शिवसेना प्रथम ‘ति’ला  न्याय देणार ?

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा गेल्या चाळीस वर्षाचा विचार केला असता तालुक्याच्या राजकारणात अढळ आणि मजबूत राहिलेला परिचारक समर्थक गट आणि विरोधी गट असे दोन राजकीय गट प्रबळ राहिले आहेत.मग पक्ष कुठलाही असो या दोन्ही गट एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत आणि विजयाचा गुलाल आणि पराभवाची नामुष्की यांच्या हिंदोळ्यावर आपल्या गटाची अस्मिता जपत आले आहेत.मात्र गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणाचा विचार केला असता पंढरपूर तालुक्यात शिवसेना आक्रमक राहिली,कधी आक्रमक पदाधिकारी आणि कधी ”शांत” पदाधिकारी भेटूनही स्वतःचे वेगळे असे अस्तित्व टिकवून राहिली मात्र निवडणुकीच्या राजकरणात शिवसेना हि अपयशी राहिली हे उघड गुपित आहे.अर्थात १९९५ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीत शिवसेना शहराध्यक्ष संजय घोडके यांच्या कार्यकाळात पंढरपूर नगर पालिकेत शिवसेनेचे ५ नगरसेवक विजयी झाले होते आणि तो विक्रम पंढरपूर नगर पालिकेच्या इतिहासात आजही अबाधित आहे.तर १९९९ मध्ये झालेली विधानसभा निडणूक सहकार शिरोमणी स्व.वसंतराव काळे यांनी शिवसेनेच्या पाठींब्यावर लढविली असली तरी ती निवडणूक हि परिचारक गट विरुद्ध परिचारक विरोधी गट अशीच गणली गेली.तर २००४ मध्ये स्व.आमदार भारत भालके यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवीत हे चिन्ह घराघरात पोहचवले पण ती लढत हि याच प्रवर्गात मोडत होती.
    २००० च्या दशकात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता शिवसेना कुठेही निवडणुकीच्या राजकारणात दखलपात्र राहिली नाही. पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पंढरपूरचे मोठे वर्चस्व राहिले आहे त्यामुळेच १९९१ च्या विधासभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युती झाली तेव्हा पंढरपूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेने हट्टाने मागून घेतला होता.मात्र गेल्या सात विधानसभा निडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व अथवा मिळालेली मते अतिशय नगण्य राहिली आहेत.मात्र याच काळात स्थानिक राजकारणात झालेल्या तडजोडीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र कधी सेनेच्या चिन्हावर तर कधी आघाडीच्या चिन्हावर नगर पालिका,पंचायत समिती ते जिल्हापरिषद अशी विविध पदे पदरात पाडून घेता आली आहेत.पण याचा लाभ शिवसेना तालुक्याच्या राजकीय पटलावर मजबूत होण्यासाठी किती झाला हि मात्र संशोधनाची बाब आहे.   
२००७ साली विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आला.२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी रिडालोसचे उमेदवार म्हणून स्वर्गीय भारत भालके यांनी निवडणूक लढविली तेव्हा शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी हे स्व.आ.भालकेंच्या प्रचारात आघाडीवर होते.पण हि बाब शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी फारशी मनावर घेतली नाही त्यामुळे स्थानिक राजकारणात केलेल्या तडजोडी दुर्लक्षित केल्या जातात अशी एक भावना सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि याचाच मोठा फटका या दोन्ही तालुक्यात शिवसेनेला आतापर्यंत बसला आहे.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निडणुकीत शिवसेनेने मंगळवेढ्याचे बलाढ्य नेते समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण ऐकण्यासाठी मंगळवेढा मार्केट कमिटीच्या मैदानात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता पण आवताडे हे तिसऱ्या क्रमांकावर जाण्याबरोबरच पंढरपुर शहर-तालुक्यात त्यांना अगदी नगण्य मते मिळाली होती.आणि हा जसा नवख्या आवताडे यांचा पराभव होता तसाच कागदोपत्री स्ट्रॉंग पदाधिकारी असलेल्या शिवसेनेचा दारुण पराभव होता.२०१४ च्या निवडणुकीनंतर आवताडे यांनी शिवसेनेशी अंतर राखून आपली राजकीय वाटचाल सुरु केली पण याच कालावधीत एक महिला शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेऊन पंढरपूर-मंगळवेढ्याच्या राजकारणात अधिक सक्रिय झाली त्या म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा,जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे या होय.   
