ताज्याघडामोडी

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका 

माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिह निंबाळकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीत ऐन निवणुकीच्या पूर्वी काही दिवस कॉग्रेस मधून भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ज्यांच्यामुळे त्यांना मताधिक्य मिळाले तेच पुढील लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवारीचे दावेदार ठरतील हे लक्षात आल्याने अगदी २०२० पासूनच पद्धतीशीर मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांना लांब ठेवण्यास,त्यांना विचारात न घेता माळशिरस तालुक्यात स्वतःचे बस्तान बसिवण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरु केला अशी टीका मोहिते पाटील समर्थक करताना दिसून येत आहेत.  मात्र पुढे मोहिते पाटील यांना खासदार निंबाळकर यांची डबल गेम लक्षात आल्यानेच मोहिते पाटील यांनी खासदार निंबाळकर यांना दूर ठेवण्यास सुरवात केली.जे फलटण तालुक्यात घडले ते राजकारण आपल्या तालुक्यात आपल्याशी नको या भावनेनेच मोहिते पाटील सावध झाले होते आणि त्यांच्या समर्थकांना आलेल्या अनुभवामुळे तेही यास दुजोरा देत आल्याचे दिसून आले. 

   पण याच दरम्यान २ जुलै २०२३ रोजी खासदार निंबाळकर यांचे ग्रह पालटले आणि राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये फूट पटली.सोलापूर जिल्ह्यातील या पक्षाचे तिन्ही आमदार राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटात सामील झाले.यात माढा लोकसभा मतदार संघातील माढा विधासभा मतदार संघाचे डबल हॅट्रिक आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे अजित पवार गटात गेल्याने पर्यायाने खासदार निंबाळकर यांना या मतदार संघात बळ मिळाले.अशातच सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात मागील दशक भरापासून आमदार शिंदे बंधू आणि मोहिते पाटील यांच्यातील असलेले राजकीय हाडवैर जिल्ह्यास परिचित आहे.याचाच पद्धतशीर फायदा उठवण्याचा प्रयत्न खा.निंबाळकर यांच्याकडून झाल्याचे बोलले जात आहे.देशपातळीवर उचांकी गाळपाचे रेकॉड मोडलेला साखर कारखाना अशी विट्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे.तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघात मानहानीकरक पराभव पत्करलेल्या मोहिते पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे विजय शुगर कारखाना काढला पण चालवता आला नाही.डिसीसी बँकेचे कर्ज घेतले पण फेडता आले नाही .शेतकऱ्यांनी ऊस दिला पण बील देण्यात अडचणी आल्या.शेवटी आमदार बबनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने विजय शुगर कारखाना लिलावात विकत घेतला आणि विजय शुगर हे नाव हटवून विठ्ठलराव  शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक २ म्हणून हा कारखाना आजतागायत यशस्वी वाटचाल करीत आहे.
      दुसरकीकडे याच विजय शुगर काढील थकीत ऊसबिला साठी १३८ ची केस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने केली.सभासदांचा अतिरिक्त ऊस गाळपास विजय शुगरला पाठवला पण त्याची बिलं दिली गेली नाहीत.डिसीसी बँकेने कारखाना लिलावात काढला तरी दिली गेली नाहीत,केस कोर्टात सुरु झाली.
