पारंपरिक कट्टर प्रवाहाच्या राजकरणात भगिरथ भालकेंना विठ्ठल परिवारातील दुहीचा फटका बसणार ?

राष्ट्रवादी कॉग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार,शिवसेनेची भूमिका काय राहणार ?समाधान आवताडे कुठल्या पक्षाकडून लढणार ? परिचारक परिवारातील कोण उमेदवार असणार आणि धनगर समाजाच्या सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल कुठला पक्ष घेणार असे अनेक प्रश्न पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होताना दिसून येत असतानाच या विधानसभा निवडणुकीत गेल्या चाळीस वर्षाच्या पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात निर्माण झालेले दोन कट्टर परस्पर विरोधी प्रवाहच पुन्हा एकदा महत्वपूर्ण ठरणार असल्याचेच चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहे.मात्र या साऱ्या घडामोडी घडत असतानाच विठ्ठल परिवारात मात्र मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहॆ.विठ्ठल परिवारातील या नाराजी नाट्यामागे भूतकाळातील अनेक संदर्भ असले तरी तूर्तास तरी ऍडव्होकेट दीपक पवार यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षपदावरून केलेली हकालपट्टी हेच कारण पुढे करीत परिवारातील दुसरे जेष्ठ नेते युवराज पाटील आणि स्व.राजूबापू पाटील यांचे पुत्र म्हणून ऍड.गणेश पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना असो अथवा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी,थेट आक्रमक भूमिका घेतल्याने विठ्ठल परिवारात पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे.दीपक पवार यांची पदावरून झालेली उचलबांगडी रुचली नसल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा गट नाराज असून या गटाचे नेतृत्व युवराज पाटील हे करताना दिसून येत आहेत.याचीच परिणीती म्हणून युवराज पाटील यांनी नुकतेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक अनियमिततेबाबत थेट साखर आयुक्त यांच्याकडे धाव घेत विस्तीर्ण तक्रार केल्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अर्थकारण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आले,अशातच जीएसटी कार्यालयाने बँकेची खाती सील केली,काही रकमेचा भरणा केल्यानंतर पुन्हा निर्बंध हटवले गेले पण या दरम्यान ‘विठ्ठल’ आर्थिक दैन्यावस्थेची चर्चा व्हायची ती झालीच.पण याच साऱ्या चर्चा होताना विठ्ठल कारखान्याशी निगडित नसलेला,गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात पारंपरिक परिचारक विरोधक म्हणून राजकरणात वावरत असलेला,स्व.भारत भालके हे आमदार झाल्याने २५ वर्षे हुलकावणी देत असलेली आमदारकी पदरात पडली म्हणून निर्धास्त झालेला जो कार्यकर्ता आणि मतदार होता तो कुठे तरी अस्वस्थ होताना दिसून आला.’विठ्ठल’च्या अर्थकारणाची चर्चा पुढील विधानसभा पोटनिवडणुकीवर किती प्रभाव टाकणार याचा कानोसा घेऊ लागला.आणि याचे खरे कारण म्हणजे गेल्या चार दशकात पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात निर्माण झालेले दोन प्रवाह.एक परिचारक समर्थक आणि दुसरा परिचारक विरोधक.

     गेल्या ३५ वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अभ्यास केला तर परिचारक गटाने पांडुरंग सहकारी साखर कारखाना,भीमा सहकारी साखर कारखाना,जिल्हा बँक,कृषी उत्पन्न बाजार समिती,तालुक्यातील बहुतांश विकास सोसायट्या,दूध संघ या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणावर पुरती पकड मिळविली होती मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी मात्र त्यांना १९९१ चा अपवाद वगळता सदैव प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता आणि यात खरी प्रभावशाली भूमिका बजावली होती ती कुठल्याही संस्थात्मक व्यवस्थेशी निगडित नसलेल्या  सर्वसामान्य आणि परिचारक यांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराज असलेल्या मतदारांनी परिचारक गटाचा पराभव करेल असा प्रबळ उमेदवार कोण ते लक्षात घेत मतदान केले असल्याचे २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या तिरंगी निवडणुकीत दिसून आले आहे.   

  २००७ ला विधानसभा मतदार संघाची पुनर्र्चना झाली.संपूर्ण मंगळवेढा शहर व तालुका तर पंढरपूर शहर व २२ गावे या मतदार संघात समाविष्ट झाली आणि पंढरपूर तालुक्याच्या पारंपरिक दोन प्रवाहाच्या राजकरणाला आव्हान दिले गेले.२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन वर्षे स्व.भारत भालके आणि पुतणे व्यंकटराव भालके यांनी मंगळवेढा शहर आणि तालुका पिंजून काढल्यामुळे,प्रचंड लोकसंपर्क निर्माण केल्यामूळे आकस्मात राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या माजी खासदार विजयसिह मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला.पण पुढील पाच वर्षात परिचारक गटाने मंगळवेढा तालुक्यातही आपले बस्तान बसविण्यास सुरवात केली खरी पण याच काळात थेट मंगळवेढ्याचे भूमिपुत्र म्हणून पुढे आलेले समाधान अवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील दोन प्रभावी प्रवाहाच्या राजकरणाला आव्हान देत तिसरा पर्याय म्हणून अर्थात तिसरा प्रवाह निर्माण केला.पण तरीही २०१४ च्या निडणुकीच्या निवडणुकीत काट्याची टक्कर झाली आणि स्व.आ.भालकेंनी आ.प्रशांत परिचारक यांचा ९ हजाराच्या आसपास मतांनी पराभव केला.     

