एक आटपाट नगर होते .तेथे एक लेखक राहत होते. लेखक खूप प्रामाणिक होते. अत्यंत गरिबीतून वर आल्यामुळे व सर्व प्रकारचे अनुभव घेतल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत कसदार असे होते . साहित्य निर्मितीचे त्यांचे व्रत त्यांनी मनापासून घेतले होते .इतके सर्व असूनही त्यांना कोणतेही पुरस्कार मिळाले नव्हते. अर्थात साहित्यनिर्मिती हेच त्यांचे ध्येय असल्यामुळे त्यांना पुरस्कार न मिळाल्याचे फारसे दुःख वाटत नव्हते ,तथापि त्यांना पुरस्कार न मिळाल्यामुळे त्यांच्या लेखनाच्या दर्जाबद्दल त्यांच्या इतर साहित्यिक मित्रांकडून त्यांची हेटाळणी होत असे .याचे त्यांना दुःख वाटे. हे इतर साहित्यिक सुमार लेखन करूनही खूप पुरस्कार मिळवते झाले होते. त्यामुळे ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असत व लेखक महाशयांना दुय्यम लेखत असत.त्यामुळे लेखक महाशयांना कुठला तरी पुरस्कार मिळावा असे वारंवार वाटत असे.एकदा लेखक असेच दुःखी बसले असता त्यांना त्यांच्या पत्नीने त्यांच्या दुःखी राहण्याचे कारण विचारले. तेव्हा लेखक महाशयांनी सारा खुलासा केला .त्यावर त्यांच्या पत्नीने आपल्या लेखिका मैत्रिणीने सांगितलेले एक व्रत करायला सांगितले ते खालील प्रमाणे!
वेगवेगळ्या पुरस्कार समित्यावर तेच तेच सदस्य असतात या सर्व सदस्यांची वेळोवेळी पत्राद्वारे वा फोन कॉल द्वारे खुशामत करा व सतत त्यांच्याशी संपर्क ठेवा .साहित्याच्या भल्यासाठी एक साहित्य समिती आहे तिच्याही सर्व सदस्यांशी सतत संपर्क ठेवा .या सर्व सदस्यांनी काही लिखाण केले असेल तर त्याचे परीक्षण करून खोटे खोटे कोडकौतुक करा. त्यांचे लेखन जरी सुमार असले तरी ते लेखन कसे योग्य व सुंदर आहे याचे जड भाषेत परीक्षण करा व ते वेगळ्या वृत्तपत्रांना पाठवा .वृत्तपत्रातही सर्व छापून येण्यासाठी तेथेही आपले संबंध प्रस्थापित करा .वेगवेगळ्या परिसंवादातून आपली उपस्थिती ठेवा व तेथेही समितीच्या सदस्यांचे आपल्या बोलण्यातून कौतुक करा. फक्त वृत्तपत्रातून आपल्या स्वतःविषयीच्या वेगवेगळ्या बातम्या नेहमी कशा येतील हेही पहा. आपले स्वतःचे कौतुक करणारी प्रेस नोट स्वतः तयार करून वृत्तपत्रांना पाठवा .सोशल मीडियावरही आपल्याविषयी प्रसिद्धी कशी होत राहील हे पहा. आपल्याच पुस्तकावर एखादा वाद कसा निर्माण करता येईल हेही पहा ,ज्यायोगे आपल्या एखाद्या पुस्तकाची कुप्रसिद्धी होऊन आपण स्वतः कसे प्रसिद्ध होऊ हेसुद्धा आपल्याला पाहता येईल . व्याख्यानाचे निमंत्रण आल्यास कोठेही जाण्याची तयारी ठेवा .अगदी तेराव्या पासून ते लग्नापर्यंत सर्व ठिकाणी आपली हजेरी लावा .आपल्यासारख्याच स्वार्थी विचाराचे लोक गोळा करा व सगळीकडे दबाव आणण्यासाठी एक लॉबीही तयार करा .साम-दाम-दंड-भेद च्या साह्याने प्रसिद्धी मिळवा .वेळप्रसंगी यासाठी कुणाचीही हुजरेगिरी करावी लागली तरी हरकत नाही .वेगवेगळ्या पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवल्यावर समिती सदस्यांशी संपर्क ठेवा. त्यांना कोणत्याही प्रकारे खुश करा. त्यासाठी परमेश्वराची जशी पूजा करून नैवेद्य दाखवतो ,तसेच सदस्यासाठी करा .