पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या डॉ. वृणाल मोरे, डॉ. मिथुन मणियार व डॉ. प्राजक्ता खुळे यांनी फाईल केलेल्या पेटंटला भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून मान्यता प्राप्त झाली आहे.’ अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.
फार्मसीच्या क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन गोष्टींचे संशोधन चालू असते. फार्मसी क्षेत्रात औषधनिर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या तसेच फार्मसी महाविद्यालये आहेत त्या ठिकाणी विविध पद्धतीच्या उपकरणांची आवश्यकता असते. स्वेरी फार्मसीच्या डॉ. वृणाल मोरे, डॉ. मिथुन मणियार व डॉ. प्राजक्ता खुळे यांनी ‘ऑटोमॅटिक टॅबलेट वेट व्हेरिएशन’ या नावाचे उपकरण बनवले आहे. हे उपकरण टॅब्लेट्स साठी भारत सरकारच्या इंडियन फार्मास्टँडर्ड्स जे की ‘स्वास्थ्य एवंम परिवार कल्याण केंद्र मंत्रालय’ यांनी प्रसिद्ध केलेल्या टॅब्लेट्स तपासणी साठी दिलेल्या चाचण्यांमधील वेट व्हेरीएशन चाचणी साठी उपयुक्त होणार आहे. आत्तापर्यंत ही तपासणी मॅन्युअल पद्धतीने होत होती. त्यासाठी बरीच आकडेमोड करावी लागत होती. आता स्वेरी फार्मसी च्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या या उपकरणामुळे कमी वेळात आणि अचूकपणे ही प्रक्रिया करता येणार आहे. फार्मसी व वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या टॅब्लेट्सचे वजन या उपकरणाच्या सहाय्याने सहज आणि तंतोतंतपणे मोजता येणार आहे. या मशीनची हाताळणी ही एकदम सोपी आहे. एकाचवेळी घेतलेल्या वेगवेगळ्या टॅबलेट्सचे सरासरी वजन सुद्धा यामध्ये मोजले जाऊ शकते. या उपकरणाच्या वापरातून होणाऱ्या फायद्यांमुळे लागणारे अतिरिक्त मनुष्यबळही कमी होईल व मानवाच्या हातुन ज्या चुका होतात त्याही टाळता येतील. टॅब्लेट्स वेट व्हेरिएशनच्या इतर ज्या मशीन आहेत त्यांच्या तुलनेत या मशीनमध्ये मायक्रोकंट्रोलर, एलसीडी डिस्प्ले, आणि बझ्झर वापरला आहे. ज्यामुळे टॅब्लेट्स ची उच्चतम वजन सेट केलेली पातळी आणि कमीत कमी सेट केलेल्या पातळी यामध्येच वजन ग्राह्य धरले जाईल. ज्या मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी वजनाच्या गोळ्या आहेत त्यांना आपोआप नाकारले जाईल. या मशीनमध्ये अद्ययावत डिस्प्ले वापरले आहे. ज्यात टॅब्लेट्सच वजन, घेतलेल्या टॅब्लेट्सचे सरासरी वजन तसेच त्या टॅबलेट चाचणी नंतर योग्य किंवा अयोग्य आहेत हे दर्शविले जाते. यापूर्वीच्या मशीन मध्ये फक्त एकावेळी एक टॅबलेटचे वजन घेतले जात होते. आता या डिस्प्लेमध्ये तीन प्रकारच्या रिडिंग दिसू शकतील. ह्यातील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर वजनासाठी ठेवल्या गेलेल्या बॅच मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त टॅब्लेट्स जर निर्धारित मर्यादेच्या बाहेर असतील तर त्यामध्ये असणारा बझ्झर वाजेल. अशा या नवीन उपकरणामुळे टॅबलेट विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांचे अधिकचे परिश्रम वाचणार आहेत. एकूणच हे उपकरण फार्मसी च्या कंपन्यामध्ये व फार्मसी महाविद्यालामध्ये फायदेशीर आहे असे या पेटंट चे मुख्य संशोधक डॉ. वृणाल मोरे यांनी सांगितले. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून ह्या उपकरणाच्या पेटंटचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हे पेटंट फार्मसी कॉलेजचे डॉ. वृणाल मोरे, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डॉ. प्राजक्ता खुळे, डॉ. दत्तात्रय यादव व प्रा.सिद्दिका इनामदार यांनी फाईल केले होते. त्यावर बरेच दिवस काम केल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.