कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने तसेच विविध प्रवर्गातील सहकारी संस्था यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.त्यामुळे अनेक सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले तर अनेक सहकारी साखर कारखान्यच्या विद्यमान संचालक मंडळास कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली होती.सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी,विठ्ठल सहकारी,सहकार शिरोमणी व दामाजी सहकारी साखर कारखानाच्या विद्यमान संचालक मंडळाचा ५ वर्षाचा कार्यकाळ मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्येच संपुष्ठात आला होता.मात्र कोरोनामुळे लादलेले निर्बध लक्षात घेत मुदत वाढ देण्यात आली होती.
फेब्रुवारी २०२२ पासून राज्यात कोरोनाचा धोका कमी झाल्याने राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून मागील वर्षभरापासून रखडलेल्या विविध संस्थाच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मागील महिन्यात दिली होती.
आज दिनांक २९ मार्च २०२२ रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी काढलेल्या आदेशानुसार आता १ एप्रिल २०२२ पासून राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
घोडा मैदान जवळच,आता कसोटी भालके सर्मथक आणि विरोधकांचीही
पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाचा आधार असलेल्या व जवळपास २८ हजार ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित असेलल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेले शेकडो कोटीचे कर्ज हा मुद्दा गेल्या ४ वर्षांपासून सातत्याने चर्चेत होता. मात्र नोव्हेंबर २०२१ मध्ये स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर ”विठ्ठल” हा सातत्याने चर्चेत राहू लागला.विद्यमान संचालक युवराज पाटील हे सातत्याने सभासदांच्या गाठीभेटी घेत विठ्ठल कारखान्यावरील कर्ज आणी कारखानातील आर्थिक अनागोंदी याची माहिती सभासदांना व माध्यमांना देत कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपली धडपड सुरु असल्याचे सांगताना दिसून आले.तर दुसरीकडे विद्यमान चेअरमन भगीरथ भालके हे कारखान्या बाबत होत असलेले आरोप खाजगीत फेटाळून लावत असले तरी माध्यमांसमोर ते या बाबत फारसे भाष्य करत नसल्याचे दिसून आले.त्यामुळे आता पर्यत प्रसार माध्यमे आणि बैठका यातून केले जाणारे आरोप प्रत्यारोप विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याच्या निवडणुकीच्या मैदानात केले जाणार आहेत.आणी सभासद कारखान्याचा कारभार कुणाच्या हाती देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.