वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी युवकची पंढरपुरात तीव्र निदर्शने
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सुरज चव्हाण यांच्या आदेशानुसार दि.1 सप्टेंबर रोजी वाढत्या महागाई विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसील कार्यालय येथे महागाई,बेरोजगारी, ईडी च्या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. पंढरपूरचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी स्विकारले. देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील होत आहे. महागाईवर नियंत्रण आणण्याऐवजी वरचेवर महागाईत वाढ केली जात आहे. सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे 50 खोके महागाई वाढतेय एकदम ओके अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनता मोदी सरकारला माफ करणार नाही. 2024 ला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, राज्यात आमदारांचा घोडेबाजार झाला. राज्याच्या राजकारणाचा स्तर खाली जात आहे हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. सुडबुद्धीने कार्यवाही करून सुडाच राजकरण करत सत्ता मिळवणे हे भाजपचे धोरण आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला भाजप नेते जात आहेत. देशात महागाई ही सर्वसामान्य गरीब व युवक यांना परवडणारी नाही. देशात आणि राज्यात बेरोजगारी वाढत चालली आहे . या बेरोजगारी च्या अशा या परिस्थितीमध्ये देशात आणि राज्यात धार्मिक गोष्टीवर राजकारण केले जात आहे . हे चुकीचे असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते यावर आवाज उठवत राहतील. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी विरोधी पक्ष “50 खोके महागाई ओके” च्या घोषणा देतेवेळी एक आमदार म्हणतात “तुम्हाला पण पाहिजे का ??” याचा अर्थ सबंधित आमदारांनी आर्थिक गैरव्यवहार झाला आहे याची एक प्रकारची कबुली दिली आहे. ईडीने याची चौकशी करावी. हे सर्व परिस्थिती राज्यातील आणि देशातील जनता पाहत आहे, असे ही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
यावेळी 50 खोके महागाई एकदम ओके, जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गुवाहाटी, महागाई कशासाठी आमदारांसाठी, महागाईने दुखते डोके…गद्दारांना 50 खोके, बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.