वास्तविक पाहता पंढरपूर शहर परिसर व उपनगरातील व्यावसायिक, हातगाडेवाले, टपरीवाले हे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेची दररोजची हातगाडा फी भरून व्यवसाय करीत आहेत. अनेक वर्षांपासून ते या व्यवसायावरच आपला व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतू आज अचानकपणे कोणतीही पूर्व सूचना न देता पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोा यांनी मनमानी करत आपल्या प्रचंड लवाजम्यासह जुलमाने कारवाई केल्याने अशा अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आणलेली आहे. गोरगरीबांच्या व्यावसायाच्या मालमत्तेचे जसे की टपरी, हातगाडा, काहींनी अडोशासाठी केलेली घरे व पानसरे यांची प्रचंड प्रमाणात तोडफोड करून त्यांची रोजीरोटी हिरावरून घेतलेली आहे.
पंढरपूर म्हटले की चार वाऱ्यांवर जगणारे गाव म्हणून ओळखले जाते यंदा मात्र कोरोना महामारीमुळे कोणतीही वारी भरलेली नाही. अगोदरच गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या लोकांनी कसे तरी उसने आवसान आणत , उसनवारी करत आपले व्यवसाय सुरू करून आपले व आपल्या कुटूंबियांचे उदरनिवार्ह करीत होते. आधीच व्यवसाय नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेकांना या कारवाईमुळे प्रचंड प्रमाणात धक्का बसल्याचे दिसून येते. अशातच अचानकपणे मुख्याधिकारी मानोरकरांनी प्रचंड दहशत निर्माण करत जेसीबीच्या सहाय्याने संबंधित छोट्या व्यावसायिकांचे तोडफोड नुकसान करत कंबरडे मोडले आहे, अशी मनमानी करून जनसामान्यांच्या गोरगरीबांच्या अन्नात माती कालवणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व नुकसान केलेल्या व्यावसायिकांनी नुकसान भरपाई मिळावी. तसे न झाल्यास प्रचंड जनप्रकोपाला सामोरे जावे लागेल व यापुढे होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी आपणच जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी,असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.