पंढरपूर – “महिला संतांनी निर्माण केलेल्या अभंगाचा समावेश संप्रदायात करून त्यांना सन्मानित करण्याचे महान कार्य वारकरी संप्रदायाने पूर्वीपासूनच केले आहे. वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा न बाळगता विज्ञान आणि सुधारणांना प्राधान्य देणारा आहे. प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी संत साहित्यात मार्ग सापडतो.” असे प्रतिपादन आचार्य शुभम कांडेकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात इतिहास विभागाच्या अंतर्गत सी.पी.ई. व वारकरी अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.
आचार्य शुभम कांडेकर पुढे म्हणाले की, “बाराव्या शतकापासून सामाजिक सलोखा निर्माण करून अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचे कार्य संत साहित्याने केले आहे. मानसिक ताणतणाव यातून मुक्ती मिळविण्यासाठी व मानसिक स्वास्थ्य टिकविण्याचा सल्ला संतानी दिला आहे. विज्ञानाने लावलेले अनेक शोध संतांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये सापडतात. म्हणून संत साहित्य हे विज्ञानाला प्रेरक असे आहे. वारकरी संप्रदाय अखिल मानव जातीच्या हिताचा विचार करते म्हणूनच वैश्विक कुटुंबाची संकल्पना संत साहित्यात सापडते.” अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “संतांचा विचार हा सर्व समावेशक आहे. त्यात त्यांनी विविध प्रकारच्या भेदांना टाळून विश्व बंधुतेची संकल्पना मांडली आहे. पंढरपूर ही देशाची अध्यात्मिक राजधानी असून समाजजीवनात समतेचा संदेश दिला आहे. म्हणून पंढरपूर हे महान क्षेत्र आहे”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ. उमेश साळुंखे यांनी करून दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, रुसा समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, स्वायत्त समन्वयक डॉ. मधुकर जडल, विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक डॉ. सुखदेव शिंदे, महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे समन्वयक डॉ. अमर कांबळे,सी.पी.ई. समन्वयक डॉ. समाधान माने, प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्रा. जालिंदर वाघ, प्रा. बाळासाहेब गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.सुमन केंद्रे यांनी मानले