आपल्याच आघाडीतील ”स्वबळावरील” ज्येष्ठ नगरसेवकाचा संताप तरी आ.परिचारक विचारात घेणार ?

आपल्याच आघाडीच्या ”स्वबळावरील” ज्येष्ठ नगरसेवकाचा संताप तरी आ.परिचारक विचारात घेणार ?

कोविड रुग्णालय उभारणीच्या मुद्द्यावरून सत्तधारी आघाडीतील अस्वस्थता चव्हाट्यावर !

(पंढरी वार्ता विषेश-राजकुमार शहापूरकर)

कोरोना विषाणूने देशभरात आपली दहशत माजवली असतानाच व या विषाणूच्या विरोधात राजकारण बाजूला सारून सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे उपदेशाचे डोस राजकीय निरीक्षक देत असतानाही अगदी गल्ली ते दिल्ली या काळातही मोठे राजकारण होत असल्याचे दिसून येते.अर्थात हे राजकारण केवळ सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातच आमने सामने नसून जेथे जेथे ज्यांची सत्ता आहे त्यां सत्ताधारी गोटात देखील श्रेयवादाच्या आणि निर्णयप्रक्रियेतील वर्चस्ववादाच्या घडामोडीने अस्वस्थता निर्माण केलेली दिसून येते.तसाच प्रकार आज पंढरपूर नगर पालिकेच्या विशेष सभेत दिसून आला असून आज च्या सभेत विरोधी आघाडीच्या नगरसेवकांबरोबरच सत्ताधारी आघाडीतील जेष्ठ नगरसेवक,माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे यांनीच थेट विरोधी नगरसेवकाच्या सुरात सूर मिसळल्यामुळे पंढरीत या प्रकाराची मोठी चर्चा होत असली तरी आज घडलेला प्रकार हा केवळ कोविड रुग्णालयाच्या मुद्द्यावरून घडला नसून त्या पाठीमागे गेल्या साडेतीन वर्षातील सत्ताधारी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीतील खदखद बाहेर पडली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
२०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिका निवडणुकीत शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने परिचारक प्रणित आघाडीच्या हाती नगरपालिकेची सत्ता सोपवविली. नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे परिचारक प्रणित आघाडीस मोठा संघर्ष करावा लागला.अशातच देवधर,युवराज पाटील आणि पत्नी आघाडीकडून आणि स्वतः नगराध्यक्ष पदासाठी आघाडीच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या शिवाजी कोळी यांच्यामुळे नगराध्यक्ष पद परिचारक प्रणित आघाडीकडे चालत आले.मात्र त्याच वेळी विरोधी तीर्थक्षेत्र आघाडीतील विसंवाद,२०११ च्या निवडणुकीत जनतेने सत्ता हाती सोपवूनही सत्ता सांभाळण्यात आलेले अपयश यामुळे आ.भालके प्रणित आघाडीचे नगरसेवक हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संखेनेचे नगर पालिकेत जाऊ शकले.पण संख्येने कमी असले तरी यातील काही नगरसेवकाचा राजकारणाचा दांडगा अभ्यास असल्यामुळे ते सत्ताधारी आघाडीस सळो कि पळो करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच विरोधी आघडीचे नगरसेवक अनेक प्रकरणात बोटचेपी भूमिका घेतात,जनतेच्या प्रश्नासाठी भांडत नाहीत अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता व्यक्त करू लागली होती.
याचाच मोठा फायदा सत्ताधारी आघडीला होत गेला आणि आघडीतही ” ठराविक” नगरसेवकांचे राजकारण सुरु झाले.जे नवखे आहेत,ज्यांना नगरपालिकेच्या कारभारापेक्षा आपल्यावरील जबाब्दारीपेक्षा सामान्य नागरिकांनी ”नमस्कार मेंबर” म्हणत दिलेली हाकच धन्य झाल्याची भावना निर्माण करण्यास पुरेशी ठरली आणि नगरपालिकेतील राजकारण आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे अर्थकारण समजण्यास सुरवातीच्या काळात त्यांना जणू काही स्वारस्यच उरले नव्हते.पुढे मात्र काही सामाजिक कार्यकर्तेच अशा नगरसेवकांना आर्थिक घडामोडीतील अज्ञाना बद्दल कानगोष्टी करू लागले पण तो पर्यत खूप उशीर झाला होता.आणि आज सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक दगडू धोत्रे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे ”ठराविक तीन-चार” कारभारीच नगरपालिकेचा कारभार हाकत आहेत अशी भावना सत्ताधारी आघाडीतील अनेक नगरसेवकांमध्ये निर्माण झाली होती.आणि त्याचाच उद्रेक आज झाला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
             गेल्या चार वर्षाच्या कालावधीत नगर पालिकेच्या माध्यमातून कोट्यवधींचे इस्टिमेट असलेली कामे करण्यात आली. यातील काही कामे पूर्णत्वास येऊन नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली तर अनेक कामे सुरु आहेत.मात्र हा सारा ” विकास ” होत असताना व सदर विकास कामाच्या ठिकाणी अधून मधून आ.प्रशांत परिचारक यांच्यासारखे अभ्यासू व चिकित्सक नेतृत्व भेट देऊन कामाची पाहाणी करीत असतानाही हि कामे इतक्या निकृष्ट दर्जाची का झाली असा प्रश्न सामान्य नागरिकांना अनेकवेळा पडला होता.आणि हीच बाब सामाजिक कार्यकर्ते ”ठराविक” नगरसेवक सोडून इतरांच्या कानावर घालत होते पण फारसा फरक पडत नव्हता.त्याचेच एक साधे उदाहरण म्हणजे आज मी ज्या रस्त्याने माझ्या ऑफिसला आलो तो अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक हा कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता.या रस्त्याची आज काय अवस्था आहे हे एकदा सत्ताधारी नगरसेवकांनी फेरफटका मारून पहावे.
याच वेळी पंढरपुरातील सुजाण नागिरक मात्र एक प्रतिक्रिया जरूर व्यक्त करत होते ती म्हणजे विरोधी आघाडीचे नगरसेवक या बाबत का मौन बाळगतात याची ? तरीही एखाद्या विकास कामाबाबत प्रसिद्धी माध्यमातून अथवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपोषणातून चर्चा सुरू झाली कि सदर प्रकरणावर विरोधी नगरसेवक हे आपले विरोध प्रदर्शन करीत होते.बाकीच्या वेळी साधारण सभा खेळीमेळीत पार पडत गेल्या. नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध नियोजित विकास कामासाठी व आकस्मात कामासाठी जवळपास दोनशे निविदा प्रक्रिया राबविल्या जातात.या पैकी अनेक बहुतांश निविदा प्रक्रियांची माहिती दस्तुरखुद्द सत्ताधारी नगरसेवकांनाच दिली जात नसल्याची माहिती खाजगीत अनेक नगरसेवकांनी आमच्याजवळ व्यक्त केली आहे तर कुठले टेंडर कुठल्या नगरसेवकाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीस मिळाले आहे याची चविष्ट चर्चा देखील होतोना दिसून आले आहे आणि सुदैवाने थोडेसे नागिरकत्वाचे भान असलेल्या नागिरकांनाही ते समजू लागले आहे..मात्र सर्वात गंभीरबाब म्हणजे कोरोना प्रसार रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन करीत असलेल्या उपायोजना या बाबत सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकच काय तर विषय समिती सभापतीलाही माहिती दिली जात नसल्याचे,अशा नगरसेवकांच्या फेसबुकवरील नेहमीच्या समर्थकांच्या पोस्टवरून दिसून आले आहे.
आज संतसागर ६५ एकर परिसरात कोविड रुग्णालय उभारण्यास व त्याला येणाऱ्या जवळपास ६० लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन नगरपालिका सभागृहात करण्यात आले होते.आजच्या या सभेत विरोधी आघाडीचे नेते नगरसेवक सुधीर धोत्रे आणि नगरसेवक महादेव भालेराव हे विरोधी नगरसेवकांना गेल्या दोन महिन्याच्या कोरोना उपाययोजना काळात विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत होते आणि नेहमी प्रमाणे नगण्य संख्या असलेल्या विरोधी नगरसेवकांचे म्हणणे दुर्लक्षित करून नगर पालिकेकडून खेळीमेळीच्या वातावरणात नगर पालकेचे सभेत ६५ एकर परिसरात कोविड रुग्णालय उभारण्यास मंजुरी अशी प्रेस नोट पाठवली गेली असती आणि काही नेहमीच्या यशस्वी लोकांकडून वस्तुस्थिती न मांडता पाठविली गेली असती.
पण सत्ताधारी आघाडीत काही मोजकेच ”बाहुबली” नगरसेवक आहेत,त्यांना ना कधी आघाडीच्या उमेदवारीची चिंता असते ना विजयी होण्याची.यात दगडू धोत्रे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.आमदार कुणीही असो आमचा प्रभाग,आमचा वार्ड आणि आमचा नगरसेवक एकच अशी भूमिका शहरातील काही मोजक्या नगरसेवकांच्या बाबतीत तेथील मतदारांनी घेतलेली दिसून येते आणि यापैकी एक असलेले स्वबळावरील बाहुबली नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे यांनी आजच्या नगर पालिकेच्या सभेत सत्ताधारी पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीच्या विरोधात व मोजक्या ”तीन- चार” नगरसेवकांच्या विरोधात जो आवाज उठविला आहे तो आ.परिचारक आणि त्यांच्या आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी वेळीच विचारात घेतला नाहीतर ” आपल्याला काही फरक पडत नाही” या विचारसरणीचा फटका त्यांना विधासभेप्रमाणे आगामी नगर पालिका निवडणुकीत देखील बसल्याशिवाय राहणार नाही !
– राजकुमार शहापूरकर

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago