यशस्वीतेसाठी आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती आवश्यक
निवृत्त स्थापत्य अभियंता( महाराष्ट्र शासन ) व ‘स्वेरीचे ‘उपाध्यक्ष अशोक भोसले
स्वेरीमध्ये ‘सेसा-२०२०’ संपन्न
पंढरपूर- ‘स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच ज्ञान, आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती हे गुण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. सिव्हीलमध्ये बांधकाम क्षेत्रात अधिकाधिक ज्ञान असेल व सोबतीला धाडसीपणा नसेल तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही. तसेच बांधकामाची वयोमर्यादा वाढविण्यासाठी नवनवीन व विदेशी तंत्रज्ञान वापरणे गरजेचे बनले आहे. यासाठी सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी, अभियंत्यांनी बांधकाम क्षेत्रासंबंधी असलेल्या विविध ठिकाणी जावून बांधकामाची व वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानाची सखोल माहिती घ्यावी.’ असे प्रतिपादन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागातील निवृत्त अभियंता व स्वेरीचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक भोसले यांनी केले.
स्वेरीमध्ये आज ‘सेसा-२०२०’ (सिव्हील इंजिनिअरींग स्टुडंटस असोसिएशन) चे ऑनलाइन आयोजन केले होते. याच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागातील निवृत्त अभियंता व स्वेरीचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक भोसले हे सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थी व शिक्षकांना गुगलमीट अॅपद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन करत होते. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच या ऑनलाइन उपक्रमासंबंधी माहिती दिली. पुढे बोलताना निवृत्त अभियंता अशोक भोसले म्हणाले की, ‘प्रत्यक्ष साईटवर काम करताना आपल्यात असलेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा ‘कस’ लागतो. यासाठी प्रथम सिव्हील अभियंत्यांनी बांधकामाविषयी सखोल ज्ञान घेतले पाहिजे. त्याचबरोबर कोणतेही काम करताना आत्मविश्वास व धाडसीपणा असणे आवश्यक आहे. यामुळे हाती घेतलेल्या कार्यात अधिक यश मिळते. मी वाढेगाव (ता.सांगोला) येथील महामार्गाचे काम करताना पूल बांधणीसाठी अडचण आली होती. त्यावेळी नुसत्या नॉलेजचा उपयोग झाला असे नाही तर जोडीला धाडसीपणा असल्यामुळे रस्ता व पूल बांधणीला यश आले. तसेच सोलापुर, बीड इ. जिल्ह्यात काम करताना असे जाणवले की वेळ प्रसंगी मजुरांची मानसिकता पहावी लागते तसेच त्यांना राहण्यासाठी घर, बगीचा आदी संबंधित सोयींचा विचार करावा लागतो. निवृत्त झाल्यानंतर इंजिनिअरींग आणि वैद्यकीय या दोन मोठ्या शैक्षणिक क्षेत्रात आमंत्रित करून माझ्या कामाचा गौरव करण्यात आला. एकूणच आपण केलेल्या कामातील आनंद हा दुसऱ्या कशातच मिळत नाही.’ असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रणाली वरूनच पेपर प्रेझेन्टेशन, पोस्टर प्रेझेन्टेशन आणि क्वीज कॉम्पिटेशन मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, प्रा. श्रीकृष्ण गोसावी, सिव्हील इंजिनिअरींग विभागातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन सेसाचे समन्वयक प्रा. रविकांत साठे यांनी केले तर डॉ. व्ही.एस. क्षीरसागर यांनी आभार मानले