अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करून शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती मुस्लिम समाजाला देण्याची शहीद टिपु सुलतान युवक संघटनेची मागणी
पंढरपूर – अल्पसंख्यांक अधिकार दिवस हा दि.18 डिसेंबर 1992 पासून भारत देशासह राज्याच्या अनेक भागात उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहर व ग्रामीण विभागामध्ये आजपर्यंत अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात आलेला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाज हा आपल्या हक्कापासून वंचित राहिला असल्याचे दिसून येते. तो साजरा करण्यात यावा व वास्तविक पाहता मुस्लिम समाजासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत अनेक महत्वाच्या योजना राबविल्या जात आहेत, याविषयी मुस्लिम समाजामध्ये जनजागृती करण्यात यावी अशी मागणी शहीद टिपु सुलतान युवक संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी, पंढरपूरचे प्रांताधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, आमच्या अल्पसंख्यांक समाजासाठी आलेल्या खालील व इतर सर्व योजनांची माहिती आमच्या अल्पसंख्यांक समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
आमच्या मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या काही योजना
1.मौलाना आझाद महामंडळ अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने बेरोजगार मुस्लिम बांधवांसाठी देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. 2.दि.18 डिसेंबर रोजी पंढरपूर नगरपरिषद सभागृहात व मुस्लिम सांस्कृतिक भवन या ठिकाणी अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करण्यात यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मा.प्रांताधिकारी, मा.तहसिलदार यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधी यांना कार्यक्रमाला निमंत्रण देवून त्यांच्यामार्फत मुस्लिम समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात यावे. 3. कब्रस्थान विकास योजना राबविण्यात यावी.
4. मुस्लिम समाज सांस्कृतिक भवन. 5. मुस्लिम समाजातील युवकांना शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी. 6. नगरपरिषद शाळा यांना शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी.
यासह अनेक योजना शासनाकडून राबविण्यात येत आहेत. याची सविस्तर माहिती मुस्लिम समाज बांधवांना मिळावी जेणेकरून त्या योजनांचा त्यांना लाभ मिळण्यास मदत होईल. तरी वरील निवेदनाचा विचार करून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच मुस्लिम समाज बांधवांनी सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात एकसंघ होवून समाजाच्यादृष्टीने महत्वाचा असणारा अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यासाठी तयारी करावी व समाजामध्ये एकोपा राहण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी केलेले आहे.