                १९९६ साली आमदार बबनदादा शिंदे हे माढ्यातून  अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले.युती सरकारला पाठिंबा दिला पण मंत्रिपदाची ऑफर नाकारत केवळ सीना-माढा उपसा योजनेचा हट्ट धरला.त्यांच्या याच कार्याची दखल घेत माढा विधानसभा मतदार संघातील जतनेने आमदार बबनदादा शिंदे यांची पाठराखण चालूच ठेवली.जिल्ह्याच्या राजकरणात  अगदी २००८ पर्यंत आमदार बबनदादा शिंदे हे मोहिते पाटील यांच्या समवेत असल्याचे चित्र दिसून आले.मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदार संघ पुनर्र्चनेत माळशिरस विधानसभा मतदार संघ राखीव झाला आणि माढा मतदार संघावर मोहिते पाटील यांनी डोळा ठेवला.शरद पवार यांच्या दरबारी मोहिते पाटील यांचे असलेले वजन लक्षात घेत आमदार बबनदादा शिंदे हे झुकतील आणि त्याग करतील अशी अपेक्षा मोहिते पाटील यांना होती पण माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे समर्थकांनी माढा विधानसभा मतदार संघातून मोहिते पाटलांच्या उमेदारीस प्रचंड विरोध केला.१९९६ पासून अनेक अनेक राजकीय पदाचा केवळ माढा तालुक्याच्या विकासासाठी त्याग करीत आलेले आमदार बबनदादा शिंदे हेही अस्वस्थ झाले होतेच आणि त्यांनी माढा विधानसभा मतदार संघावरील उमेदवारीचा हक्क सोडण्यास नकार दिला आणि मोहिते पाटलांचा अभिमान दुखावला.
     २००४ मध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील जनतेने मोहिते पाटील हे जिल्हयाचे एकमुखी नेते आहेत हे झुगारून देण्यास प्रथम सुरवात करीत या कारखान्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या समर्थकांचा दारुण पराभव केला होता.या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी साम,दंड,भेद या त्रिसूत्रीचा वापर केल्याचा रागच करमाळा तालुकयातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी व्यक्त केल्याची चर्चा त्या काळी झाली होती.मात्र मोहिते पाटील हे ज्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये होते त्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे त्याकाळी धाकटी पाती नेतृत्व अशी ओळख असलेल्या अजित पवार यांचा फोटो असलेले मै हू ना चे बॅनर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवणुकीवेळी झळकले होते आणि त्याची  चर्चा जशी राज्याच्या वर्तुळात झाली तशीच ती सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांना विरोध करणे म्हणजे सिहाच्या जबड्यात हात घालणे अशी धारणा पुसून काढणारी ठरली होती आणि यातूनच प्रेरणा घेत माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे समर्थकांनी २००९ माढा विधानसभा मतदार संघावरील मोहिते पाटील यांचे संभाव्य आक्रमण रोखण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांना पाठबळ देत यश मिळवले होते.
     २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या माढातून उमेदारीस होत असलेला प्रखर विरोध लक्षात घेत शरद पवार यांनी त्याग करण्याचे घोंगडे स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या गळ्यात घातले.स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी शरद पवार यांनी कुर्डुवाडीच्या सभेत दिलेल्या पुनर्वसनाच्या शब्दावर विश्वास ठेवत पाळला आणि विजयसिह मोहिते पाटील हे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून दारुण पराभव पत्करत निघून गेले.पंढरपूर तालुक्यात राजकीय बस्तान बसविण्यासाठीच पुढे करकंब येथे विजय शुगर काढला गेला अशी चर्चा झाली पण धैर्यशील मोहिते पाटलांना विजय शुगर काही चालवता आला नाही आणि लिलाव काढून डीसीसी बँकेने विकून टाकला.
    २०१९ मध्ये मोहिते पाटील हे भाजपात गेले.मात्र आमदार बबनदादा शिंदे हे मोदी लाटेतही शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिले.याच दरम्यान माढा तालुक्यातील बबनदादा शिंदे विरोधकांना बळ देण्याचे काम मोहिते पाटील यांनी सुरूच ठेवले.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत साधी ग्राम पंचायत ताब्यात नसलेल्या संजय कोकाटे यांना मिळालेली ७३ हजार मते हि मोहिते पाटील समर्थकांचीच कृपा असल्याची चर्चा झाली.पुढे संजय कोकाटे यांनी सरकार दरबारी असलेले वजन आणि मोहिते पाटील यांची साथ घेत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या तञ् संचालक पदी वर्णी लावून घेतली.याच कारखान्यावर सिद्ध न करता आलेले काटा मारीचे आरोप केले.खुद्द कारखान्याचा तद्न्य म्हणवणारा संचालकच कारखान्यावर आरोप करू लागल्याने आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे कारखान्याचे सभासद दुखावले आणि त्यांनी या कारखान्यासाठी सरकारने दिलेले भाग भांडवल परत करण्याचा निर्णय घेतला.पुढे संजय कोकाटे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा प्रयन्त फसल्याने ईडी कडे तक्रारी करण्याचा सपाटा सुरु केला.
  ईडीकडे करण्यात आलेल्या तक्रारीत किती तथ्य आहे हि बाब गौण परंतु मागील काही वर्षांपासून  ईडी राजकीय विरोधकांवर ज्या पद्धतीने कारवाया करताना दिसून आली.त्या पाहता आमदार बबनदादा शिंदे यांनी देशपातळीवरील नावाजलेला कारखाना अडचणीत येऊ नये,तालुक्यातील विकास कामे थांबू नयेत यासाठी सत्त्ते सोबत गेलेल्या अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला.
     सध्या माढा विधानसभा मतदार संघात आमदार बबनदादा शिंदे हे महायुतीचा धर्म पाळत खासदार निंबाळकर यांच्या विजयासाठी प्रयत्नशील  आहेत.खासदार निंबाळकर यांचें मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गॉडफादर ठरले होते.यंदा यंदा आमदार शिंदे बंधूना कदाचित नाईलाजाने का होईना निंबाळकर यांच्यासाठी मते मागावी लागत आहेत.
    आमदार बबनदादा शिंदे हे कमळासाठी मते मागत आहेत हि बाब त्यांचा अनेक कट्टर समर्थकांना देखील रुचली नाही हे पिंपळनेर येथे झालेल्या त्यांच्या समर्थकांच्या बैठकीतच स्पष्ट झाली आहे पण तूर्तास तरी बबनदादा शिंदे हे यासाठी युती धर्मामुळे हतबल ठरले आहेत अशीच चर्चा आहे.
     माढा तालुक्यातील जनतेला आमदार बबनदादा शिंदे यांची हि अडचण लक्षात आल्याचीही चर्चा यातूनच दादा तुमच्या स्वाभिमानासाठी काय पण अशा भावनेने अखेरच्या क्षणी त्यांचे समर्थक त्यांचा आदेशाचे पालन करतील असेच म्हटले जात आहे.
    दुसरीकडे माढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या ४२ गावात वैयक्तिक बबनदादा शिंदे यांचे समर्थक असलेला वर्ग मोठा आहे.अतिरिक्त उत्पादन हा भागाचा मोठा प्रश्न आहे आणि अशावेळी विठ्ठलराव शिंदे युनिट १ गंगामाई नगर आणि युनिट २ पूर्वीचा लिलावात निघालेला विजय शुगर व आताच युनिट क्रमांक २ यांच्याशी जोडला गेलेला ऊस उत्पादक शेतकरी,तोडणी वाहतूकरदार,पाहिजे तेव्हा उचलचे लाभार्थी,आमदारकीच्या माध्यमातून समस्या सुटलेले गावपुढारी,ग्रामस्थ यांचे पाठबळ वैयक्तिक आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे यांच्या पाठीशी आजही ठाम असल्याचे चित्र आहे.सध्या निवडणुका लोकसभेच्या आहेत आणि आमदार शिंदे समर्थकही तुतारीचा गजर करू लागले आहेत.मात्र अखेरच्या क्षणी स्थानिक राजकारण लक्षात घेत माढा विधानसभा मतदार संघातील आमदार बबनदादा शिंदे समर्थक तुतारीचा गजर करणार कि आमदार बबनदादा शिंदे यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवत घड्याळाचे काटे उलटे फिरू नयेत यासाठी घड्याळ मित्र कमळाला मदत करणार हे निकालांतरच स्पष्ट होणार आहे !   
                                                        
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago