पंढरपूर शहर तालुक्यात भाजपाला येणार ”अधिकृत अच्छे दिन”

पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात भाजपाच्या वाटचालीचा इतिहास उलगडुन पाहिला तर भाजपचे अस्तित्व हे निवडणुकीच्या राजकरणात जरी गेल्या तीस वर्षाच्या वाटचालीत नगण्य ठरले असले तरी पंढरपूर शहराच्या राजकरणात भाजपा आणि त्याचे पदाधिकारी हे कायम आक्रमक राहिल्याने या पक्षाचा दबदबा होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकरणात जरी देशव्यापी व राज्यव्यापी विविध पक्ष कार्यरत असले तरी ”अभ्यासू आणि आक्रमक” पदाधिकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा संख्यात्मक दृष्टया कमी पण प्रभावशाली संच असल्याने भले निवडणुकीच्या राजकरणात कमळ फुलत नसले तरी दबदबा मात्र मोठा राहिला आहे.१९८४ साली पंढरीतील भजनदास चौकातील खिस्ते पैलवान वाड्याच्या वरील छोटीशी खोली हे शहर व तालुका भाजपचे कार्यालय.आजच्या पिढीला कदाचित खरेही वाटणार नाही पण याच ८ बाय १० च्या खोलीत भाजपचे दिग्गज नेते स्व.प्रमोद महाजन,स्व.गोपीनाथ मुंढे,केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,माजी केंद्रीय मंत्री राम नाईक अशा भाजपच्या नेत्यांनी पंडित भोलेचा भत्ता खात पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजपच्या वाटचालीची चर्चा केली आहे.मुक्काम ठोकला आहे.त्याकाळी तालुक्याच्या राजकरणात प्रभावशाली असलेल्या परिचारक आणि पाटील गटामध्ये भाजपाचा फारसा प्रभाव पडणार नाही हे माहिती असताना देखील पक्षाची तत्वे आणी विचार या शहर तालुक्यात रुजले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले आहेत.पंढरपूर लोकसभा मतदार संघातून १९८५ पासून पक्षाचा अधिकृत उमेदवार देत आला असून पराभवाची पर्वा न करता या शहर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे निष्ठेने प्रचार करताना दिसून आले आहेत.
           पुढे राज्यात १९९१ मध्ये भाजपा-सेनेची युती झाली आणि पंढरपूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्यास गेला.आज पंढरपूर नगर पालिकेच्या राजकरणात भालके प्रणित तीर्थक्षेत्र विकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांचे अनेक नगरसेवकही आहेत पण एकही नगरसेवक नसताना पंढरपूर नगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांना सळो कि पळो करून सोडलेली भाजपा पंढरपूर शहराने पाहिली आहे.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा-शिवसेना महायुती सत्तेत आली आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपाशी दोस्ताना करीत आपली वाटचाल सुरु केली.विधान परिषेदेला जिल्ह्याचे आमदार म्हणून ते विजयी झाले आणि यात भाजपाने मोठी भूमिका बजावली.आ. परिचारक हे भाजपचे सहयोगी आमदार झाले.पंढरपूर तालुक्यात भाजपाला अच्छे दिन येणार अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली.पण पुढे २०१६ मध्ये झालेली नगर पालिका निवडणुकीत परिचारक सर्व उमेदवार कमळ चिन्हावर मैदानात उतरवतील अशी अपेक्षा असतानाच यात आघाडी आणि भाजपा अशी वाटणी झाली पुढे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती झाली.मात्र याचीच परिणीती म्हणून पूर्वाश्रमीचा कट्टर भाजपा सर्मथक गट आणि सहयोगी परिचारक समर्थक गट असे सरळसरळ दोन गट कार्यरत होते हे त्रिवार सत्य आहे.मात्र आज झालेल्या निवडीत प्रथमच कट्टर परिचारक समर्थक अशी ओळख असलेल्या काही कार्यकर्त्यांची भाजपच्या महत्वपूर्ण पदावर निवड झाल्यामुळे आता पंढरपूर तालुक्यात भाजपाला ”अधिकृत अच्छे दिन ” येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
                             गेल्या चाळीस वर्षात जेव्हा तालुक्यात परिचारक आणि परिचारक विरोधक असे दोनच प्रभावी गट होते तेव्हा भजनदास चौकातील आपल्या आठ बाय दहाच्या खोलीतून भाजपचे माजी शहराध्यक्ष स्व.बाजी सासवडे,स्व.दशरथ माने,स्व.रामभाऊ आमले,माजी नगरसेवक काशिनाथ थिटे,माजी नगरसेवक उमेश वाघोलीकर,स्व.अशोक ताठे,स्व.जगन दंडवते यांनी शहरातील नागरिकांच्या प्रश्नासाठी केलेला संघर्ष,वेळप्रसंगी दिलेले न्यायालयीन लढे या तालुक्यातील भाजपाच्या विचारधारेवर श्रद्धा असलेला कार्यकर्ता कधीही विसरणार नाही.गेल्या पाच वर्षात परिचारक समर्थक असलेल्या काहींना शहर अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडावी लागली मात्र या कारकिर्दीची तुलना वर उल्लेख केलेल्या माजी अध्यक्षांच्या कारकीर्दीसारखी प्रभावशाली राहिली नाही.पुढे स्वतंत्र बाण्याचे सौदागर मोळक हे भाजपचे शहर अध्यक्ष झाले पण अल्प कारकीर्द वाट्यास आल्याने ते हतबल ठरले आणि स्व.संजय वाईकर यांनी शहर अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली.भाजपाची विचारधारा,स्व.संजय वाईकर यांची कार्यपद्धती आणि भाजपाशी परिचारक यांची असलेली मैत्री या बद्दल वाईकर यांच्या निधनानंतर लिहणे अप्रस्तुत होणार आहे.मात्र त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सूकतता भाजपा सर्मथक आणि परिचारक समर्थक यांना लागली होती.अशातच तालुक्याच्या राजकरणात ”भूकंप” होणार अशी चर्चा आ.स्व. भारत भालके यांच्या निधनानंतर होऊ लागली होती.
                           मात्र आज पंढरपूर शहर व तालुका तसेच जिल्हा पातळीवरील निवडीत कट्टर परिचारक समर्थक अशी ओळख असलेल्या आणि परिचारक हाच आपला पक्ष अशी विचारप्रणाली जोपसासणाऱ्यांची वर्णी लाग्ल्यामळे पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात आता भाजपाला ”अधिकृत अच्छे दिन” येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

17 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

17 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago