सर्वेक्षणासाठी तातडीने बैठक घेण्याची मागणी
२०१२ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने पंढरपूर- विजयपूर रेल्वे मार्गाची घोषणा केली होती.यावेळी या मार्गाचे लवकरच सर्व्हेक्षण केले जाईल अशी माहितीही देण्यात आली होती.पुढे २०१५ मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या.परंतु पुन्हा घोडे पेंड खाल्ले आणि सर्वेक्षणाचे काम थांबले.मात्र आता विजयपूर-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून आमदार समाधान आवताडे यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पंढरपूर -विजयपूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे यासाठी तातडीने बैठक घेतली जावी व या रेल्वे मार्गाच्या कामातील प्रशासकीय अडथळे दूर केले जावेत अशी मागणी केली आहे.
या बाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या पत्रात या रेल्वे मार्गाच्या कामाबाबत आलेल्या अडचणी मांडण्यात आल्या आहेत. पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.कर्नाटक सह दक्षिण भारतातून भाविक पंढपुरला विठ्ठल दर्शनासाठी येत असतात तर विजयपूर हे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.तसेच या भागात मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादने घेतली जातात.हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास आला तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे.
या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणा बाबत पुणे रेल्वे बोर्डाने नुसार प्रस्ताव दिला होता.मात्र तो जून २०१८ मध्ये स्थगित करण्यात आला.आता आमदार समाधान आवताडे यांनी या बाबत पुन्हा पाठपुरावा सुरु केला असून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूर या तीर्थक्षेत्राचे म्हत्व लक्षात घेत हजारो कोटी रुपये खर्च करून पंढरपूरकडे येणारा प्रत्येक रस्ता चौपदरीकरण केला आहे.आता केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे पंढरपूर-विजयपूर रेल्वे मार्गा बाबत आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन या रेल्वे मार्गासाठी तातडीने हालचाली सुरु करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.