पंढरपूर शहरात सध्या जवळपास ११ कोटी रुपये खर्च करून प्रदक्षिणा रस्त्यासह विविध रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ सोहळे पार पडत आहेत.
खरे तर हि बाब अतिशय आनंददायी आहे.काही ठिकाणी तर त्या त्या प्रभागातील नगरसेवक अगदी फटाके फोडून शुभारंभ सोहळ्याची महती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.आमदार प्रशांतराव परिचारक या शुभारंभ सोहळ्यात शहरातील विविध प्रगतीपथावरील व प्रस्तावित विकास कामांची माहिती प्रभावीपणे देत आहेत.
आणि आमदार परिचारक यांच्याकडे खरोखरच या शहराच्या विकासासाठी अतिशय दूरदृष्टीपूर्ण योजना आहेत आणि ते या बाबत आग्रही असतात हेही मी वेळोवेळी नमूद करीत आलो आहे.
पण प्रत्यक्ष कामे केली जात असताना,पूर्ण झाल्यानंतर अनेकवेळा रस्त्यांची खडीकरण व डांबरीकरणाची कामे अल्पजीवी ठरतात हे उघड सत्य आहे.या शहरास गेल्या १२-१३ वर्षांत शासनाकडून जवळपास तीर्थक्षेत्र विकास आरखडा आणि विशेष बाब म्हणून जवळपास ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि खर्चीही पडला.
आता नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर ११ कोटी रुपये खर्चून रस्ते चकचकीत होणार आहेत.पण या पूर्वीचा अनेक रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचा अनुभव लक्षात घेता अल्पावधीतच या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य दिसून येऊ लागते.
या बाबत सत्ताधारी गटातील कुठल्या नगरसेवकाने आवाज उठवल्याचे तुम्हाला निदर्शनास आले आहे का ? याचाही अभ्यास करा.
पुढील महिनाभरात शहराच्या अनेक भागात रस्त्यांची जी कामे होणार आहेत त्या बाबत जागरूक रहा,दक्ष रहा.कारण या शहराचा जबाबदार नागिरक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.आणि नगर पालिका प्रशासनाने ज्या ठिकाणी रस्त्याची कामे होणार आहेत त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार/एजन्सी,खर्ची पडणारी रक्कम आणि देखभाल दुरुस्ती बाबतचा कालावधी याचा बोर्ड लावणे गरजचे आहे.आणि सामान्य जागरूक नागिरकांनी आपल्या भागात या पूर्वी लाखो रुपये खर्च करून वर्ष सहा महिण्यात पुन्हा रस्त्यांची परिस्थिती कशी जैसे थे झाली होती याचा अनुभव लक्षात घेत निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात आलेली कामे तरी दर्जेदार आणि टिकावू व्हावीत या साठी आग्रही राहावे.
एक साधा मजेशीर किस्सा म्हणून सांगतो.४ वर्षांपूर्वी अंबाबाई पटांगण चौक ते भजनदास चौक हा रस्ता जवळपास ५० लाख रुपये खर्च करून खडीकरण व डांबरीकरण करण्यात आला.६ महिन्याच्या आत या रस्त्याची वाट लागली.मी स्वतः तत्कालीन मुख्याधिकारी मानोरकर यांच्याकडे तक्रार केली.त्यांनी त्या ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करण्याची नोटीस काढली.दोन वर्षांनी बिल अडल्याने ठेकेदाराने पुन्हा हा रस्ता केला.तरीही आज त्या रस्त्याची काय अवस्था आहे हे तुम्ही आजही पाहू शकता. दुसरा किस्सा – अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक हा कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या कॉक्रीट रस्त्याची अशीच अवस्था झालीय,खचलेले जागोजागी वरखाली गेलेले चेंबर,स्लोप न दिल्याने जागोजागी साठणारे पाणी या बाबत मी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.पालिकेकडे पैशे नाहीत त्यामुळे पूर्वीच्या ठेकेदाराच्या सिक्युरिटी डिपॉझिट मधून काम करून घेतोय असे सांगत ठेकेदाराने रात्रीत ‘ढोल बडवत’ काम केले.सध्या एकदा या रस्त्यावर फेरफटका मारून बघा काय अवस्था आहे.पाऊस पडल्यावर तर आणखी बिकट.
आणि शेवटी आपली मर्जी,तुम्हाला चालतंय तर मग आम्हालाही चालतंय !
पूर्वीचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर हे अतिशय कर्तव्यदक्ष होते आणि कुठलाही आव न आणता ते सामान्य नागिरकांच्या तक्रारी,सूचना यांची दखल घेत निराकरण करण्याचा थोडाफार तरी प्रयत्न करत होते.आता ती परिस्थिती राहिली नाही.आव आणून वेळ मारून नेली जातीय त्यामुळे सामान्य जागरूक नागिरक आशिष लोकरे साहेब,सह आयुक्त नगर पालिका प्रशासन सोलापूर यांच्याकडे तक्रारी करू शकतात.
– राजकुमार शहापूरकर
(संपादक-पंढरी वार्ता)