स्वेरीला ‘वर्च्युअल लॅब’ साठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर्फे नोडल सेंटरची मान्यता
पंढरपूर- जगभरातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विविध ऑनलाईन कोर्सेस व वेबिनार मुळे आता अद्यावत झाला आहे. हीच संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, पंढरपूरला ‘वर्च्युअल लॅब’ साठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे तर्फे नोडल सेंटर म्हणून मान्यता मिळाली असल्याची माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी दिली.
अशी मान्यता मिळणारे सोलापूर जिल्ह्यातील हे पहिलेच पॉलीटेक्निक आहे. या नोडल सेंटर साठी आय. टी. विभागाचे प्रमुख प्रा. अवधूत भिसे यांची ‘नोडल कॉर्डिनेटर’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना या जागतिक महामारीमुळे आता विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत तरी वर्च्युअल लॅब तंत्रज्ञानामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घर बसल्या प्रात्यक्षिक विषयांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढून त्यांना विविध शैक्षणिक प्रयोगाद्वारे मूलभूत आणि प्रगत संकल्पना शिकण्यात मदत होईल. वर्च्युअल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेब-संसाधने, व्हिडिओ-व्याख्याने, अॅनिमेटेड प्रात्यक्षिके आणि स्वत: चे मूल्यांकन यासह विविध साधनांचा लाभ होणार आहे. वेळ आणि भौगोलिक अंतराच्या मर्यादांमुळे मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेली महागडी उपकरणे आणि संसाधने आता विद्यार्थ्यांना घर बसल्या पाहता येतील. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे कडून एम.एच. आर. डी. नवी दिल्ली च्या प्रकल्पांतर्गत सेन्सर मॉडेलिंग, प्रोग्राम लॉजिक कंट्रोलर्स आणि इंटिग्रेटेड ऑटोमेशनच्या ०३ प्रयोगशाळा विकसित केल्या आहेत. या अंतर्गत विदयार्थ्यांना नोडल सेंटर पोर्टलच्या माध्यमातून आपली नोंदणी करता येईल. त्यानंतर त्यांना सेन्सर आणि प्रक्रिया नियंत्रण क्षेत्रात विविध प्रयोग करण्यासाठी हे व्हर्च्युअल टर्मिनल वापरण्याची परवानगी दिली जाईल.
यामुळे विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. ‘वर्च्युअल लॅब’ मिळाल्यामुळे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज प्रा. एम. एम. पवार तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ आणि प्राध्यापक वर्गांचे अभिनंदन केले.