उंबरे येथील सत्तर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत
पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या झळा आम्हा उंबरेच्या गावकऱ्यांना बसत आहेत. अशा वाईट काळात स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांनी केलेली मदत मोलाची आहे. शिक्षणाबरोबरच सरांचे समाजकार्य देखील लक्षवेधी ठरत आहे. ’ असे प्रतिपादन गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नामदेव मुळे यांनी केले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. पुरामुळे शेतीचे व पिकांचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी उंबरे (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे सत्तर पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. प्रास्ताविकात सुनील भिंगारे यांनी डॉ. रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली आणि उंबरे मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे उंबरे मधील नागरिक कठीण परिस्थितीसोबत धीराने लढत आहेत. खरंच त्यांच्या संयमाला दाद द्यावी असे वाटते, कौतुक करावेसे वाटते. आपणा सर्वांना सध्याच्या या पूर परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे त्यामुळे कोणीही धीर सोडू नये. येथील अवस्था पाहून ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ म्हणून छोटीशी मदत करावीशी वाटली म्हणून येण्याचे प्रयोजन केले. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. पुरामुळे उंबरे गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांची देखील पाहणी डॉ. रोंगे सरांनी केली. या निमित्ताने उंबरे मधील सुमारे सत्तर पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळकर, सरपंच बाळासाहेब शिंदे, दीपक ढोबळे, हणमंत सरगर, नितीन रोंगे, पांडुरंग नाईकनवरे यांच्यासह उंबरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.