पंढरपूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या ‘सृजनरंग नियतकालिक स्पर्धा २०१९-२०’ मध्ये विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांमधून गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इस्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘एक्सप्लोरर’ या वार्षिक नियतकालीकाला प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या व सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वेरीने आपले स्थान कायम राखल्याचे वारंवार दिसून येते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या ‘सृजनरंग नियतकालिक २०१९-२०’ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे तंत्रशिक्षण घेणाऱ्या येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रा यशपाल खेडकर यांनी संपादित केलेल्या ‘एक्सप्लोरर’ या नियतकालिकात साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक,राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील विविध घडामोडींचा आढावा घेतला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विविध प्रकारचे साहित्य या नियतकालिकात आठ विभागात असून चित्रकला, विज्ञान व तंत्रज्ञान, समीक्षा, पत्रलेखन, कथा, कविता, लेख, मुलाखत, शैक्षणिक लेख बरोबर इतर आवश्यक घडामोडींचा उहापोह तसेच गतवर्षीच्या विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील, गेट परीक्षेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना छायाचित्रासह स्थान दिले आहे.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची प्लेसमेंटची आकडेवारी, संशोधन, महाविद्यालयास मिळालेली मानांकने, महत्वाचे कार्यक्रम यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, प्रवेश प्रक्रिया व प्रसिद्धी विभागाचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. यशपाल खेडकर यांनी संपादित केलेले ‘एक्सप्लोरर’ हे नियतकालिक एकूण तीनशे दहा पानी आहे. विद्यार्थी संपादक श्रद्धा रेपाळ, विद्यार्थिनी सहसंपादक गौरी पवार, विद्यार्थी सहसंपादक ज्ञानेश्वर गोयकर तसेच विविध विभागामध्ये प्रा.अर्चना गायकवाड (मराठी विभाग), प्रा.स्नेहल निकम (हिंदी विभाग), प्रा. बी.एस. सवासे (इंग्रजी विभाग), प्रा.डी. टी. काशीद (सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग), प्रा.यशपाल खेडकर (समीक्षा विभाग), प्रा. एच.एम. तांबोळी (पत्रलेखन विभाग), प्रा. महेश यड्रामी (मल्टीलॅंग्वेज), प्रा. गणेश पवार (कलादर्पण विभाग) अशा विविध विभागांनी ‘एक्सप्लोरर’ चे अंतरंग खुलले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये विविध ग्रामीण कथा, निरक्षरांचे मनोगत आणि समाजसेविका सिंधुताई सपकाळ या सारख्या महत्वाच्या लेखांनी या नियतकालिकाचे महत्व वाढले आहे. तसेच या नियतकालिकात खास समीक्षा आणि पत्रलेखन याही विभागांचा समावेश केला गेलेला आहे. एकूणच सर्व अंगानी सजलेले हे नियतकालिक असल्यामुळे परीक्षक व निरीक्षकांच्या दृष्टीने स्वेरीचे ‘एक्सप्लोरर’ सर्वाधिक परिपूर्ण असल्याचे जाणवते म्हणून स्वेरीच्या नियतकालिकाला प्रथम क्रमांकाने गौरविले गेले आहे. स्वेरीच्या या नियतकालीकाला प्रथम क्रमांक मिळाल्याचे पत्र सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांच्या सहीने प्राप्त झाले आहे. प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे ‘एक्सप्लोरर’ नियतकालिकेचे संपादक प्रा. यशपाल खेडकर यांचा पंढरपुरचे तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूर तालुका पोटीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, श्रीराम ताटे, पत्रकार रामचंद्र सरवदे यांच्यासह स्वेरी परिवारातील मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे ‘एक्सप्लोरर’ च्या संपादकीय मंडळाचे संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन केले.