साऱ्या जगाचा नियंता,कष्टकर्यांचे दैवत म्हणून कमरेवर हात ठेवून विठुराया या नगरीत उभा असताना राजा पंढरीचा’म्हणून मिरवणार्या गुंडाचा आणि कष्टकरी प्रापंचिक लोकांना त्रास देवून,वेठीस धरून आपला कारभार हाकणार्या व राजकीय वरदहस्त प्राप्त करीत राजकारणाच्या माध्यमातून पदे मिळवीत राजेशाही भोगत असल्याचा आव आणणार्या दादा’ लोकांची इथे कधीच कमतरता नव्हती.खमक्या अधिकारी आला की बिळात अन ऍडजेस्टमेंट होऊ लागली की सिहासनावर आरुढ होणारी इथली गुंड प्रजाती जो फायदा उठवत असते तो मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचाच बळी देवून उठविलेला असतो.
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥ हे संतानी अभंगातून सांगीतले हे पंढरपूरकर अभिमानाने सांगताना दिसून येतात तर या मराठी मातीतील जन्मलेला प्रत्येक सज्जन पंढरपूरला आपले माहेर म्हणून संबोधताना दिसून येतो.जेव्हा आम्ही कळते झालो तेव्हा आम्हासही पंढरपूरची हीच महती व्यक्त करावीशी वाटली आणि जेथे जावू तेथे आम्ही आता हीच महती सांगत असलो तरी एक वेदना आमच्या मनामध्ये आजही कायम आहे.जेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी होतो नंतर तरुण होतो तेव्हा पंढरपूर सोडून बाहेर कुठे गेलो की इथल्या गुंडगीरीबाबत आम्हास उत्सुकतेने विचारले जायचे.अमुक दादा,तमुक नाना यांच लईच हवा आहे म्हण तुमच्या पंढरीत असं जेव्हा विचारलं जायचं तेव्हा सार्या भुमंडळाचा डॉन जिथं कमरेवर हात ठेवून मी आहे अशी साक्ष देत आहे तीथं अजुन कुणाचीतरी महती वर्णन केली जात होती याचं दु:ख आम्हास कळंत झाल्यावर वाटायला लागलं.गाव तिथं गुंड ही संज्ञा अनादी काळापासुन चालत आली आहे.पण पंढरपूर हे गाव नाही तर भाविकांचे माहेरघर आहे,भुवैकुंठ आहे अशी अपार श्रध्दा असलेल्यांना आम्ही कुठल्या तोंडानं इथल्या गुंडगीरीचे किस्से सांगायचे याचे अतिव दु:ख आम्हास होत होते.चित्रपटाचं भयानक आकर्षक असलेली तरुण पिढी अगदी प्रतिघात,अंकुश,गुन्डाराज पासुन आम्ही पहात आलो आहोत ते सिंघमच्या काळापर्यंत.या प्रत्येक चित्रपटात शेवटी क्लायमॅक्सला गुंडाच निर्दालन होऊन सर्व सामान्य जनतेला दिलासा देणारा कायद्याचा अंतिम विजय दाखविणारा शेवट दाखविला गेला आहे.मात्र तरीही येथील काही तरुणांना गुंडगीरीचे का आकर्षण वाटत आले याचे कोडे काही उलगडत नाही. पुर्वीच्या काळात नुसत्या हवेवर जगणारे गुंड होते आणि पायाला हातभर मफलर गुंडाळलेले आणि हातात केवळ काठी असलेले पोलीस आले म्हटलं तरी भल्या भल्यांची हवा टाईट होत होती.तो काळही वेगळा होता.तेव्हा मुकंदर का सिकंदर च्या तिकीट खिडकीसमोर रुबाबात फस्टक्लास पाच आणि बाल्कनी दहा म्हणून बोंब ठोकणारे दादा प्रवर्गात मोडत होते.आणि त्यांची प्रचंड हवा असलेलीही आम्ही पाहीली आहे.परंतू जसा काळ पुढे सरकत जाईल तसं गुंडगीरीची संकल्पना बदलू लागली.अधिक प्रगत स्वरुपात राबवीली जावू लागली.मारीओ पुझो या प्रसिध्द लेखकाने आपल्या गॉडफादर या जगप्रसिध्द कादंबरीत गुंडगीरीच्या ज्या अभिनव संकल्पना मांडल्या आहेत.त्याचे अनुकरण जसे पुण्या-मुंबईत होऊ लागले तसेच पंढरीतही होऊ लागले.चित्रपटाच्या तिकीटाचा काळाबाजार करण्यापुरती मर्यादीत असलेली पुर्वीची दादागीरी ही पुढे राजकीय वरहस्त मिळाल्याने पांढर्या कपडयात वावरू लागली.अन् मग या गुंडगीरीची दहशत आणखी वाढत गेली.हातात तलवार घेवून उगीच एखाद्याकडे बघतो म्हणुन गल्लीतून एकदा फेरफटका मारला की पुढील सहा महिने तरी त्याच गल्लीतून नमस्कार घेत रुबाबात फिरता येते याचा सुखद अनुभव त्याकाळी अनेक भुरटयांना आला होता.त्यामुळे त्यांचे धाडस वाढत चालले होते.पुढं त्यास जोड मिळाली ती भाडेकरु च्या ताब्यातील जागा खाली करुन देण्याच्या बिनभांडवली उद्योगाची.