वेगवेगळ्या भेटवस्तूंची त्यांच्यावर खैरात करा .एवढे सगळे झाल्यावर पुरस्कार रूपी परमेश्वर आपल्याला प्रसन्न होईल व आपल्यावर कायमची कृपा ठेवेल, पण त्यासाठी हे व्रत सार्या आयुष्यासाठी करावे लागेल. हे सर्व करताना आपल्याला दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी वेळ मिळणार नाही, परंतु त्याची काळजी करावी लागणार नाही. यासाठी पूर्वासुरींचे लिखाण व विदेशी साहित्य वाचण्याची सवय ठेवा ,नंतर त्याचे बिनधास्त अनुवाद करून आपले स्वतःचे लिखाण आहे अशा पद्धतीने प्रसिद्ध करा. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. साहित्य पुरस्काराचे व्रत एकदा घेतले की सोडू नका.
हे सर्व ऐकल्यावर लेखक महाशयाना साक्षात्कार झाला व त्यांनी आपल्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे आपल्या वागण्यास सुरुवात केली .वेळ प्रसंगी त्यांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करण्यास सुरुवात केली, त्यामुळे लेखक महाशयांचे नाव आटपाट नगरात चांगलेच प्रसिद्ध झाले व त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाऊ लागले .त्यांच्या लिखाणाची चर्चा सुरू झाली, यावर परिसंवाद होऊ लागले. टीव्ही चॅनल वर त्यांची मुलाखत होऊ लागली. वेगवेगळ्या साहित्य समित्यावर त्यांची नेमणूक झाली. विभागीय साहित्य संमेलनात त्यांना अध्यक्ष केले गेले व मुख्य साहित्य संमेलनात अध्यक्ष करण्यासाठी चर्चा सुरू झाली. अशा रीतीने लेखक महाशय लेखक राव झाले व त्यांची अभ्यासिका त्यांच्या पुस्तकांनी भरून गेली. त्याचप्रमाणे त्यांचा दिवाणखाना वेगवेगळ्या पुरस्कारांच्या प्रतीकांनी भरून गेला. अशा रीतीने लेखक साहित्यसम्राज्यावर सुखाने राज्य करते झाले .
ही व्रतकथा प्रत्येक साहित्यिकांने खूप वेळा वाचली पाहिजे व त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे, म्हणजे भरपूर पुरस्कार मिळवून त्याचे जीवन कृतार्थ होईल .जे कुणी लेखक या कथेला नावे ठेवतील वा खोटे म्हणतील, त्यांना आयुष्यात कधीही पुरस्कार मिळणार नाही .त्यांना लेखक म्हणूनही मान्यता राहणार नाही .चांगले लिखाण करूनही ते समाजापासून दुर्लक्षित राहतील .त्यांच्यापासून प्रकाशक दूर जातील व वाचक यांच्या पुस्तकाला हात लावणार नाहीत.अशा तर्हेने पुरस्कार व्रताची कथा सगळीकडे वाचली जावयास हवीय, म्हणजे साहित्यिकांचे कल्याण होईल. व्हाट्सअप च्या माध्यमातून ही कथा जर शंभर लोकांना पाठवली तर एक पुरस्कार लगेच मिळून जाईल. त्याचप्रमाणे सतत बारा वर्षे ही कथा वाचल्यास जीवनगौरव पुरस्कार मिळून जाईल .
(कृपया ही कथा काल्पनिक असून सध्याच्या साहित्याशी व साहित्य संस्थांशी तिचा काही संबंध नाही. जर कथेत दिल्याप्रमाणे एखादी घटना खरोखर घडली असेल तर तिचा या कथेशी काही संबंध नसून, तो केवळ योगायोग समजावा ही वाचकांना नम्र विनंती )
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…