पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी आमदार समाधान आवताडे हे सुरुवातीपासून आग्रही राहिले आहेत.मे २०२१ मध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर त्यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी पाठपुरावाही सुरु केला होता.त्यावेळी राज्यात सत्त्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला परंतु ठोस निर्णय होऊ शकला नव्हता.आता राज्यात सत्तांतर झाल्याने आमदार समाधान आवताडे यांनी एमआयडीसी साठी पुन्हा पाठपुरावा सुरु केला आहे. सदर पत्रामध्ये आ. आवताडे यांनी म्हटले आहे की, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर हे भारताची दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान व उभ्या महाराष्ट्राचे श्री विठ्ठल आराध्य दैवत आहे. श्री विठ्ठल भगवंतावर असणाऱ्या श्रद्धेपोटी दरवर्षी लाभो वारकरी भाविक हे चैत्री, आषाढी, कार्तिकी, माघी या यात्रेसाठी वारी रूपामध्ये पंढरपूर शहरामध्ये दाखल होतात. पंढरपूरची ही वारी फक्त महाराष्ट्र राज्यापर्यंत मर्यादित न राहता या वैष्णव सोहळ्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यातून एक कोटीपेक्षा अधिक वारकरी भाविक जमा होतात. श्री. क्षेत्र पंढरपूर शेजारी कासेगाव, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, ही निमशहरी म्हणून गावे वसलेली आहेत. पंढरपूर शहर व ४ निमशहरी गावांची लोकसंख्या २ लाख आहे. एवढे मोठे प्रादेशिक आणि लोकसंख्या क्षेत्र असणाऱ्या गावातील अनेक युवक हे रोजगारानिमित्त राज्यातील व परराज्यातील शहराकडे विस्थापित होत आहेत. महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून एस. टी., रेल्वे, खाजगी वाहनाने अनेक लोक पंढरपूर येथे येत असतात. तसेच पंढरपूर शहराला जोडणारे पालखी मार्ग, राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत.