मंदीरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे
कार्यक्षम कि अकार्यक्षम ?
सोशल मीडियावर विविध सामाजिक संघटनांचे घमासान
शासकीय अधिकाऱ्यांची ‘रिलेशन डेव्हलपमेंट’ ठरली प्रभावी
विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीचे व्यवस्थापक तथा प्रभारी शासकीय अधिकारी बालाजी पुदलवाड यांच्या कायर्पद्धतीवर नाराजी व्यक्त करीत पंढरपुरातील एका सामाजिक संघटनेने काल आवाज उठवला खरा पण त्याच्या परिणाम म्हणून आज दिवसभर सोशल मीडियावर अँटी पुदलवाड आणि प्रो पुदलवाड यांच्यात घमासान शाब्दिक लढाई होताना दिसून आहे.बालाजी पुदलवाड हे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील राजपत्रित कर्मचारी आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आपल्या समोरील व्यक्तीचे राजकीय अथवा सामाजिक वर्तुळातील स्थान,उपद्रव मूल्य,समर्थन अथवा विरोध करण्याची क्षमता याचा पुरेपूर अभ्यास गेल्या अनेक वर्षाच्या सेवेत पुदलवाड यांचा झाल्यामूळे त्यांनी या शहर व तालुक्यातील अनेकांची मर्जी संपादन केली आहे.या मुळेच आज पुदलवाड जावेत कि रहावेत यासाठी सोशल मीडियावर प्रचंड वादंग होताना दिसून आला.आणि यातूनच पुदलवाड हे कसे कार्यक्षम अधीकारी आहेत हे सांगण्यासाठी तर ते कसे अकार्यक्षम अधिकारी आहेत हे सांगण्यासाठी सोशल मीडियावर दिवसभर चर्चा होताना दिसून आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे १९७३ कायदाअन्वये मंदिर समिती गठीत करण्यात आली पण बडवे,उत्पात व अन्य सेवाधाऱ्यांनी या विरोधात कोर्टात धाव घेतल्याने हि समिती पूर्णतः स्वतंत्र नव्हतीच असे म्हणावे लागेल,ज्या बडवे व उत्पात या प्रमुख सेवाधाऱ्यांचा मंदिराच्या व्यवस्थापनात वरचष्मा होता त्याच्या समाजातील किमान एक सदस्य समितीचा सदस्य असला पाहिजे हि अट घालून नाडकर्णी समितीच्या मूळ हेतूलाच छेद दिला होता.त्याचीच परिणीती म्हणून पारंपरिक वर्चस्व असलेले, पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रात उठबस असलेले,सम्पर्क असलेले या दोन्ही समाजातील अनेकजण समिती सदस्य होत गेले.सुप्रीम कोर्टाचा जानेवारी २०१४ चा निकाल येई पर्यंत खऱ्या अर्थाने हि समिती ही स्वतंत्र नव्हती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.शासनाने नियुक्त केलेले समिती अध्यक्षांसह अनेक सदस्य हे बाहेरील असायचे आणि आमच्या सहकार्या शिवाय समितीचे कामकाज चालू शकत नाही असा प्रचंड तोरा असलेले अनेक जण या शहरात होते,येथील सामाजिक व राजकीय वर्तुळात पर्याय नव्हता तो आपलाच शब्द प्रमाण मानला जाणार याची खात्री असलेले अनेकजण होते.आणि परंपरेच्या जोखडावर श्रद्धा म्हणून जिल्ह्यातील,राज्यातील अनेकांनी अशा लोकांचा ‘ आशीवार्द’ पाठीशी राहावा म्हणून सन्मानाच्या दक्षिणेचे शस्त्र वापरले होते.२०१४ मध्ये हे सारे मोडीत निघाले आणि तीथुन सुरु झाली मंदिर व्यवस्थापन कसे वाईट अथवा चांगले आहे याची स्पर्धा.आणि या स्पर्धेत खऱ्या अर्थाने गोची झाली ती कमरेवर हात ठेवून उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाची आणि समितीच्या पदाधिकारी व कर्मचार्यांची. जो चुकला तो संपला हा निकष लावत समितीच्या अनेक अधीकारी व कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला पण त्याच वेळी पंढरपुरातील बहुजन चळवळ जागृत झालेली होती. आणि यातून सरळ सरळ दोन गट पडले एक म्हणजे मंदिर प्रशासन कसे वाईट आहे हे फोकस करणारा वर्ग (अर्थात पूर्वी सारे आलबेल होते असाही काहींचा गुप्त सूर असायचाच ) तर दुसरे म्हणजे आम्ही ‘तुम्ही’ सांगेल ते ऐकणार नाही,खरे मानणार नाही या विचाराने मंदिर समिती पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार वर्ग.
सुप्रीम कोर्टाच्या २०१४ च्या निर्णयानंतर समितीने भाविकांच्या सोयीच्या आणि हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले तर यापैकी अनेक निर्णयाबाबत सामान्य भाविकांमधून प्रचंड संतापही व्यक्त झाला.विरोध झाला.पण याच कालावधीत या समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक नस सापडली होती.विरोध कोण करतंय याची माहिती घेवून सोबत कुणाला घ्यायचे याचे सूत्र त्यांना सापडले होते.आणि याचा पद्धतशीर वापर अनेक अधीकारी व कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केला आहे.पण अनेक हितकारी निर्णय समितीने घेतल्यामूळे असा प्रसंग विरळच असायचा.
आताही सोशल मीडियावर असेच वादंग सुरु असून बालाजी पुदलवाड यांच्या कार्यक्षमतेवर व अकार्यक्षमतेवर मोठे दावे केले जात आहेत. अर्थात बालाजी पुदलवाड हे समितीचे तहहयात व्यवस्थापक नाहीत.शासनाने विहित केलेल्या २ अथवा तीन वर्षाच्या कालावधीसाठी त्यांनी हा कार्यभार सम्भाळला आहे.यापूर्वीही जिल्ह्यात तुकाराम मुंडे,zp co सुनील केंद्रेकर सारखे तर तालुक्यात परिमल सिह ,नगर पालिकेचे मुख्यधकारी जीवन सोनवणे यांच्या सारखे अनेक कार्यक्षम,धडाडीचे अधीकारी आले आणि बदली होऊन निघून गेले.त्या मुळे पुदलवाड यांनाही जावे लागेल. पण आज सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात आणि समर्थनात मोठे वाकयुद्ध सुरु असल्याचे दिसून आले.
अर्थात समारोप करताना मला एव्हढच नमूद करायचे आहे. बालाजी पुदलवाड याना त्यांनी पदभार घेतल्या पासून कुणाला तरी दर्शनास सोडा म्हणून कधीही फोन केला नाही.आणि जेव्हा फोन केला तेव्हा समितीच्या एखाद्या निर्णयाविरोधात जाब विचारण्यासाठी, प्रसंग,घटना याची माहिती विचारण्यासाठीच आणि त्या मुळेच आम्ही फोन कशासाठी करतोय हे माहिती झाल्यामुळे बालाजी पुदलवाड यांनी कदाचित आमचा नंबर सेव्ह करून फोनही उचलला नाही हा भाग निराळा.
– राजकुमार शहापूरकर (संपादक : पंढरी वार्ता)