काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर प्रकल्प? हे थोडं प्रश्नार्थक वाटतंय? खरेच याची गरज आहे? पंढरपूर आणि वाराणसी पूर्णपणे दोन वेगळे तीर्थक्षेत्र आहेत आणि त्यांच्या भौगोलिक परिस्थिती आणि विकासाच्या गरजा ही वेगळ्या आहेत. काशीला रोज 50 हजार ते 1 लाख लोक येतात तर पंढरपूरला येणारी संख्या 10 हजार ते 20 हजार इतकी आहे. वाराणसीची गणना भारतात मुख्य मंदिर म्हणून केली जाते, आणि त्याला इतिहास पण थोडा धार्मिक आणि राजकीय वादात आहे, याउलट पंढरपूर ला येणाऱ्या पैकी 95% लोक महाराष्ट्रातील आहे. वाराणसीला येणारा सर्व भाविक वर्ग हा वेगळा आहे आणि पंढरपूरला येणारा 70% भाविक हा सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी वर्ग आहे आणि त्यांच्या अपेक्षा ही थोडक्या आहेत. किंवा येथील भाविकांची कोणत्याही प्रकारची तशी मागणी देखील नाही. वाराणसी ला झालेला कॉरिडॉर हा 400 बाय 75 मिटरचा आहे आणि तेच प्रस्थापित मॉडेल पंढरपुरात 800 बाय 120 मिटरचे आहे असे समजते. वास्तविक पाहता पंढरपूर येथील सर्व जनता ही इंजिनिअर, अर्किटेक्ट किंवा बांधकाम क्षेत्राशी निगडीत नाही. त्यामुळे प्रशासनाने कागदोपत्री ठेवलेला आराखडा हा त्यांना मुळात समजेलच असे नाही. आणि ऐवढ्या मोठ्या प्रमाणात कॉरिडोर करण्याची खरेच गरज आहे का? असा विचार करून पंढरपूरकरांची भावना लक्षात घेवून सदरच्या पंढरपूर कॉरिडॉरला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा विरोध असून याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून त्यानंतर त्यांनी याबाबत संपूर्ण कागदपत्रे घेवून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवार दि.22 नोव्हेंबर 2022 मुंबई येथे बैठक लावलेली आहे. यात शहरातील बाधित, व्यापारी, राजकीय नेते यांच्यासह विविध मान्यवरांचे शिष्टमंडळ जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करू व त्यानंतर अजितदादांनी संागितले की पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात सदरच्या प्रश्नाची लक्ष्यवेधी मंाडून सरकारला धारेवर धरत पंढरपूरकरांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे,अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सध्या पंढरपुरातील जनता ही पुर्णपणे भयभित झाली असून जनतेतून या कॉरीडॉरला विरोध होत आहे. यापूर्वीच चौफाळा ते पश्चिमद्वार व संत नामदेव पायरी ते महाद्वार चौक हा रस्ता सन 1982 सालीच रस्ता रूंदीकरण झालेला आहे. मग पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा रस्ता रूंदीकरण करणे कितपत योग्य आहे.
प्रस्थापित मॉडेल मध्ये पार्किंग आणि कॉम्प्लेक्स ह्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत त्या नक्कीच योग्य आहेत पण लोकांची घर, दुकान न पाडता ही त्या गोष्टी शक्य आहेत आणि मुबलक जागा ही नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. याच आराखड्यात मांडलेले क्रमांक 3,7,8,9,11 हे खरेच इथे लोकांची घर, दुकान घेऊन कॉरिडॉर करूनच साध्य होऊ शकतात का? प्रत्येक वारकरी संप्रदायाचे, वारकरी फडाचे स्वतः चे नियोजित मठ, धर्मशाळा आहेत जिथे ते भजन कीर्तन करतात, पण त्यांचेच मठ, धर्मशाळा पाडून पुन्हा तिथेच भजन हॉल बांधणे कितपत योग्य आहे? वास्तविक पाहता संत तनपुरे महाराज मठाच्या मागील बाजूस उभारलेले मोठे वारकरी भवन (नाट्यगृह) हे ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करायला पुरक आहेत. तसेच नगर पालिकेकडून यापूर्वी 65 एकर क्षेत्र हे दिंड्यासाठी व वारकऱ्यांसाठी आरक्षित केला आहे. आणि सध्य स्थितीत तेथे अजुन जागा संपादित केली जाणार असल्याचे समजते. संपूर्ण पंढरपूर शहराचे क्षेत्रफळ व 65 एकर व नव्याने संपादित होणारे क्षेत्र याचे क्षेत्र हे पंढरपूर शहरापेक्षा जास्त होईल.
दर्शन मंडपसारख्या मोठ्या ठिकाणी ग्रंथालय, प्रशासकीय इमारती इ च्या गरजा पूर्ण होत असताना नवा कॉरिडॉर करून लोकांची घर, दुकान उद्ध्वस्त करणे कितपत योग्य आहे? या आधी मांडलेल्या आराखड्यात मंदिराकडे कडे येणारे सर्व नियोजित रोड मोठे होत आहेत, रोड पण त्यात नियोजित आहे आणि पार्किंगची सोय मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यातच 80% हुन अधिक सर्व गर्दीच्या आणि पार्किंगच्या अडचणी सुधारित होत असतील तर कॉरिडॉरचा हा प्रस्ताव लोकांवर जबरदस्ती लादला जातोय असे प्रकर्षाने जाणवतंय.
पंढरपूरकर म्हणून आम्ही नक्कीच विकासाच्या बाजूने आहोत, त्यासाठी नियोजित केलेले सर्व महत्वाचे रस्ते मोठे होत आहे, पार्किंग सोय होत आहे तर कॉरिडॉर ची नक्की गरज आहे का? मुळात वर्षातील मोजके 15 ते 20 दिवस असतील जिथे भाविक भक्तांचे हाल होतात, त्यासाठी थोडे नियोजन केले तरी त्या अडचणी व्यवस्थित पणे सोडवता येतील. वाराणसी च्या धर्तीवर कॉरिडॉर करणे योग्य आहे की इथल्या स्थानिक सोयी सुविधांचा आढावा घेऊन नियोजन बद्ध विकास करणे योग्य आहे हे नीट तपासले गेले पाहिजे. कॉरिडॉर मध्ये बाधित लोक आहेत त्यांचा पण कुठेतरी विचार व्हावा.
जे लोक पिढ्यान पिढ्या इथे राहत आहे, पिढीजात उद्योगधंदे, व्यापार करत आहेत त्यांची दुकाने, घर पाडून हा कॉरिडॉर चा विकास करणे कितपत योग्य आहे? आणि त्या बाधित लोकांचे 100% पुनर्वसन होणे कितपत खात्रीशीर आहे? बाधित लोकांमध्ये 50% हुन अधिक लोक हे रोजच्या झालेल्या कमाईवर घर चालवतात, आज त्यांची घर, दुकानच जात असतील तर त्यांनी जगायचं कसं? म्हणजे आमच्या पूर्वजांनी इथे जागा, घर घेऊन व्यापार मांडून पुढच्या पिढीला शाप दिलाय असे म्हणावे लागेल? ह्या लोकांचे पुनर्वसन होईल च याची खात्री काय? आणि त्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला कुणाला जबाबदार धरावे अथवा त्यांनी आपले दुःख कुणापुढे मांडावे?
इतिहासात डोकावून बघितले तर या आधी 2 मास्टर प्लॅन झालेले आहेत, त्या लोकांचे अजून पुनर्वसन योग्यरीत्या झालेले नाही. त्यात नवीन आलेल्या कॉरिडॉर ची भीती ही खूप क्लेशदायक आहे ही भावना आपण समजून घ्यावी. या आधी झालेली मोठा खर्च करून झालेली विकासकामे, उदाहरणार्थ सार्वजनिक शौचालये. आज या शौचालयांची अवस्था काय आहे याची नियोजित पाहणी करावी. नक्की किती भाविक लोकांना याचा फायदा होतोय? ही शौचालयांमध्ये आज दारूच्या बाटल्यांचा ढीग साचलेला आहे, भरपूर गैरघटना घडलेल्या आहेत, याला जबाबदार कोण? आणि याच अनुषंगाने नव्याने येऊ पाहणाऱ्या कॉरिडॉर चा कितपत लोकांना फायदा होईल याचा घांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
लोकांची घर, दुकान उद्ध्वस्त करून हा होणारा कॉरिडॉर नक्की गरजेचा आहे का? विना कॉरिडॉर चा पण पूर्णपणे नियोजनरीत्या विकास, सोयीसुविधा उपलब्ध करता येऊ शकतात ह्याचा पण आपण तज्ञ मंडळी मार्फत विचार करावा. स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह, 200-300 वर्षाचा ऐतिहासीक महत्व असलेले वाडे, धर्मशाळा यांचा कॉरिडॉर साठी बळी देणे हे कितपत महत्वाचे असेल हा संशोधनाचा विषय च म्हणावा लागेल? बाधित होणारी जवळपास सर्व लोक ही सर्वसामान्य जनता आहे, शासनाच्या ताकतीपुढे आम्ही पूर्णपणे हतबल आहोत. पण त्यांच्या भावनांचा, त्यांच्या संसाराचा कुठेतरी विचार नक्की व्हावा. सुनियोजित रित्या रस्ते, पार्किंग च्या सोयी सुधारून विना कॉरिडॉरचा पंढरपूरचा सर्वांगीण विकास व्यवस्थित होऊ शकतो. तरी वाराणसीच्या धर्तीवर विचार न करता इथल्या स्थानिक लोक, वारकरी परंपरा, संस्कृती, ऐतिहासिक वास्तू इ सर्व गोष्टींचा विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.