच्या थेट संर्पकात राहणार आमदार अशी प्रतिमा असलेल्या आ.भारत भालके यांना मंगळवेढा तालुक्यात त्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने आव्हान दिले ते समाधान आवताडे यांनीच.अतिशय शिस्तबद्ध यंत्रणा,यापूर्वीच्या पाच विधानसभा निवडणुका लढविल्याचा अनुभव,साखर कारखाने,बँका, विविध शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून २०१४ च्या निवडणुकीत आ.प्रशांत परिचारक यांच्या विजयासाठी मोठी व्युव्हरचना मंगळवेढा शहर व तालुक्यात परिचारकांनी केली होती तरीही समाधान आवताडे यांनी त्याहीवेळी एकाकी झुंज देत परिचारकांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात आपणही कुठे कमी नाही हे दाखवून दिले होते. या निवडणुकीत समाधान आवताडे पराभूत झाले पण राज्यात शिवसेनेची सत्ता आली.समाधान आवताडे हे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या मध्यमातून आपल्या मतदार संघातील अनेक प्रश्नांना वाचा फोडू शकत होते. सत्तेतील सेनेच्या माध्यमातून आपले राजकीय वजन आणखी वाढवू शकत होते पण त्यांनी अलिप्तता वाद स्वीकारला आणि ते पंढरपूरच्या राजकीय पटलावरून अदृश्य झाले.त्याच्या व्यवसायाचा व्याप खूप मोठा आहे हे जनता जाणून होती.पण तरीही जेव्हा पंढरपुर तालुका पंचायत समिती गणाची,जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली तेव्हा या तालुक्यातील प्रस्थापित दोन्ही राजकीय गटावर नाराज असलेले अनेकजण समाधान आवताडे यांच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले होते.पण अवताडे यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असलेल्या या लोकांचा काहीसा भ्रम निरास झाला.पंढरपूर शहरातील परिस्थीही यापेक्षा वेगळी नव्हती. २०१६ मध्ये ज्यावेळी पंढरपूर नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली त्यावेळी आ. भालके समर्थित तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि परिचारक समर्थित पंढरपूर- मंगळवेढा विकास आघाडी नगर पालिका निवडणूक लढविण्यास सज्ज झाली.यावेळीही या शहरातील तिसऱ्या पर्यायाचा विचार करणाऱ्या अनेक प्रबळ आणि प्रमुख कार्यकर्त्यांनीं समाधान आवताडे यांना हि निवडणूक लढवावी अशी गळ घातली पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने या दोन्ही प्रस्थापित गटांवर नाराज असलेले हि मंडळी अपक्ष म्हणून एकाकी लढत देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरली होती.त्यावेळी समाधान आवताडे यांनी अशा लोकांच्या मागे आपली थोडी जरी ताकत लावली असती तरी आज पंढरपूर नगर पालिकेत आवताडे गटाचा शिरकाव झाला असता असे  ठामपणे वाटते.शिवसेनेस हाताशी धरून आवतडेंनी हि निवडणूक लढवावी यासाठी त्यावेळी अनेकांनी प्रयत्न केले पण प्रतिसाद न मिळाल्याने तेही नाराज झाले.
मंगळवेढा नगर पालिका,मंगळवेढा पंचायत समिती आणि मंगळवेढा तालुक्यात पार पडलेल्या अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समाधान आवताडे यांनी आपला प्रभाव दाखवून दिला होता मात्र पंढरपूर शहर आणि तालुक्यात त्यांना पुन्हा पहिलीपासून सुरुवात करावी लागली.आणि हीच बाब समाधान आवताडे यांच्यासाठी पंढरपूर शहर व २२ गावात मायनस पाईंट ठरली.या तालुक्यातील दोन्ही प्रास्थापित गटाविरोधात शड्डू ठोकणाऱ्यांना वेळीच आवताडे यांचे पाठबळ मिळाले असते तर हि तिसरी शक्ती या विधानसभा निवडणुकीत नक्कीच महत्वपूर्ण ठरली असती अशी भावना हेच लोक आजही व्यक्त करताना दिसून येतात. आणि खऱ्या अर्थाने याचा फटका पंढरपूर शहर व २२ गावात समाधान आवताडे यांना या निवडणुकीत बसला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पण तरीही या निवडणुकीत स्व.सुधाकरपंत परिचारक यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले गेले आणि परिचारक समर्थकांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.अपराजित नेता म्हणून ओळखले गेलेले सुधाकरपंत परिचारक यांच्या विजयासाठी कुठलीही कसर ठेवली गेली नाही.२०१४ च्या निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यात आपण बॅकफूटवर आहोत हे ओळखून युटोपियन कारखाना,जिल्हा दूध संघ,विविध संस्था यांच्या माध्यमातून परिचारकांनी मंगळवेढा तालुक्यात आपले राजकीय बस्तान बसवायला प्रभावी पणे सुरुवात केली होती.मंगळवेढा तालुक्यात आपण मागे पडतोय हे ओळखून परिचारकांनी यावेळी मोठी ताकत या तालुक्यात लावली होती.राहुल शहा यांच्यासह अनेक नेते परिचारिकांच्या गोटात सहभागी झाले होते. अनेक नगरसेवक सहभागी झाले होते.मंगळवेढा तालुक्यात मोहिते पाटील समर्थक गट प्रभावशाली आहे अशी चर्चा होतीच तोही गट या निवडणुकीत स्व. सुधाकरपंत परिचारकांच्या प्रचारात सक्रिय झाला होता. मात्र सारे राजकीय डावपेच बाजूला सारत २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरलेल्या समाधान आवताडे यांच्यासमोर दुहेरी आणि प्रबळ आव्हान होते.एकीकडे दहा वर्षे आमदार म्हणून प्रचंड जनसंर्पक निर्माण केलेले स्व. भारत भालेक तर दुसरीकडे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा- शिवसेना यांच्यासह मित्रपक्षाचे समर्थन मिळालेले स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्याशी त्याची टक्कर होती तरीही त्यांनी या दोन्ही प्रबळ शक्तींना मागे सारत मंगळवेढा तालुक्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसून आले आहे.
आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे हे पुन्हा मैदानात असणार आहेत पण यावेळी राजकीय चित्र मात्र वेगळे असेल अशी अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.राज्यात महाविकास आघाडी विरोधात वातावरण निर्मिती करण्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे २० वर्षाचे वर्चस्व संपुष्ठात आणण्यात महाविकास आघाडीस यश मिळाले होते त्यामुळे भाजपा पश्चिम महाराष्ट्रात बॅकफूटवर गेल्याची चर्चा झाली.आता विधानसभा पोटनिवडणुकीत विजय संपादन करून भाजपचा प्रभाव सिद्ध करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाले असल्याचे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चिले जात आहे.या मतदार संघात मागील दोन निवडणुकीचा अभ्यास केला असता आवताडे आणि परिचारक यांच्यातील मतविभागणीचा फायदा स्व.आ.भालकेंना झाल्याचा निष्कर्ष काढत आ.प्रशांत परिचारक यांची विधानपरिषदेची मुदत आणखी जवळपास १ वर्षे शिल्लक आहे त्यामुळे त्यांना थांबवून भाजपकडून समाधान आवताडे यांनाच उमेदवारी दिली जाईल आणि परिचारक आणि सर्मथक यांनी या विजयात हातभार लावल्यास त्यांनाही पुढे योग्य संधी दिली जाईल असा तोडगा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काढल्याची चर्चा आहे.आज शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस या बाबत मुंबईत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात घडत असलेल्या घडामोडींकडे पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील परिचारक आणि आवताडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

20 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

20 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago