पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर…
पंढरपूर(प्रतिनिधी):- संत गाडगे महाराज स्मृतीदिनी म्हणजे २० डिसेंबर रोजी पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी पंढरपूर ते साहापूर म्हणजेच रुक्मिणीमाता ते कालीमाता अशा सायकल टूरचे प्रस्थान सकाळी ०९:३० वाजता होणार असल्याची माहिती सायकल मॅरेथाॅनचे आयोजक सागर कदम यांनी दिली. या सायकल टूरमध्ये एक ज्येष्ठ नागरिक दिगंबर भोसले व एक युवक अभियंता सचिन राऊत हे सहभागी आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सायकलिंग असोशिएशन पुणे, पंढरपूर सायकल असोशिएशन , पंढरी सायकल मॅरेथाॅन यांचे संयुक्त विद्यमाने व त्यांच्या प्रेरणेने पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी, विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी, भौगोलिक उत्सकतेसाठी, ऋतूबदलाचा अभ्यास करण्यासाठी, एकात्मतेचा संदेश देण्यासाठी, वैविध्यतेचा अनुभव घेण्यासाठी, इंधन बचतीचे महत्व आजमावून सांगण्यासाठी, परकीय चलन वाचविण्यासाठी, संत गाडगे महाराजांच्या स्मृतीदिनी सायकल टूरचे आयोजन केले आहे. हि सायकल टूर २२०० किलोमीटरची असून २४ दिवसांची आहे. या सायकल टूरमध्ये वर्ल्ड पीस फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिगंबर भोसले व नवयुवक इंजि. सचिन राऊत हे सहभागी होत आहेत. दिगंबर भोसले यांनी आजपर्यंत दिडलाख किलोमीटर सायकल प्रवास केला असून, ते गेली ३५ वर्षे सायकल प्रवास करित असून, विश्वशांतीचा संदेश देत असल्याची माहिती आयोजक सागर कदम, राष्ट्रवादीचे युवा नेते संदिप मांडवे, साहित्यिक राधेश बादले पाटील यांनी दिली.
या सायकल टूरच्या प्रस्थानास्तव पंढरपूर पंचक्रोशीतील १०० सायकलस्वारांसह विविध क्षेत्रांमधील मान्यवर हजर राहणार असून, शासकीय अधिकारी, पत्रकार आदि मान्यवरांनी तसेच पंढरपूरातील नागरिकांनी, सायकल प्रेमींनी, मायपंढरीची अस्मिता जागविण्यास्तव या कार्यक्रमाला दि.२० डिसेंबर २०२० रोजी पंढरपूर येथे छ. शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सागर कदम यांनी केले आहे.