शास्त्रीय संगीताविषयी नव्या पिढीचे कान तयार व्हावेत : शरद पवार

शंकर महादेवन यांच्या ‘सूर निरागस होवो’ने पुणेकर रसिकांवर मोहिनी

सातारा, सांगली, मीरज अशा दुष्काळी भागाने महाराष्ट्राला गदिमा, पी. सावळराम अशी अनेक रत्ने दिली त्यातील एक स्व. राम कदम. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना राम कदम यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. साहित्य, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करून शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे गौरवोद्गार काढून माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार म्हणाले शास्त्रीय संगीताविषयी नव्या पिढीचे कान तयार केले पाहिजेत, यासाठी असे कार्यक्रम घेणे गरजेचे असते. सत्काराला शब्दात उत्तर न देता प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी ‘सूर निरागस होवो’ हे सूर आळवून कानसेन रसिकांना तृप्त केले.
रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 13वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार ब्रेथलेस गायनामुळे प्रसिद्धीस आलेले लोकप्रिय गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणि कै. वसंतराव देशपांडे यांचा वारसा समृद्ध करणारे युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना आज (दि. 10 मार्च 2022) पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. एक लाख रुपये, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, सुहाना-प्रवीण मसाला उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडीया, प्रतिष्ठानचे निमंत्रक आणि संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड व्यासपीठावर होते. पवार यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. प्रतिष्ठानच्या वतीने पवार यांचा सन्मान तुळशीमाळ घालून करण्यात आला.
प्रतिष्ठानचे कार्य राज्यातील 18 जिल्ह्यात पोहोचले असून भविष्यात प्रतिष्ठानचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा, अशी सदिच्छा देऊन पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी प्रसिद्ध कलाकारांच्या आयोजित मैफलींच्या तसेच महाविद्यालयीन काळातील संगीत रामायणाच्या आठवणी जागविल्या.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, रसिकांच्या नगरीत कलाकारांचा सत्कार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. प्रतिष्ठानविषयी बोलताना ते म्हणाले, अनेक संस्था स्थापन होतात नंतर त्याची संघर्ष समिती बनते अखेरीस त्या मावळतात, परंतु शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. रौप्य म्हणजे बंदा रुपया, तो आजही खणखणीत वाजतो आहे.
शंकर महादेवन यांनी उपस्थित पुणेकर रसिकांशी मराठीत संवाद साधला. ते म्हणाले, राम कदम यांच्या नावे बालगंधर्व रंगमंदिरात माझा मित्र राहुल देशपांडे याच्या बरोबर सन्मान मिळतो आहे, हा माझ्यासाठी आशीर्वादच आहे. पुण्याने माझे प्रत्येकवेळी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. गायक बोलतो हे कंटाळवाणे आहे म्हणून मी गायनातच रसिकांशी संवाद साधतो, असे सांगून ‘सूर निरागस होवो’ या गीताच्या काही ओळी रसिकांना ऐकविल्या. ‘मोरया मोरया’च्या तालावर रसिकांनीही त्यांना टाळ्यांच्या गजरात साथ केली.
राहुल देशपांडे म्हणाले, राम कदम हे अतिशय मोठे संगीतकार होते, त्यांनी माझ्या आजोबांसाठी अनेक गाणी केली आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, परंतु ते व्यक्ती आणि संगीतकार म्हणून अतिशय साधे आणि प्रामाणिक होते. सूरांशी प्रामाणिक असणे हे त्यांचे संगीतकार म्हणून वैशिष्ट्य होते. ‘माझे मन राहो तुझे पायी देवा’ या राम कदम यांनी संगीत दिलेल्या गीताच्या काही ओळी देशपांडे यांनी सादर केल्या.
सुरुवातीस लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रतिष्ठानच्या 25 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. 25 वर्षांपूर्वी प्रतिष्ठानचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगीचे छायाचित्र त्यांनी पवार यांना या प्रसंगी भेट दिले.
प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार विवेक थिटे आणि गजानन केणे यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘संत प्रबोधन’ आणि ‘वारसा शिल्पकलेचा’ या अनुक्रमे डॉ. हरिदास आखरे आणि संदीप राक्षे लिखित पुस्तकांचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हरिश इथापे यांनी मनोगत व्यक्त केले.
निलेश खाबिया, अरुण यावलीकर, ज्योती हुंडेकर, प्रा. डॉ. सुशील गावंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुमारे 32 वर्षांपूर्वी दिल्लीतील परेडमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळाली होती. त्या वेळी पवार यांच्या हस्ते त्या चमूचा सत्कार करण्यात आला होता. त्या चमुतील विद्यार्थ्यांनी पवार यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार नंदकुमार बंड यांनी मानले.
पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी कार्तिकी गायकवाड, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, सावनी सावरकर आणि ऐवंत सुराणा यांनी राम कदम यांच्या सांगितीक वैभावाचे विविध पैलू दाखविणारा मराठी गाण्यांच्या कार्यक्रम सादर केला. सचिन इंगळे, राजू दूरकर, समीर शिवगार, केदार मोरे, अर्शद अहमद, राजा साळुंके, अभय इंगळे, अमृता केदार, निलेश देशपांडे यांनी साथसंगत करणार केली तर निवेदन रवींद्र खरे यांनी केले.
फोटो ओळ : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे आयोजित 13व्या राम कदम कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित (डावीकडून) विठ्ठल मणीयार, राहुल देशपांडे, श्रीनिवास पाटील, शरद पवार, लक्ष्मीकांत खाबिया, विशाल चोरडिया, शंकर महादेवन, नंदकुमार बंड.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago