”विठ्ठल”च्या बॉयलर प्रदीपन समारंभाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ,समर्थकांचा वाढला उत्साह
आरोप प्रत्यारोपांचे मळभ दूर होणार ?
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारा,तालुक्याच्या कृषी औधोगिक क्रांतीचा प्रतीक म्हणून,शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा गेल्या चाळीस वर्षांपासून पंढरपूरच्या अर्थकारणाबरोबरच राजकारणाचाही केंद्रबिंदू ठरला आहे.ज्याच्या हाती ‘विट्ठल’ची सूत्रे तो नेता तालुक्याच्या राजकारणात आमदारकीचा दावेदार हे समीकरणच होते आणि आहे.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी पूर्वी १७ वर्षे या कारखान्याचे संस्थापक स्व.औदूंबर पाटील हे आमदार होते त्यांना मात्र प्रचंड संघर्ष करूनही व कारखाना हाती असतानाही विधानसभेचा गड सर करणे शक्य झाले नाही हेही त्रिकालाबाधित सत्य आहे.मात्र स्व.औदूंबरअण्णांनी ज्या कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याची उभारणी केली आणि या तालुक्यात खऱ्या अर्थाने अर्थकारणाला गती दिली त्याचे विस्मरण विठ्ठल परिवाराचा घटक असलेला विट्ठलचा सभासद कधीही होऊ देत नाही.जिल्हा बँकेवर असलेले मोहिते पाटील अर्थात स्व.नामदेवराव जगताप विरोधी गटाचे प्राबल्य विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास कधीही अनुकूल ठरले नाही.कारखान्याच्या सुरवातीच्या गळीत हंगामाच्या काळात विट्ठलची मोठी अडवणूक झाली पण स्व.अण्णांनी अतिशय संयमाने आणि चाणाक्षपणे यातून मार्ग काढत अल्पवधीतच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अर्थकारण मजबूत केले.बँकेच्या दारात जाण्याऐवजी बँकांना कर्जाचा आग्रह करण्यासाठी दारात येण्यास भाग पाडले.त्यामुळे गळीत हंगामी सुरु करण्यासाठी कर्ज वेळेत मिळाले नाही म्हणून कारखानाच्या गळीत हंगाम बंद ठेवण्याची वेळ कधी आली नाही.
अर्थात त्या काळी जिल्ह्यातील राज्यातील साखर कारखान्याची संख्या आणि उसाचे उत्पादन याचा विचार करता साखर कारखाने हे निश्चित फायद्यातच रहात होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.मात्र गेल्या १५ वर्षाच्या काळात साखरेचे आणि उसाचे गणित,केंद्र सरकारचे साखर आयात निर्यात,बफर स्टॊकधोरण,गॅट करारामुळे आलेली बंधने ,वित्तीय संस्थांमध्ये शिरलेले राजकारण आणि काही ठिकाणी दस्तुरखुद्द कारखाना नेतृत्वाचे अपयश याचीच परिणीती म्हणून अनेक सहकारी व खाजगी साखर कारखाने अडचणीत येत गेले पुन्हा सावरले पुन्हा अडचणीत आले.मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास गतवर्षीचा गळीत हंगाम घेता आला नाही हि बाब पंढरपूर तालुक्यात खळबळजनक ठरली,राजकीय टीका टिपणीस बळ देणारी ठरली त्याच बरोबर तालुक्याच्या अर्थकारणास धक्का देणारी ठरली.आ. भालके यांच्या रूपाने विठ्ठल परिवाराचे आमदारकीचे स्वप्न २००९ साली ३० वर्षांनी सत्यात उतरले होते.विठ्ठल सहकारीच चेअरमन विधानसभेत आमदार म्हणून दाखल झाला होता त्यामुळे विठ्ठल परिवारात नवचैतन्य निर्माण झाले होते.अर्थात आमदार भालके यांना विठ्ठल परिवारातूनही अंर्तविरोधाचा सामना करावा लागला पण राजकीय कौशल्य पणाला लावत आ.भालकेंनी हा विरोध मोडून काढला.मात्र गेल्या चार वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्याची आर्थिक परिस्थिती या बाबत सातत्याने चर्चा होत आली अशातच गतवर्षी कारखाना बंद ठेवणे भाग पडले.विठ्ठलच्या सभासदांना आपला ऊस गाळपास पाठविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.पण कारखाना सुरु होण्यासाठीच्या प्रतिवर्षी राज्य सहकारी बँकेकडून मिळणारी थकहमी,वेळेत उपलब्ध होणारे कर्ज केवळ राजकारणामुळे अडले अशी ठाम भावना असलेल्या विठ्ठलच्या बहुतांश सभासदांनी आ.भालके यांची पाठराखण मात्र सोडली नाही.निष्ठा ढळू दिली नाही. वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपला ४० वा गळीत हंगाम सुरु करत आहे.खरे तर हि सामान्य बाब आहे पण अपयशाचे खापर फोडणारे एक मळभ दूर होतंय याचा आनंद विठ्ठल परिवारातून साजरा केला जातोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणी त्याचीच परिणीती म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बॉयलर प्रदीपन समारंभाची पत्रिका आवाहनात्मक स्वरूपात व्हायरल केली जाताना दिसून येत आहे.
विठ्ठल आणि पांडुरंग परिवार हे गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून सदैव एकमेकासमोर उभे ठाकले आहेत.आणि उसाच्या दराची स्पर्धा हा या दोनही परिवाराच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय ठरत आला आहे.मात्र गेल्या वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरूच होऊ शकला नाही तरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा बहुतांश सभादांनी विठ्ठलच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आरोप प्रत्यारोप आणि खुलासे याचा फारसा विचार करता विठ्ठलचे चेअरमन आ.भालके यांची पाठराखण केली असल्याचे दिसून आले.ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि विठ्ठलच्या सभासदांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या.पुढे घडलेही तसेच डिसेंबर २०१९ मध्ये विठ्ठल सह्कारीस ६० कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.फेब्रुवारी मध्ये ३० कोटी रुपयांचा कर्जाचा पहिला हप्ता विठ्ठलला मिळाला.मात्र सरकारने थकहमी देताना एक जाचक अट घातली होती.संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता तारण देण्याची.पण पुढे एप्रिल २०२० मध्ये सदर अट काढून टाकण्यात आली आणि विठ्ठल सह्कारीस उर्वरित ३० कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.आता प्रत्यक्षात गळीत हंगाम सुरु करताना राज्यातील इतर कारख्यान्याचा बरोबरीने राज्य सहकारी बँक शॉर्ट टर्म लोनही उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे यंदा’विठ्ठल’ची दारे उघडणार आहेत.आणि त्याचीच परिणीती म्हणून आ. भालके यांचे समर्थक मोठ्या अभिमानाने यंदाचा गळीत हंगाम सुरु होणार अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर बॉयलर प्रदीपन समारंभाच्या पत्रिकेसह टाकत आहेत.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होणार असल्याने पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाला पुन्हा गती येणार आहे त्याच बरोबर विठ्ठलचे सभासद असलेल्या आ. भालके समर्थकांना या वर्षी कारखाना बंद असल्याबाबतच्या विरोधकांच्या टोमण्यांचाही सामना करावा लागणार नाही.पंढरपूरच्या अर्थकारणात मोठी भूमिका बजावणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होत आहे हि या शहर व तालुकयातील व्यवसायिक,उधोजक आणि कामगार यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी असून त्यामुळेच त्यांच्याकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…