गेल्या जवळपास एक महिन्याच्या काळापासून चंद्रभागा नदीकाठच्या पंढरपूर व इसबावीच्या परिसरातून अवैध वाळू उपसा पूर्णतः बंद झाल्याचे समाधान या नदीकाठच्या रहिवाशातून व्यक्त केले जात असतानाच आता पुन्हा हे वाळू माफिया आपले डोके वर काढू लागले असल्याचे काल शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे उघड झाले आहे.महिन्द्रा मँक्स कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप क्रं.MH-13.R- 6041 व पांढऱ्या रंगाची पिकअप क्रं.MH-13.R-7600 या दोन वाहनावर कारवाई केली असून वाळू चोर मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या अनेकांवर कारवाई करून वाहनेही ताब्यात घेतले जात असल्याचे दिसून येत असल्याने नदीकाठच्या परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवा पूल व रेल्वे पुलापासून पंढरपूर शहरात प्रवेश करणारे रस्ते,शिंदे नाईक नगर, अनिल नगर मध्ये प्रवेश करणारे नदीकाठचे रस्ते तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या नजीकचा नदीकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर महसूल विभाग व पोलिसांनी अधून मधून कारवाई केली आहे मात्र या परिसरातील लोकांचा कानोसा घेतला असता कारवाईच्या घटना घडल्या नंतरही रात्रभर वाळू चोरी करणाऱ्या वाहनांची वर्दळ कधी थांबली नाही अशीच प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे.मात्र गेल्या एक महिनाभरापासून अचानकपणे नदीकाठचा परिसर रात्रीच्या वेळीही शांत राहू लागल्याचे दिसून येऊ लागले तर वाळू वाहनांची वर्दळही जवळपास बंद झाली.अवैध वाळू उपसा हा पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गंभीर गुन्हा आहे पण सराईत वाळू चोर याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे अनेकवेळा दिसून आले.
पूर्वीच्या काळी नदीकाठच्या परिसरातून बांधकामासाठी बैलगाडी द्वारे वाळू काढली जात होती.पावसाळयात नदीला भरपूर पाणी येऊन गेले कि गावचे पाटील बांधकामाचा चुना तयार करणाऱ्या घाणीसाठी व बांधकामासाठी नदीतून वाळू काढण्यास परवानगी देत आणि पात्र खडबडीत होऊ लागले कि वाळू उपसा बंद करण्याचे आदेश देत असत आणि वाळू उपसा करणारे त्याचे तंतोतंत पालन करीत असत.गेल्या काही दिवसापासून पंढरपुरच्या नदीकाठचा परिसर असाच शांत होता आणि जुने जाणते लोक एकेकाळी गावच्या पाटलाचा आदेश आल्यानंतर नदीकाठ असेच शांत रहायचे याची आठवण काढू लागले.पण आता पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शासनाने अनेक कठोर कायदे केले आहेत.आणि त्याच्या अंलबजावणीची जबाबदारी स्थानिक पातळीवर पोलीस पाटील,तलाठी आणि पोलीस प्रशासन यांच्यावर आली आहे.आणि आता वाळू चोर पूर्वीप्रमाणे पाटील यांच्या आदेश पाळत नाहीत आणि वाळू चोरीच्या माध्यमातून आपला राजयोग कोणीही रोखू शकत नाही अशीच त्यांची धारणा झाली असल्याचे दिसून येते आणि याला काही वाळू माफियांना पुढे गावकीत आणि राजकारणात महत्व प्राप्त होऊन खरोखर राजयोग प्राप्त झाल्याचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येत असतानाच पंढरपूर शहर परिसरात मात्र वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत.
मात्र या साऱ्या घडामोडीत अक्कलकोट तालुक्यात जसा पिंटू नावाचा एक अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला तरुण पुढे दोन तालुक्याच्या सॅण्ड लॉबीचा हेड झाला होता गोळीबारापर्यंत त्याची मजल गेली होती तसेच छोटे छोटे ”पिंटू ” पंढरपूर तालुक्यात निर्माण होण्यापासून रोखण्याची जबाबदारी पोलीस आणि महसूल प्रशासनाची आहे.