ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी काळे गटाच्या बैठका सुरु
पंढरपूर दि.14- पंढरपूर तालुक्यात होवू घातलेल्या 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाची भुमिका ठरविण्यासाठी भाळवणी येथे भाळवणी गटातील 23 गावांची बैठक पार पडली. गटनिहाय 72 ग्रामपंचायतीच्या बैठका घेणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगीतले.
पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षीय राजकारणापेक्षा गटा तटावरच होतात. तालुक्यात काळे,भालके,परिचारक हे तीन गट सक्षम असून,त्यांच्यामध्ये होणाऱ्या आघाडी वरुनच निवडणुकांचे भवितव्य ठरणारे आहे. कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील केसकरवाडी,भाळवणी,धोंडेवाडी,जौनवाडी,उपरी,शेंडगेवाडी,पिराचीकुरोली,पळशी,सुपली,वाडीकुरोली,देवडे,पटवर्धनकुरोली,गादेगांव,शेळवे,वाखरी,शिरढोण,कौठाळी,खेडभाळवणी,भंडीशेगांव,सोनके,बोहाळी,उंबरगांव,तिसंगी या गावातील काळे गटाच्या प्रमुख कार्यकत्र्यांशी गावनिहाय चर्चा करुन काळे यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकांमध्ये गावपातळीवरील स्थानिक मतभेद बाजूला ठेवून,एकत्रित काम करण्याचे त्यांनी आवाहन केले.
तालुक्यात प्रत्येक गावात कल्याणराव काळे यांना मानणारा वर्ग असल्याने त्यांच्या भूमिकेवरच ग्रामपंचायतीच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबुन आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत काळेगट कोणती भुमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये शक्यतो विट्ठल परिवार अखंडीत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र कार्यकत्र्यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. शेवटी गावाच्या विकासाचे ध्येय धोरण ठरवुन काम करणारे कार्यकर्ते सत्तेत असणे महत्वाचे आहे. त्यामुळे कार्य कर्त्यांची मते घेण्यासाठी बैठका सुरु आहेत.
चेअरमन,कल्याणराव काळे