बँकांकडून सहज कर्ज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने किरकोळ गरजांसाठीही खासगी सावकारांच्या हातापाया पडावे लागते. थेट घरापर्यंत पोहोचणारा गरजू म्हणजे जणू काही सावजच आहे, अशा अविर्भावात काही खासगी सावकार कर्ज पुरवठा करतात. कर्जदाराची जमीन, घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी करतात. विशेष म्हणजे सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून कर्जदारांची लूट केली जाते, त्यामुळे खासगी सावकारांचा पाश दिवसेंदिवस घट्ट होत आहे.अशातच या अवैध सावकारीच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशातून थोडे फार समाजकार्य करत राजकीय पदे पदरात पाडून घेत प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या सावकारा विरोधात तक्रार करण्याचे धाडस लाखाचे बारा लाख व्याज भरून सुद्धा अनेक कर्जदार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत नसल्याने अशा अवैध सावकारांविरोधात कारवाई करणे पोलिसांच्या दृष्टीने कायदेशीर दृष्टया अडचणीचे ठरत असल्याचे दिसून आहे.
कर्ज देण्यासाठीही सावकारांना नियमावली आहे. तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याजाची आकारणी करता येते, तर विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के व्याजाची आकारणी करणे बंधनकारक आहे. मुद्दल रकमेपेक्षा व्याज जास्त घेऊ नये, कोऱ्या स्टॅम्पवर कर्जदाराच्या सह्या घेऊ नयेत, कर्ज वसुलीसाठी दमदाटी करू नये, त्याचबरोबर दर तीन महिन्याला त्याला मुद्दल आणि व्याज वसुलीची पावती द्यावी, अशी नियमावली खासगी सावकारांसाठी बंधनकारक केली आहे. प्रत्यक्षात मात्र विनापरवाना सावकारांचे जिल्ह्यात पेव फुटले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातही गेल्या काही महिन्यात सातत्याने खाजगी अवैध सावकारांविरोधात छोट्या मोठ्या व्यवसायातून गुजराण करणाऱ्या नागिरकांनी पोलीस व सहनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्याचे दिसून येते.मात्र हे प्रमाण पंढरपूर शहर व तालुक्यात चर्चिल्या जणाऱ्या सावकारी त्रासाच्या घटनांच्या प्रमाणात अतिशय नगण्य असल्याचे दिसून येते.या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी सह निबंधक सहकारी संस्था एस.एम. तांदळे यांच्याशी संपर्क केला असता अनोंदणीकृत बेकायदा सावकाराकडून कर्जाऊ रकमा देऊन नियमबाह्य व अव्वाच्या सव्वा व्याज,दंड आकारले जात असेल व त्यासाठी स्थावर व जंगम मालमत्ता बेकायदेशीर रित्या ताब्यात घेणे आदी प्रकार केले जात असतील तात्काळ आमच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
कुठलाही कायदेशी अथवा नोंदणीकृत व्यवसाय नसताना,दृश्य स्वरूपात कुठलाही व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत नसताना,कुठलेही आयटी रिटर्न्स दाखल केले जात नसताना व खाजगी सावकार म्हणून साऱ्या पंचक्रोशीत प्रख्यात असताना देखील कोट्यवधी रुपयांच्या स्थावर मालमत्ताची खरेदी केली जाते परंतु यांच्यावर कारवाई कशी होत नाही असा भाबडा प्रश्न अनेक नागरिकांना पडलेला असल्याचे दिसून येते.अवैध सावकार राज्यभरात धुमाकूळ घालत असून अनेकांना कोरोनामुळे अडचणीत आलेले कर्जदार हे संधी वाटत आहेत आणि त्यांच्या राहत्या घरासह स्थावर व जंगम मालमत्ता घशात घालण्याचा प्रश्न राज्यातील अनेक शहरात होऊ लागल्याचे राज्यभरात दाखल होत असलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे.
अनेक खाजगी सावकारांकडून चेकचा आधार घेऊन केसेस दाखल ?
राष्ट्रीय कुठल्याही बँकेच्या चेकचा अनादर केल्यास निगोशिएबल इंस्ट्रुमेंट ऍक्ट कलम १३३८ नुसार चेक देणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल केला जातो त्या व्यक्तीस सहा महिने ते तीन वर्षे कालावधीचा तुरुंगवास भोगावा लागतो मात्र याच कायद्याचा गैरवापर करून ज्यांचे कागदोपत्री घोषित उत्पन्न वर्षाकाठी तहसीलदारांच्या दाखल्यानुसार लाखभर रुपयाच्या आत आहे,जे कुठलाही इन्कम टॅक्स रिर्टनं भरत नाहीत अशा काही लोकांनी देखील लाखो रुपयांच्या रकमा मित्रप्रेमासाठी हातउसण्या दिल्याचे म्हणणे कोर्टात मांडत चेक बाऊन्सचे एकच नाही तर अनेक खटले दाखल केल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून येईल आणि कायद्याच्या तरतुदीचा सरळ सरळ गैरवापर आहे.राज्यातील सहकार निबंधकांनी स्वतःहून आपल्या कार्यक्षेत्रातील दाखल करण्यात आलेले चेक बाउन्सचे खटले,खटले दाखल करणारे व्यक्ती आणि त्याची वारंवारिता याची संपूर्ण माहिती प्राप्त केली तर फार मोठे जाळे उध्वस्त होणार आहे.