बार्शीचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्या विरोधात सोशल मीडियावरून आरोप करत धमकी दिल्याबद्दल बार्शीतील नेत्यावर 332 353 भादवि कलम या प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी बार्शीचे शिवसेनेचे नेते व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी राज्याच्या विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह पोलीस महासंचालकांकडे सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबतची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली असून संपूर्ण सखोल चौकशी करून राजकीय नेते व त्यांचे सहकारी नातेवाईक यांनी संघटित गुन्हेगारी करून अवैध मार्गाने संपत्ती कमावली आहे. अनेकांच्या नावाने बेनामी प्रॉपर्टी आहे त्यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांवर व सहकारी अशा १५ लोकांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई हा चार दिवसापूर्वी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील काही भाजपा आमदारांनी सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व इतरही अवैध धंद्यावर कारवाई केली जात नसल्याची तक्रार गृहराज्य मंत्र्याकडे केली होती.
या भेटीनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक व पोलिसांना धमकी दिली गेली.या प्रकरणी भादवि 332 353 34 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाऊसाहेब आंधळकर यांनी या निवेदनाद्वारे दिली आहे.