एखाद्या जागामालकाने आपल्या जुन्या कुळाला हुसकावून लावण्यासाठी जेव्हा अशा गुंडाची मदत घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्या गुुंडाच्याही लक्षात या धंद्यातील फायदा आला.अन् कुळकायद्यातील जागा खाली करण्याऐवजी कुळासहीत जागा विकत घेण्याचा व्यवसाय गुंडानी सुरु केला. आणि खर्या अर्थानी तेव्हा पासुन पंढरपूरची गुंडगीरी श्रीमंत होत गेली.यातुनच पुढे टोळीयुध्दाचा भडका उडत गेला.पंढरपूर हे गुंडाचे गाव म्हणून कुप्रसिध्दीचे धनी ठरले.गेल्या चार दशकात अनेक दादा आले आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेले.काहींनी पेशा बदलत राजकीय बुरखा पांघरला.तर काहींची अवस्था निसर्गानेच वाईट केली.पण हे सारं घडत असताना सामान्य पापभिरु पंढरपूरकर अर्तंमनात हळहळत होता.पोलीस हाच आपला शेवटचा आधार हीच त्याची समजूत होती.पण जेव्हा पोलीस ठाण्यातच हेच गुंड पांढरे कपडे अंगावर चढवून येजा करतात हे तो पहात होता तेव्हा पोलीस नाही तर पांडुरंगच आता आपला खरा पाठीराखा आहे अशी भावना त्याच्या ओठावर येत होती.
पंढरपूरच्या गुंडगरीरीला खर्या अर्थोने चाप लावण्याचा प्रयत्न झाला तो पंढरपुरचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या काळात.ज्यांनी ज्या चौकात सामान्य असहाय्य जनतेवर रुबाब गाजवला त्याच चौकात घेवुन ज्याजनतेसमोर गुंडाची धुलाई केली जावू लागली तेव्हा पोलीस खाते मनात आणले तर काय करु शकते याची खात्री सर्वसामान्यांना पटली होती.आणि पुढे पोलीस निरिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या काळात हीच पध्दत अवलंबली गेली.पोलीस उपनिरिक्षक गायकवाड आणि पळसुले या जोड गोळीने या शहरातील भल्या भल्या गुंडाना रस्त्यावर लोळवले तेव्हा जे अव्यक्त समाधान येथील जनतेच्या चेहर्यावर होते ते मला आजही आठवते.पण पुढे जेव्हा जेव्हा कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी पंढरपूरकरांच्या भाग्यात आले तेव्हाच हि अनुभूती जनतेला येत गेली.
याच काळात शहरातील गुंडगीरीनेही कात टाकली होती. पुर्वीचे हातभट्टी दारु विक्री, गांजा विक्री,तिकीटांचा काळाबाजार हे उद्योग कालबाह्य झाले होते.कमी फायदयाचे असल्याने वगळले गेले होते.पण याच वेळी अवाढव्य व्याजाची अवैध सावकारी हा अतिशय चांगला जोडधंदा या शहरातरील ‘आप्पा’ लोकांना गवसला होता.एकाद्यास दहा हजार दिले की त्याचे लाख कसे करायचे याचे तंत्र त्यांना सापडले होते.व्याज,चक्रवाढ व्याज आणि दंड या त्रिसुत्रीचा वापर करीत गटराच्या कडेला टपरी टाकून व्याजबटटयाचा व्यवसाय करणारे आणि अधून मधून हवा दाखविण्यासाठी एखाद्या प्रापंचिकास मारहाण करुन आपल्या वसुली प्रक्रियेचा दबाव कायम ठेवू लागले.त्यातुनच अनेकांच्या जागा बळकावण्याचा प्रकारही घडू लागला.अर्थिक अडचणीत असलेले परंतू वडीलोपार्जीत घर,प्लॉट असलेले गिर्हाईक व्याजाने पैसे घेण्यासाठी आपल्याकडेच यावेत यासाठी या गुंड सावकारांकडुन भरघोस कमीशन देवून विशेष दलालांची नेमणूकही केली गेली. वीस वर्षापुर्वी हजार पाचशे रुपये व्याजाने देणार्या अनेक गुंड सावकारांनी कुठलाही कायदेशीर व्यवसाय नसताना देखील दोन दशकात केलेली अर्थिक प्रगती पंतप्रधान मोदींना सुध्दा आश्चर्याचा धक्का देईल अशाच प्रकारची आहे.या पैशाच्या बळावरच कुठलाही गुन्हा घडला तर आपण सुटू शकतो याची अनुभूती या गुंडाना आली आणि मग त्यांची कायद्याबद्दलची उरली सुरली भीती देखील नष्ट झाली.ज्यांचा काहीही संबध नाही अशा फळीवर कट्टयावर गप्पा मारत बसलेल्यांना मारहाण करायची असे नवेच फॅड या काळातच या गुंडाच्या डोक्यात घुसले अन् विनाकारण धुलाई झालेल्यांची संख्या आणि भुरट्या गुंडाची हवा ाढत गेली.पण तक्रार कोण करीत नाही म्हटल्यावर धाडस आणखी वाढत गेले.
