ताज्याघडामोडी

अखेर एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघाला! परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा मुद्दा राज्यात चर्चेचा ठरला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली होती.

तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाचा देखील राज्य सरकारला सामना करावा लागत होता. इतर मागण्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, ही प्रमुख मागणी केली होती. त्यानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र झाल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली आहे.

काय म्हणाले अनिल परब?

गेले अनेक दिवस कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यांची प्रमुख मागणी विलिनीकरणाची होती. याबाबत सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत होतो. उच्च न्यायालयाने यावर तीन सदस्यांची समिती नेमली आहे. विलिनीकरणाचा निर्णय १२ आठवड्यांच्या आत समितीने घ्यावा, असे निर्देश दिले. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे द्यावा आणि नंतर मुख्यमंत्र्यांचं त्यावरचं मत जोडून तो न्यायालयात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

विलिनीकरणाच्या मागणीवर शासनाची उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याची आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करू. सरकारच्या या निर्णयामुळे तिढा निर्माण झाला होता. पण हा संप दिवसेंदिवस लांबत चालला होता. त्यामुळे राज्यातल्या ग्रामीण जनतेची, शालेय आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती.

सरकारकडून आम्ही प्रस्ताव ठेवला की विलिनीकरणाचा निर्णय समितीने दिला, तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंवा होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही पगारवाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांसोबतच्या करारात दिला जाणारा डीए राज्य सरकारच्या डीएप्रमाणेच दिला जातो.

१ ते १० वर्ष श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी.

घरभाडे भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच केली जावी, ही बाब देखील मान्य झाली आहे. या बाबी करारामध्ये होत्या. पण बेसिकचा विषय होता. म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतलाय की जे कर्मचारी १ ते १० वर्ष या श्रेणीत आहेत, या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजारांची वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचं मूळ वेतन १२ हजार ०८० रुपये होतं, त्याचं वेतन आता १७ हजार ३९५ झालं आहे. मूळ वेतन १७ हजार ०८० वरून २४ हजार ५८४ रुपये झालं आहे. त्यामुळे जवळपास ७ हजार २०० रुपयांची पगारवाढ पहिल्या श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची झाली आहे. जवळपास ४१ टक्के एवढी ही वाढ असून एसटीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी वाढ आहे.

१० ते २० वर्ष श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी.

१० ते २० वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४ हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार २३ हजार ०४० होता तो आता २८ हजार ८०० रुपये झाला आहे.

२० वर्षांहून अधिक श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी.

२० वर्षांहून अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ वेतन २६ हजार आणि स्थूल वेतन ३७ हजार ४४० होतं, त्यांचं वेतन आता ४१ हजार ०४० झालं आहे. ज्याचं मूळ वेतन ३७ हजार होतं आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० होतं, त्यांना २५०० रुपयांची वाढ केल्यामुळे मूळ वेतन ३९ हजार ५०० तर स्थूल वेतन ५६ हजार ८८० होईल.

कामगारांचे दोन प्रकार होते. अतिशय कमी पगार असल्याची बाब समोर आली. पण चांगले पगार असणाऱ्या कामगारांना देखील पगार वाढ देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने या गोष्टी दिल्या आहेत. आज दिवसभर झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व कामगारांना मिळालेली चांगली पगारवाढ आहे.

आता पगार १० तारखेच्या आतच होणार

गेल्या वर्षी करोनामुळे एसटी आर्थिक नुकसानीमध्ये होती. अशा स्थितीत देखील राज्य सरकारने एसटीला २ हजार ७०० कोटींची मदत पगारासाठी केली होती. पण काही कारणास्तव त्यांचे पगार उशिरा होत होते. यादरम्यान काही कामगारांनी आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्या. म्हणून राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आधी होईल, ही हमी घेतलेली आहे. त्यामुळे एसटीच्या कामगारांचा पगार कधीही १० तारखेच्या पुढे जाणार नाही.

कर्मचाऱ्यांसाठी इन्सेंटिव्हची घोषणा

आजच्या चर्चेत कामगारांचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, यासाठी इन्सेन्टिवची योजना जाहीर करतोय. एसटीचं उत्पन्न वाढल्यावर ते उत्पन्न वाढवण्यासाठी ड्रायव्हर, कंडक्टरनं चांगलं काम केलं असेल, त्यांना इन्सेन्टिव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या कामगारांचा शासन सहानुभूतिपूर्वक विचार करेल.

ड्युटीवर हजर राहिल्यास पगार मिळणार

हा संप झाला, त्यामागे चांगली वेतनवाढ आणि पगाराची हमी मिळावी या दोन्ही मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. काही अटी कामगारांना जाचक वाटत होत्या. त्यातली एक म्हणजे जे कामगार कामावर येतात, पण त्यांना ड्युटी नसल्यामुळे त्याची रजा भरून घेतली जाते. पण यापुढे, जो कामगार कामावर हजेरी लावेल, त्याला त्या दिवसाचा पगार मिळेल. याव्यतिरिक्त जाचक अटी असतील, तर त्याचा विचार शासन करेल.

निलंबित-सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी.

कामगारांनी आता संप मागे घ्यावा. या बाबतीत आम्ही जसे दोन पावलं पुढे आलो, तसे त्यांनीही दोन पावलं पुढे यावे. जे कामगार आपल्या गावी आहेत, त्यांनी उद्या सकाळी ८ वाजता आपल्या नोकरीच्या ठिकाणी कामावर हजर व्हावं. जे मुंबईत आहेत, त्यांना मुंबईहून जायला एक दिवस लागेल, त्यांनी कामाच्या ठिकाणी परवा हजर व्हावं. जे कामगार निलंबित आहेत, ज्यांच्यावर सेवासमाप्तीची कारवाई केली आहे, ते हजर झाल्यावर त्यांचं निलंबन ताबडतोब रद्द केलं जाईल. पण जे कामगार हजर होणार नाहीत, त्यांच्यावर शासन सक्त कारवाई करेल.

सरकारी तिजोरीवर ३६० कोटींचा बोजा

या पगारवाढीसाठी प्रत्येक महिन्याला ६० कोटींचा अतिरिक्त बोजा स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे महिन्याला ३६० कोटींचा बोजा आम्ही घेतोय. यासाठी ७५० कोटी आम्हाला मोजावे लागणार आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कामगारांनी एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago