तावशी येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीसांची कारवाई ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
प्रकरण महसूल विभागाकडे दंडात्मक कारवाईसाठी वर्ग होणार ?
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथून यादव नगर परिसरातून माण नदीपात्रा वाळू उपसा करीत असलेल्या टाटा पीक अप या वाहनातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करीत असलेल्या वाहनावर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईत 6,00,000/-रू किमतीचा एक टाटा कंपनिचे योध्दा पांढरे रंगाचे पिकअप त्याचा चेसी नंबर MAT464602JSH13610 हा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पिकअप चालक ओंकार अनिल जाधव वय-24वर्षे रा.गोपाळपूर ता. पंढरपूर व पिकअप मालक विशाल सुरेश ढेकळे रा.ढेकळेवाडी जुना मारापूर रस्ता ता. मंगळवेढा यांच्या विरोधात भादवि 379,34 सह पर्यावरण कायदा कलम 9,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोक/1491देवेंद्र हिंदुराव सुर्यवंशी नेमणूक पंढरपूर तालुका पोलीस यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात अवैध वाहतूक करणारे वाहन चालक व मालक यांच्यावर सुमारे २ हजार रुपये किमतीची वाळू अवैध रित्या वाहतूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पंढरपूर शहर व तालुका पोलिसांकडून अवैध वाळू वाहतूक कारणाऱ्या वाहनावर गुन्हे दाखल होतात मात्र या बाबतचा अहवाल महसूल खात्याकडे जात नसल्याने कारवाई करण्यात आलेल्या अनेक वाहनांची माहितीच महसूल विभागास नसल्याचा फायदा अवैध वाळू चोरटे घेत आहेत.अवैध वाळू चोरी करणाऱ्या वाहनावर जबर दंडाची तरतूद महसूल खात्याच्या नियमानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन महसूल खात्याने ताब्यात घेतल्यास नियमानुसार त्याला किमान एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो त्याच बरोबर वाहनातुन जप्त केलेल्या वाळूस प्रतिब्रास ५२ हजार रुपये दंड आकारला जातो.मात्र पोलीस कारवाईत सापडलेली अनेक वाहने हि पोलीस कारवाई नंतर कोर्टातून सोडवून घेतली जातात आणि हा प्रकार महसुलं खात्याच्या अपरोक्ष होत असल्याने सदर वाळू चोरांना व या प्रकरणातील वाहन धारकांना अगदी किरकोळ स्वरूपाचा खर्च करून वाहने ताब्यात मिळत असल्याचे दिसून येते.
त्या मुळेच एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनास वाळू निविदा प्रक्रियेतून शेकडो कोटी रुपये मिळत असताना महसूल विभागाने केलेल्या कारवाईतील अथवा पोलीस खात्याने पुढील कारवाईसाठी वर्ग केलेल्या वाहन चालकांकडून आज केवळ काही लाखाच्या दंड वसुलीवर समाधान मानावे लागत आहे.