मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट,मुख्यमंत्री म्हणाले मी पाठीशी उभा आहे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार राहिलेले संजय कोकाटे यांनी माढा विधासभा मतदार संघात ५ वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार बबनदादा शिंदे यांच्याशी एकाकी झुंज देत जवळपास ७८ हजार मते मिळविली होती.या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही संजय कोकाटे यांनी माढा मतदार संघातील अनेक प्रश्नाबाबत व सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांकडून शिवसेनेस अडचणीत आणण्याचा कसा प्रयत्न होतोय या बाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकदा पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने संजय कोकाटे हे नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून होत आली होती.
सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपध्दतीबद्दल तसेच जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत केवळ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामास निधी दिला जातो,शिवसैनिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते याकडे देखील संजय कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
शिवसेनेचे उमेदवार राहिलेले संजय कोकाटे यांना विधानसभा निवडणुकीत ७८ हजार मतदारांनी मतदान केले होते आणि आपण या मतदारांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत असताना पक्षीय पातळीवर दखल घेतली जात नसेल या उलट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पारड्यात झुकते माप टाकले जात असेल तर मतदारांसमोर जायचे तरी कसे असा सवालही संजय कोकाटे हे वेळावेळी जाहीरपणे विचारत असल्याचेही दिसून आले.
आणि याचीच परिणीती म्हणून संजय कोकाटे आणि मोहोळ विधासभा मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत मतदार राहिलेले सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून यावेळी आमदार शहाजीबापू पाटील हेही उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जावा सरकार , शासन म्हणून जी ताकद पाहिजे ती सर्व मी आपल्या पाठीशी उभी करेन असे आश्वासन दिल्याचे समजते.