२०१४ साली स्व.भारत भालके हे दुसऱ्यांदा आमदार झाले खरे पण याच कालावधीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती हा मुद्दा सातत्याने चर्चेत येऊ लागला.आरोप प्रत्यारोप होऊ लागले.२०१५ मध्ये झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याच्या निवडणुकीत प्रा.बी.पी.रोंगेनी पॅनल देखील उभा केले पण पराभवाची नामुष्की त्यांच्या वाट्यास आली.२५ वर्षे आमदारकी पासून दूर राहिलेला,त्यामूळे ऊस आणि कारखान्याच्या अर्थकारण या या शिवाय इतर शेकडो सामान्य समस्यांनी ग्रस्त असलेले आणि परिचारकांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले ग्रामीण मतदार कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवर होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करताना दिसून आली.        

पण २०१९ सालच्या विठ्ठलच्या गळीत हंगामास ब्रेक लागला,एफआरपीच्या उर्वरित बिलाचा हप्ता लटकला,याच गाळप हंगामाच्या काळात ऊस कुठे पाठवायचा याची चिंता बहुतांश सभासदांना भेडसावली.आणि अशातच विधानसभेच्या निवडणूका लागल्या,यावेळी उमेदवार म्हणून थेट स्व.सुधाकरपंत परिचारक आणि स्व.भारत भालके अशी बहुप्रतीक्षित लढत झाली आणि पुन्हा तालुक्याच्या राजकारणातील दोन प्रवाह इर्षेने लढले.आणि याच दोन प्रवाहाच्या लढतीत समाधान आवताडे हे मंगळवेढ्यात नंबर दोन राहिले असले तरी पंढरपूर तालुक्यात नंबर तीन राहिले.           

नोव्हेंबर २०२० च्या आखेरीस स्व.आमदार भारत भालके यांचे निधन झाले आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडीपासून पुन्हा विट्ठलाच्या विदारक परीस्थितीचे वर्णन करणारे शस्त्र पाजळत युवराज पाटील आक्रमक झाले.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक दैन्यावस्थेबद्दल पुन्हा चर्चा सुरु झाली.विठ्ठल परिवारात पुन्हा सरळ सरळ दोन गट निर्माण झाले.आमदारकी आणि कारखाना हे वेगळे विषय आहेत असे समजणारा एक प्रवाह पुन्हा सक्रिय झाला.विठ्ठल सूतगिरणीच्या निर्मितीतील अपयश,अर्जुन सहकारी बँकेबाबत झालेली गोची,क्षमतेच्या मानाने अतिशय कमी गाळप झाल्यामूळे बसणारा आर्थिक फटका याचे विश्लेषण करणारा वर्ग पुन्हा सक्रिय झाला.आणि त्याला फोडणी मिळाली ती पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या निवडूंकीच्या राजकरणात नगण्य प्रभाव असणाऱ्या दीपक पवार यांच्या काढून घेतलेल्या पदामुळे.अशातच युवराज पाटील यांनी भगीरथ भालके याना राष्ट्रवादीची उमेदवारी कशी मिळते हे पाहतोच असे आव्हान दिल्यामूळे अस्वथता निर्माण झाली ती पंढरपूर शहर आणी २२ गावातील ”परिचारक नको” असा हेका धरलेल्या सामान्य मतदारांमध्ये.आणि त्याचीच परिणीती म्हणून आज राष्ट्रवादीच्या गोटात अंतर्गत कलहाच्या कितीही चर्चा घडत असल्यातरी ” मतदार” सध्या तरी ठाम असल्याचे दिसून येते.आणि पंढरपूर शहर आणि मतदार संघातील २२ गावातील या दोन प्रभावी प्रवाहाच्या ”ईर्षेचा” भगीरथ भालके यांनी ” अभ्यास” केल्यामळेच ते मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील जनसंपर्काकडे अधिक लक्ष देत असल्याची चर्चा आहे.    

  मंगळवेढा तालुक्यात भगीरथ भालके यांना खऱ्या अर्थाने ”तिरंगी” लढतीचा सामना करावा लागणार आहे.स्व.आमदार भारत भालके आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील जनतेचे  गेल्या काही वर्षात विविध प्रश्न आक्रमकपणे मांडले आहेत.मात्र पंढरपूर शहर आणि २२ गावात समाधान आवताडे हे मतदारांच्या गाठीभेटी घेत असले तरी पंढरपूर शहर आणि २२ गावातील जनतेच्या अनेक महत्वपूर्ण प्रश्नासाठी अधिक आक्रमकपणे भूमिका मांडत त्यांना आपला जनाधार वाढवावा लागणार आहे.     

मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनी विधानसभा मतदार संघात ज्या प्रमाणे झंझावाती संपर्क ठेवला होता तसा आक्रमकपणा पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या राजकरणात भगिरथ भालके यांना ठेवण्यास अपयश आले,ते सामान्य कार्यकर्त्याचा फोन देखील उचलत नव्हते अशी टीका होताना दिसून आली पण विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात सारे गिले शिकवे बाजूला सारत अशी नाराज मंडळी पाठीशी राहण्यासाठी भगिरथ भालकेंनी थोडा वेळ काढणे गरजेचे झाले आहे अशीच प्रतिक्रिया काही कट्टर भालके समर्थक खाजगीत व्यक्त करताना दिसून येतात.                             

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

20 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

20 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago