पंढरपूर (संतोष हलकुडे) – ‘वाहतुकीचे नियम पाळताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे अत्यंत गरजेचे आहे. याचा तोटा होणार नाही परंतु फायदा मात्र नक्कीच होतो. ट्राफिक हवालदार दिसल्यानंतर ट्रिपल सीट दुचाकी चालविताना पाठीमागे बसलेला मित्र वाहन थांबविण्यापुर्वीच उडी मारतो. हे देखील एक अपघाताचे कारण आहे. वाहन चालकांनी हे लक्षात ठेवा की कायदा हा दंड वसुलीसाठी नसून तसेच वाहकांना त्रास देण्यासाठी नसून तो नागरिकांमध्ये वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी उचललेले पाऊल आहे. रस्ते वाहतूक अपघात टाळण्यासाठी सर्वात प्रथम मनाला, भावनांना मुरड घातली पाहिजे. तुफान वेगात वाहन चालवण्याच्या आसुरी आनंदापासून दूर राहिले पाहिजे. अपघात होऊ नये यासाठी शासनाने घालून दिलेले नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत. आपली, आपल्या कुटुंबीयांची आणि समाजाची सुरक्षितता आपल्या हातात असल्यामुळे आपण नेहमीच वाहतुकीचे प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.’ असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपागे यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व जिल्हा वाहतूक शाखेचे पो.नि. सूर्यकांत कोकणे व स.पो.नि.प्रवीण संपागे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल, वाहतूक सुरक्षा दल सोलापूर ग्रामीण व स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या ‘३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१’ च्या निमित्ताने स्वेरीच्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘रस्ते सुरक्षा वाहतूक‘ विषयी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे हे बहुमोल मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात प्रा. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगून रस्ते सुरक्षा अभियानाची माहिती दिली. ‘मत करो इतनी मस्ती, जिंदगी नही सस्ती, वेगाने वाहन चालवू नका, मृत्यूस आमंत्रण देऊ नका, हेल्मेट लगाव, जीवन बचाव, जो चुकला नियमाला, तो मुकला जीवनाला, डोके आहे सर्वात नाजूक हेल्मेट लावून व्हा जागरूक, हेल्मेट आयुष्याचा झकास आधार, आयुष्यावर प्रेम करा गाडीच्या वेगावर नको’ असे वाहतुकीसंदर्भात विविध स्लोगन त्यांनी ऐकविले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या ‘व्हिजन’ च्या माध्यमातून भारतभर चार ते आठ पदरी रस्ते तयार करण्याचे काम मोठ्या जोमाने, युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु अपघाताच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण बसेना. त्याचे कारण म्हणजे आपण नियमांचे पालन योग्य प्रकारे करत नाही. आज रस्ते, महामार्ग अपघातात दरवर्षी लाखों नागरिकांचे बळी पडत आहेत. अपघाताच्या माध्यमातून काही वेळा वाहतूकदारांची चूक असते, त्यातून रस्त्याची दुरवस्था हे देखील कारण नागरिक सांगतात. परंतु रस्ता सुरक्षेचे नियम पालन करताना स्वतःची काळजी घेतली तर आपले, आपल्या कुटुंबाची आणि साहजिकच समाजाची काळजी आपण घेवू शकतो. प्रत्येक वाहनधारकांनी सुरक्षेची जाणीव ठेवून वाहन चालविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी आपल्यापासून वाहनाची, अपघात होऊ नये म्हणून नियमांची काळजी घेवूयात.’ असे सांगून त्यांनी वाहतुकीविषयी माहिती दिली. सपोनि प्रवीण संपागे पुढे म्हणाले की, ‘आज केवळ हलगर्जी पणाने वाहने चालवून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यासाठी अपघात होऊ नये म्हणून वाहतुकीचे सर्व नियम पाळा. वाहन चालताना मानसिकता चांगली असावी, स्पर्धेच्या युगात वाहनावर कंट्रोल ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे सांगून अपघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी वाहनामुळे झालेल्या अपघाताची आकडेवारी सादर करताना ‘भारतात वर्षाकाठी सरासरी दीड लाख लोकांचा मृत्यू हा वाहन अपघातामुळे होतो तर साडेचार लाख नागरिक या अपघातामुळे जखमी होतात. यात ही आकडेवारी वाढत आहे. एकूणच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येकाला ‘शॉर्टकट’ पाहिजे असतो. या ‘शॉर्टकट’ च्या नादात आपण हकनाक जीव गमावून बसतो.यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.’ असे सांगून ए.पी.आय. संपागे यांनी वाहतुकीचे नियम स्पष्ट केले. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव साठे, पोलीस कॉस्टेबल चंद्रशेखर भोसले, पोलीस कॉस्टेबल सागर ढोरे-पाटील, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, विभागप्रमुख, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रंगनाथ हरिदास, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा यशपाल खेडकर यांनी केले तर डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी आभार मानले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…