सावकारीच्या माध्यमातून कमावलेल्या रग्गड पैशातून काही जणांना राजकीय बस्तान बसविण्याचे स्वप्न पडू लागले आणि मग या गुंडातीलच काही हुशार मंडळींनी पांढरे कपडे परिधान करीत शिवीगाळीची भाषा बाजुला ठेवून जिभेवर साखर ठेवायला चालू केली.त्याच वेळी या गावगुंडाचे नवे रुप आपल्या फायद्याचे आहे हे हेरुन त्यांच्यावर राजकीय छत्र धरले जावू लागले.वरदहस्त भेटल्याने तसेच कुठल्याही शस्त्राचा वापर न करता केवळ चलाखीने आपले पैसा कमविण्याचे मुळ ध्येय साध्य होते हे लक्षात आल्याने अनेकांनी पूढे समाजसेवकांची झूल पांखरली.जे बालीश होते ते हवा करुन पुढे पंक्चर होत काळाच्या ओघात विस्मृतीच्या पडद्याआढ गेले आणि जे चतुर होते त्यांनी भविष्याचा वेध घेत व चाणक्य नितीचा अवलंब करीत आपले राजकीय स्थान आणखी बळकट कसे होईल व त्या माध्यमातून उद्या काय भानगड झाली तर आपले नेते आपल्या साठी धावून कसे येतील याची पध्दतशीर व्युहरचना करण्यास सुरुवात केली.अनेक वेळा तसे घडलेही त्यामुळेच येथील सर्वसामान्य नागरिक हताश झाले होते.पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांच्या काळात पंढरीतील गुन्हेगारी जगताला चांगलाच हादरा बसला होता.तो डॉ.सागर कवडे यांच्या कारकिर्दीत बराचसा कायम राहिला.जेव्हा जेव्हा प्रशासकीय नियमानुसार बदल्या होतील तेव्हा पंढरपूर शहर व तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा सक्रिय होऊ नये,सॅन्ड माफीया,लॅन्ड माफीया पुन्हा धाडसाने डोके वर नये हि अपेक्षा येथील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आली आहे.
पंढरपूरचे पोलीस उपअधिक्षक विक्रम कदम यांच्या रूपाने तरुण तडफदार अधिकारी पंढरपूरला लाभला आहे. अतिशय शिस्तबध्द आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ते ख्यातीप्राप्त आहेत.जेव्हा एखादा खमक्या अधिकारी शहरावर ‘राज्य’ करीत असतो तेव्हा शहरातील सामान्यातील सामान्य अर्थिक स्तर असलेल्या नागरिकालाही एक स्फुरण चढत असलेले आम्ही पाहीले आहे.असा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असेल तर सामान्य नागिरक भल्या भल्या नामचीन लोकांना मी थेट मोठया साहेबांकडे जाईल अशी धमकी देत आपल्यावर होणार संभाव्य अन्याय रोखत असतो.पंढरपूरचे सह.पोलीस अधिक्षक म्हणून डॉ. सागर कवडे यांची कारकीर्द बरीचशी उल्लेखनीय राहिली पण या भूमंडळावर भूवैकूंठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पंढरपूरला एक काळी बाजू आहे आणि ती नव्याने पदभार घेतलेले पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांना इतिहास जाणून घेताना आणि वर्तमान अनुभवताना अवगत होईलच.
– संपादक : राजकुमार शहापुरकर