२०१६ पासूनच शौला गोडसे यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ लढविण्याची तयारी केली होती.आणि याचाच भाग म्हणून त्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील प्रत्येक मतदारा पर्यंत पोहचल्या होत्या.घराघराच्या दरवाजावर शैला गोडसे यांचे स्टिकर चिकटवले गेले होते आणि जरी भाजप-शिवसेना युती झाली तरी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ हा सेनेच्या वाट्याला असल्याने शैला गोडसे या उमेदवारी बाबत निश्चिन्त होत्या.अशातच यवतमाळ विधान परिषदेचे आमदार असलेले तानाजी सावंत यांच्यावर सेनेने सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला आणखी बळ मिळाले.सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिवसेनेचे नवे-जुने पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी चांगला संपर्क निर्माण करीत आ.तानाजी सावंत यांनी जिल्ह्यात सेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आणि याच काळात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनाही सेनेचे प्रबळ पाठबळ मिळाले.कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लागावा म्हणून शैला गोडसे यांनी केलेला अभ्यासपूर्ण पाठपुरावा हा नक्कीच चर्चेचा विषय ठरला होता तर मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाच्या पाणी प्रश्नासाठी तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून महायुतीच्या सत्ता काळात पाठपुरावा करताना प्रसंगी उपोषणे,आंदोलने असा मार्गही चोखाळला.     
    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि शैला गोडसे यांनी विधानसभा निवडणूक सेनेच्या माध्यमातून लाडवायचीच असा निर्धार करीत तयारी सुरु केली.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढले होते.मात्र यावेळेला युती होणारच आणि हि जागा शिवसेनेच्या हक्काची आहे ती सेना कधीही सोडणार नाही अशी ग्वाही आ.तानाजी सावंत यांनी जून २०१९ मध्ये मंगळवेढा येथे झालेल्या सेनेच्या मेळाव्यात दिला होता.आणि त्यामुळेच शैला गोडसे याच या मतदार संघातून निवडणूक लढविणारच असा विश्वास व्यक्त केला जात होता.याच दरम्यान शिवसेनेने महिलांना राजकारणात संधी देण्याची महत्वाकांक्षी घोषणा केली आणि ”प्रथम ती” च्या माध्यमातून शिवसेना राज्यभर तालुका पातळीवर महिलांचे मेळावे घेऊन या बाबत आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेचा ”प्रथम ती ” हि संकल्पना घेऊन राज्यातील पहिलाच मेळावा पंढरपूर शहरात इसबावी येथे पार पडला होता.या मेळव्यामुळे केवळ शैला गोडसे यांचाच नाही तर या मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही विश्वास वाढला आणि होता.       
सेनेचे बडे नेते आणि मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत संत तनपुरे महाराज मठात पार पडलेल्या कार्यक्रमात हजारो महिलांच्या उपस्थितीत शैला गोडसे या शिवसनेच्या विधानसभेच्या उमेदवार असणार आहेत त्यांना विजयी करणार कि नाही असा प्रश्न विचारला होता.पुढे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा-सेना युती होण्याबरोबरच शिवसेनेचा १९९१ पासून युतीमध्ये सेनेच्या वाट्याला आलेला हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला आणि शैला गोडसे यांनी घेतलेल्या कष्टावर पाणी फेरले गेले.       
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाली.सेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.सेनेचे जिल्हयातील बलाढ्य नेते आ.तानाजी सावंत याना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्यामुळे त्यांचा पूर्वीचा आवेश कुठे दिसेना.जिल्ह्यात सध्या शिवसेनेचा एकमेव आमदार आहे ते म्हणजे सांगोल्याचे शहाजीबापू पाटील.मात्र या तालुक्यात गेल्या ३० वर्षाच्या राजकारणाचा विचार केला असता या तालुक्यात माजी आमदार गणपतराव देशमुख आणि आमदार शहाजीबापू पाटील हे दोन पारंपरीक राजकीय विरोधी गट राहिले आहेत आणि पक्ष हा मुद्दा या तालुक्याच्या दृष्टीने गौण बाब राहिली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.   
     राज्यात महाविकास आघाडीने सर्वच निवडणूक एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आणि आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉगेस  हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपला मोठ्या फरकाने हरवू शकतात हे दिसून आले आहे.आणि यामुळेच पुढील सर्वच निवडणूका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार यावर शिक्कामोर्तबही झाले आहे.पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्व. भारतनाना भालके यांच्या निधनाने या दोन्ही तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीच्या उमेदवारासच संधी मिळणार हे निश्चित आहे.मात्र त्याच वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद हे शिवसेनेच्या वाट्यास जाणार असल्याची चर्चा असून त्यामुळेच मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी शैला गोडसे यांच्या नावाचा अग्रक्रमाने विचार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.   
 जेथून शिवसेनेने महिलांनी राजकारणात यावे याचा आग्रह करीत ”प्रथम ती” या राज्यव्यापी संकल्पनेची सुरुवात केली होती त्याच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या शिवसेनेच्या सक्रिय आणि अभ्यासू महिला नेत्या शैला गोडसे यांच्याबाबत शिवसेना काय भूमिका घेते याकडे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

19 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

19 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago