पळशीत पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे 7 जणाचे प्राण वाचले
शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार व जोरदार पावसामुळे कासाळ ओढ्याला फार मोठा पूर आला.या पाण्याची इतकी गती इतकी जास्त होती की त्यामुळे जिवित हानी नाही पण मुक्या जनावराचे जिव मात्र कोणीच वाचवू शकले नाही.घरेच्या घरे उध्वस्त होऊन संसार पूर्णपणे कोलमडून पडले.
याबद्दल सविस्तर माहिती पळशी गावचे पोलीस पाटील अशोक लोखंडे यानी सांगितली .
शुक्रवार च्या रात्री 11.30 वाजेपर्यंत पाण्याची पातळी फार होती.ओढ्याच्या पात्रात जाणे अशक्य होते.पाण्यात अडकलेल्या धनाजी लोखंडे व इतर सहा जनाना वारंवार फोन करुन धीर देण्याचा प्रयत्न करत राहिलो.आणि ते त्यांच्या घरावर जाऊन बसले.त्या दरम्यान शेजारील त्यांचे चुलत भाऊ बाळू लोखंडे यांचे घर पडले.विजेचे दोन खांब पडले.एकंदरीत सर्वजण गर्भगळीत झाले होते.या परिस्थितीत फोन चालू असतानाच धनाजीच्या एका खोलिची भिंत पडली.मग मात्र त्याच्या मनाने ठाव सोडला आणि अगदी रडकुंडीला येऊन म्हणाला लवकरात लवकर वरच्या वर काढण्याचा काय प्रयत्न करता येईल का बघा नाहितर आमचे काही खरे नाही.हे ऐकून त्याचा सख्खा भाऊ तानाजी गहिवरून रडू लागला.त्याला सावरण्याचा प्रयत्न केला आणि सोबत अविनाश लोखंडे,समाधान लोखंडे,मी स्वत घेऊन निघालो सोबत तानाजी अन बाळू आले.
त्यांच्या घराच्या जवळ किमान दोन हजार फूट असलेल्या शिनगारे यांच्या घरी आलो थांबलो .परिस्थितीचा अंदाज घेतला आणि वाट नसतानाही उसाच्या पाण्याच्या दंडातून हळू हळू चालू लागलो.वरती काळेकुट्ट ढग दाटून आले होते अजून पाऊस येण्याची शक्यता वाटत होती.अशातच पंढरपूरचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी हजर झाले फोन वरुन बोलणे झाले.मी स्वत घटना स्थळी ऐकलेले पाहुन त्यानाही बरे वाटले व मला साहस देण्याचे काम केले उत्साह वाढला कौतुक केल्याचा आनंद झाला.कमी जास्त माहिती लगेच मला सांग म्हणाले.असे जवळ जवळ दोन ते तिन वेळा त्यांचे बोलणे झाले एव्हाना आम्ही आणखी थोडे पूढे गेलो अंदाज घेतला आणि धनाजीला हाक मारली.लगेच धनाजीने ओ दिली आणि आम्हास हायसे वाटले.
सुमारे दोन तासांनी पाण्याची पातळी कमी झाली.
आणि हळू हळू दोन दोन जणानी सोबत जाऊन गुडघाभर कुठं कमरेभर पाणी ओलांडून शेताच्या बांधा बांधाणी तानाजीचे व तिथून धनाजीचे घर गाठले आणि हळुवारपणे सर्वाना हाताला धरून बाहेर काढले.यावेळी चार वाजले होते ढोले साहेब झोपले असतिल म्हणून एकदा कॉल केला पण नंतर फार वेळ झाली आहे म्हणून फोन कट केला व एक मेसेज टाकला .
साहेब सर्व 7 च्या 7 जण सुखरुप बाहेर काढली आहेत. आणि नंतर मंडल अधिकारी मुजावर साहेब,तलाठी शेलार मैडम याना सांगितले.तोपर्यंत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक स्वत भस्मे साहेब सर्व ताफा घेऊन हजर होते.त्याना ही रेपोर्ट केला आणि ते ही निघाले.त्यावेळी पहाटेचे 4.00 वाजले होते.नंतर तिथून आम्ही चालत पून्हा 4 किमी आमच्या घरी चिखल तुडवत गेलो तोवर 5.00 वाजले होते.
यात एक मात्र वाईट वाटले मुकी जनावरे ,शेळ्या,कोंबड्या,बाइक ,घरे ,शेतातील डाळिंब झाडे उन्मळून वाहुन गेली होती .उस ,मका जमीनदोस्त होऊन उध्वस्त झालेली पाहुन मन अगदी सुन्न झालं होतं.
प्रांत साहेबांचा एक एक शब्द कानात घुमत होता.त्यामुळे काम करण्यास एक उत्साह,जोश येत होता.जणू ते मला सांगत होते सर्व लोक सुखरुप बाहेर काढलेला तुझा फोन आल्याशिवाय मी झोपणार नाही.
यावेळी प्रशासनाच्या अधिकारी सोबत गावातील माजी सरपंच नंदकुमार बागल,विजय राजमाने,नवल काळे,मा.उपसरपंच शिवाजी लोखंडे,सिताराम भुईटे आदी उपस्थित होते.