गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण द्या -दिलीप स्वामी
दिवसेंदिवस शैक्षणिक पद्धतीत बदल होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दशसूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला असून यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध विषयाचे आधुनिक शिक्षण द्यावे. यासाठी ज्ञानातील आधुनिकता व नव पद्धतीच्या माहितीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत पंढरपूर व मंगळवेढा तालक्यातील मुख्याध्यापकांची दशसूत्री कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी श्री. स्वामी बोलत होते. कार्यशाळेला माध्यमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, बजरंग पांढरे तसेच पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
श्री.स्वामी म्हणाले, विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित रुची संपन्न व स्वावलंबी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणतज्ञ, पालक व शिक्षक यांच्याशी चर्चा करून आणि केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दशसूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी सजगतेने काम करण्याची गरज आहे. शिक्षकांनी अध्ययन स्तराची निश्चिती करुन स्पर्धाक्षम व कौशल्याधारित विद्यार्थी तयार करावेत. आरोग्यपूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी तयार करावेत. मुलांमधील सुप्त गुण शोधून त्यांच्या गुणांना वाव द्यावा. आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगा.
शिक्षणापासून कोणतेही मुले वंचित राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न करा. पालक मेळावा घेऊन त्यांना दशसुत्री कार्यक्रम समजावून सांगा. जिल्हा परिषदेच्या शाळेमधील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या, असेही श्री. स्वामी यांनी सांगितले.
‘ हर घर तिरंगा’ जिल्ह्यात साडेचार लाख तिरंगा ध्वज
भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना तसेच प्रत्येक घरावर ध्वज फडकविला जाणार आहे. या उपक्रमासाठी साडेचार लाख ध्वज बचत गटाच्या माध्यमातून खरेदी करण्याचे नियोजन केले असल्याचे श्री. स्वामी यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी प्रत्येक गावातून मागणी नोंदवली असून ध्वज लावण्याबाबतचे नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी ग्रामसभा, प्रभात फेरी, शाळेमध्ये निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम सुरु असल्याचे श्री. स्वामी यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविकात श्री. लोहार यांनी प्राथमिक शिक्षणाचे महत्व सांगितले.