कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर होत असून रूग्णसंख्या वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.
आपल्या पंढरपूर शहर व तालुक्यात सध्या कोवीड रुग्ण संख्या आटोक्यात असून, सध्यातरी ओमायक्राॅन बाधीत रूग्णसंख्या नाही. परंतु भविष्यात ती रूग्णसंख्या वाढू नये व ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून करावयाची उपाययोजना, त्याची खबरदारी व काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेनेचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी आज तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी ,प्रशासन व उप जिल्हा रुग्णालय पंढरपुर येथील वैद्यकीय अधिकारी ,नगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत आमदार समाधान आवताडे व मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना लसीकरण जवळपास90ते 95 टक्क्यांच्या आसपास झालेले असल्यामुळे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव आपल्या तालुक्यात कमी प्रमाणात राहील अशी अपेक्षा आहे. परंतु आपण याबाबत गाफील न राहता पूर्वी कोरोनाच्या दोन लाटेत ज्या पध्दतीने प्रशासन, आरोग्य विभागाने चांगल्याप्रकारे काम करून कोरोनाचा संसर्ग रोखला, त्याच पद्धतीने या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, खबरदारी व काळजी घेण्यासाठी योग्य नियोजन करणे याबाबत बैठकीत चर्चा झाली.
तसेच दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम संपूर्ण भारत देशात, तसेच पंढरपूर तालुक्यात सुरू झालेली आहे. हे लसीकरण प्रभावीपणे तालुक्यात राबवून कोणीही वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यासाठी चर्चा झाली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम,मुख्याधिकारी अरविंद माळी,तहसीलदार बेल्हेकर, शहर पोलीस निरीक्षक पवार, गटविकास अधिकारी काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बोधले उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर,डॉ.भातलवडे ,डॉ. पाटील मॅडम, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.