छोटया वार्ड रचनेच्या शक्यतेने स्वीकृतसाठी यंदा रस्सीखेच कमीच
२०११ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिका निवडणुकीचा अपवाद वगळता गेल्या वीस वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाची हुकुमी बहुमताने सत्ता राहिली आहे.पंढरपूर शहरात परिचारक गटाचे मोठे प्राबल्य असल्याने नगरसेवक म्हणून नगर पालिकेत प्रवेश करण्यासाठी परिचारकांचा वरदहस्त लाभावा,परिचारक गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी कायम मोठी रस्सीखेच होत आल्याचे दिसून येते.तर ज्यांना निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळाली नाही अथवा उमेदवारी नाकारण्यात आली त्यापैकी अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदाचा मागचा दरवाजा खुला असल्याचे दिसून आले आहे.
२०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत परिचारक प्रणित पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी व भाजपा आघाडीने नगर पालिकेत हुकुमी बहुमत प्राप्त केले तर जनतेतून नगराध्यक्षपदही पटकावले.त्यानंतर गेल्या चार वर्षाच्या कालावधीत स्वीकृत नगरसेवक म्हणून अनेकांना संधी देण्यात आली तर अनेक निष्ठावंत आजही ”वंचित” असल्याचे दिसून येत आहे.या काळात प्रतिवर्षी नगर पालिका विषय समिती सभापती पदाच्या निवडीवेळीच स्वीकृत नगरसेवक निवडीच्या हालचाली सुरु होत असत आणि या स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जायची.आपल्याच गटातील जेष्ठांचा आर्शिर्वाद,गाठीभेटी,विनंती आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन याचे सत्र जवळपास महिनाभर सुरु रहायचे आणि इच्छुकांच्या भाऊगर्दीत गटाकडून केवळ तिघांनाच संधी मिळत असल्याने अनेकांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय उरत नसे.या स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर इच्छुकांपैकी काहीजण आतापर्यंत निष्ठेने काम करून देखील कसा अन्याय झाला याचे किस्से खाजगीत सांगताना दिसून येत.काहीजण पुढच्या वेळी नक्की विचार होईल पण आपली निष्ठा ढळू देणार नाही असे उघड सांगताना दिसून येत.काहीजण आपली निवड न होण्यामागे अमुक तमुक ने पॉलिटिक्स केले नाही तर नेत्यांच्या मनात माझे नाव पक्के होते अशी नाराजीही व्यक्त करताना दिसून येत.पण परिचारक सर्मथक कार्यकर्ता फुटून विरोधी गटात सामील झाल्याची घटना गेल्या ४० वर्षात फार अपवादाने घडली असल्याने महिना-दोन महिन्यात रुसवे-फुगवे संपुष्ठात येत पुन्हा नव्या आशेने वाटचाल सुरु होत असे.
२०११ आणि २०१६ च्या पंढरपूर नगर पालिकेच्या निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडल्या आहेत.त्यामुळे मोठ्या प्रभाग रचनेत आपली गल्ली,शेजारची गल्ली आणि आपला नगरसेवक हि संकल्पना मोडीत निघाली होती.त्यामुळे वार्ड पद्धतीत अपक्ष येण्याची ताकत असलेले नगरसेवक पदाचे अनेक दावेदार प्रभाग पद्धतीत दूर राहिले होते.मात्र वर्षानुवर्षांची निष्ठा लक्षात घेऊन आपल्याला स्वीकृत म्हणून संधी मिळेल अशी अनेकांची अपेक्षा असल्याचे दिसून आले.अशातच स्वीकृत नगरसेवक पदासाठी जुन्याजाणत्या,अनुभवी पेक्षा तरुणांची गर्दी अधिक होऊ लागल्याचे दिसून येऊ लागले.स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक,न्याय मिळणार का ?, नक्की संधी,याना नक्की संधी मिळणार अशा बातम्या झळकू लागल्या आणी ऐन निवडीच्या दिवशी मात्र वेगळीच नावे पुढे येत गेली.पण प्रतिवर्षी स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणाची निवड होणार याची चर्चा मात्र महिनाभर होत आली.
२०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सरपंच पदाची जनतेतून होणारी निवड रद्द केली.तर बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी पूर्वी प्रमाणे छोट्या-छोट्या वार्ड रचनेनुसार नगरसेवक निवडीच्या पद्धती बाबत निर्णय होणार असल्याचे सूतोवाच केले.राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमानुसार डिसेंबर २०२१ मध्ये पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक होणार असून स्वीकृत नगरसेवक म्हणून मेंबरची उपाधी एक वर्षासाठी नको तर छोटे वार्ड असल्यामुळे आपण सहज पाच वर्षासाठी नगरसेवक होऊ शकतो असा अनेकांचा आत्मविश्वास बळावल्यामुळे यंदा पंढरपूर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी फारशी रस्सीखेच नसल्याचे दिसून येत आहे.