माढा विधानसभा मतदार संघात पंढरपुर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश २००७ मध्ये झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेत करण्यात आला.माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी विधानसभेत ६ वेळा प्रतिनिधित्व केले आहे.तर २००९ मध्ये मतदार संघ पुन्हा रचना झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा या माढा मतदार संघात समावेश करण्यात आला त्यानंतरही तीन वेळा बबनदादा शिंदे यांनी या मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला.खरे तर २००९ पूर्वी माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील ४२ गावात जो काही थोडाफार संर्पक होता तो केवळ पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास ऊस गाळपास पाठवणाऱ्या शेतकऱ्यांशी.दर दहा दिवसाला बिल आणि मागेल जेव्हा ऍडव्हान्स हि विठ्ठलराव शिंदे कारखान्याने जपलेली परंपरा पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या कारखान्याकडे ऊस गाळपास पाठवण्यास कारणीभूत ठरत गेली.तर दुसरीकडे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्याशी असलेले घनिष्ठ स्नेहबंध आणि जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार प्रशांत परिचारक,माजी आमदार बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे यांच्यातील राजकीय मैत्री वेळोवेळी अधोरेखित होत गेली तर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात देखील ४२ गावातील परिचारक समर्थक आणि शिंदे समर्थक हे विविध निवडणुकीत एकत्र आल्याचे दिसून आले आहे.पंढरपूर तालुक्यच्या राजकारणात परिचारक हे कुठल्याही पक्षात असोत त्यांचे समर्थक मात्र परिचारक पार्टी आणि पांडुरंग परिवार याच्याशीच बांधिलकी मानत आले आहेत हे उघड सत्य आहे.आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात ४२ गावातील परिचारक गटाने विधानसभा निवडणुकीत प्रसंगी पक्ष बाजूला ठेवून माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांना सहकार्य केल्याचे दिसून आले आहे.
२०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरवले गेले.माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रमाणे याही वेळी ४२ गावातील मतदार आपल्या पाठीशी राहतील फक्त राष्ट्रवादी कॉग्रेसचे घड्याळ चिन्ह नको आणि भाजपचे कमळ चिन्ह नको आपण अपक्षच लढू असा आग्रह रणजित शिंदे यांनी धरल्यानेच शेवटी बबनदादांनी अपक्ष निवडणूक लढविण्यास संमती दिल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.पुढे रणजित शिंदे अपक्ष उमेदवार म्हणून सफरचंद चिन्ह घेऊन अपक्ष लढले आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात भाजपचे बलाढ्य नेते अशी प्रतिमा असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूरच्या ४२ गावातील अनेक प्रमूख नेत्यानी,समर्थकांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा प्रचार केला आणि तिकडे याच मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मिनलताई साठे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती.
माढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी तीन महिन्यात तयारी करून माढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट पंढरपूरच्या गावातून मताधिक्य तर मिळविलेच पण माढा तालुकयातील ७८ गावातून मोठे मताधिक्य मिळेल असा आत्मविश्वास असलेल्या रणजित शिंदेंना त्यांच्याच तालुक्यात देखील धक्का दिला.अर्थात आमदार अभिजित पाटील यांना मिळालेले मते हे केवळ अभिजित पाटील यांना नव्हती तर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील ती जनभवनाही होती.आणि अशातच माजी आमदार बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांच्या स्वभाव वैशिष्ट्याची तुलनाच होऊ शकत नाही अशी भावना दस्तूर खुद्द शिंदे समर्थकात देखील असल्याचे दिसून आले होते.अशातच विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर रणजित शिंदे हे ४२ गावातील आपल्या समर्थकांवर देखील फारसा विश्वास ठेवत नाहीत अशीच चर्चा झाली होती.
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले संजयमामा शिंदे आणि विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांना ४२ गावातील बहुतांश परिचारक समर्थक गाव नेत्यांनी सहकार्य केल्याचे उघड गुपित आहे.तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील परिचारक समर्थकांनी हीच भूमिका पार पडल्याचे दिसून आले आहे.आणि कदाचित यामुळेच यंदा विधान परिषदेची त्यांची भाजपकडून संधी हुकली असावी.
पण पुढे समीकरणे बदलली स्व.अजितदादांचे घड्याळ देखील न चालणारे रणजीत शिंदे हे मागील वर्षी थेट भाजपात दाखल झाले आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात रणजित शिंदेंना माढा तालुक्याचे पालकमंत्री अशी पदवीही बहाल केली आणि आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात पालकमंत्र्यांनी दिलेल्या उपाधीची खिल्ली देखील उडवली होती.
आता कमळधारी भाजपवासी रणजीत शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे ५ जुलै रोजी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते उद्दघाटन होत आहे. त्याची पत्रिकाही सोशल मीडियावर फिरत आहे मात्र या पत्रिकेत विठ्ठल परिवारातील ज्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत सफरचंदाला मताधिक्य मिळावे म्हणून प्रयन्त केले त्या पैकी पुढे भाजपात आलेले गणेश पाटील आणि समाधान काळे यांचे तरी नाव टाकायला पाहिजे होते अशी चर्चा विठ्ठल परिवारात होत आहे.यावरूनच माढ्यातील शिंदे गट आणि पंढरपूर तालुक्यातील परिचारक गट यांची पक्ष बाजूला ठेवत चालत आलेली युतीच पुढे चालू राहणार आहे याची हि उदघाटन पत्रिका धोतक आहे अशीच चर्चा विठ्ठल परिवारात होऊ लागली आहे.