पंढरपूर शहर व तालुक्यात दारुबंदी कायदा कलम 65 चे सर्रास उल्लंघन
अनेक ढाबेचालकांची वाईन शॉपमधून ठोक खरेदी
उत्पादन शुल्क विभागाची तुरळक कारवाई ?
अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, देशी दुकानात दारू प्यायला देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे, 19 वर्षाखालील तरुणांना दारू देने, निर्धारित वेळेपूर्वी (पहाटेच) दुकाने उघडणे, दारूची ठोक विक्री करणे तसेच इतरही नियमांना ढाब्यावर बसवून अनेक वाईन शॉप व परमिटरुम मधून दारू विक्री मोठ्या प्रमाणात होताना आढळून येते. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई करणे गरजेचे असताना उत्पादन शुल्क विभाग या गैरप्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या दारुबंदी कायद्याला सरळ सरळ हरताळ फासण्याचे काम केले जात आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील अनेक वाईन शॉप व परमिटरुम चालक व देशी विदेशी दारु विक्रीची दुकाने या ठिकाणी केवळ परमिट धारकासच दारु विक्री करण्यात यावी असा नियम असताना बहुतांश वाईन शॉप व परमिटरुम मधून दारु पिण्याच्या परवान्याची कुठलीही पडताळणी न करताच थेट विक्री केली जात असल्याचे दिसून येते.सर्वच दारु विक्री दुकाने आणि परमिट रुममध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आल्या असून यामधील फुटेजची तपासणी केल्यास हा कायदेभंग सरळ सरळ सिद्ध होऊ शकतो पण उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना या सीसीटीव्ही फुटेज पेक्षा दरमहा मिळणारे ‘रजिस्टर’महत्वाचे असल्याने ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकार अनेक जिल्ह्यात घडत असतात. तर वाईन शॉप अर्थात दारू विक्रीच्या परवानाप्राप्त दुकानदाराकडून ढाबे चालकांना अथवा त्याने पाठविलेल्या व्यक्तीस एकाच वेळी शेकडोंनी दारुच्या बाटल्या विक्री केल्या जात असल्याचे त्यांच्याच दुकानात बसविलेल्या cctv फुटेजची पाहणी केली असता सहज दिसून येते पण उत्पादन शुल्क विभागाच्या गलेगठ्ठ पगार घेणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांच्या नजरेस हि बाब पडत नाही हे एक आश्चर्य आहे.
देशी दारू दुकान व बियरबार चालकांनी वेळेच्या आत दुकाने उघडू नये. तसेच दिलेल्या वेळेच्या नंतर दुकान उघडे ठेवू नये. शासकीय बंदच्या दिवशी दिवसभर दुकाने उघडे नये. एका व्यक्तीस पिण्याकरिता दारूचा किती पुरवठा करावा याबाबत दिलेल्या नियमाचे पालन तंतोतंत करावे. दुकानातून अवैध विक्रीकरिता दारू विक्री करू नये अशा सक्त सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना देतानाच्या अटीत नमूद केलेल्या असतात. मात्र याची अंलबजावणी उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक अधिकार्यांवर अवलंबून असते. त्यांच्या दुर्लक्षामुळेच दारु विक्रीचे नियम आणि दारुबंदी कायदा कलम 65 नुसार अवैधरित्या दारुची वाहतूक होत असल्याचे दिसून येते.
जेव्हा जेव्हा सोलापूर जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे जबाबदारी असते तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील वाईन शॉपमधून अवैधरित्या मोठया प्रमाणात दारु विक्री करणार्यांवर तसेच निर्धारीत वेळेपुर्वी दारु विक्रीची दुकाने उघडल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती.पण असे कर्तव्यदक्ष अधिकारी भेटले तरच हि कारवाई होताना दिसून आली.
पंढरपूरातील अनेक परवानाप्राप्त देशी दारुची दुकाने अगदी पहाटे पाच पासून उघडी असतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.पंढरपूर तालुक्यातील अनेक ढाब्यांवर विनापरवाना दारु विक्री केली जात असून ही दारु विक्रीसाठी कुठून उपलब्ध होते याचा शोध घेण्यास उत्पादन शुल्क विभाग का अपयशी ठरत आहे हे एक गौडबंगालच आहे.शहर व तालुक्यातील काही ढाब्यांवर रात्रीच्या वेळी फेरफटका मारल्यास या ठिकाणी रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येेतो आणि नेमके अशाच ढाब्याच्या ठिकाणी प्रत्येक भिंतीवरील ‘येथे दारू पिण्यास सक्त मनाई आहे हा फलक’ या उत्पादन शुल्क विभाग किती तकलादू आहे हेच जणू सांगत असतो .
(आणखी एक गंभीर बाब- अनेक भ्रष्ट अधीकारी राज्यात ज्या ठिकाणी पदभार सांभाळतात त्या ठिकाणी आपल्या समाज संघटेनच्या पदाधिकाऱ्यांना खुश ठेवत हाताशी धरून आपल्या भ्रष्ट कारभारावर दबावाचे पांघरून घालत असल्याचीही चर्चा आहे )