पंढरपूर – ओझेवाडी रस्त्याचे काम झाले सुरू
युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा दणका
पंढरपूर –
पंढरपूर – ओझेवाडी या रस्त्याच्या कामासाठी टेंडर निघाले, वर्क ऑर्डर देण्यात आली मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते. याबाबत सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. तसेच काम सुरू न झाल्यास शुक्रवारी दि.26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता गोपाळपूर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता. या इशाऱ्याची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेवून सदरचे आंदोलन स्थगित करावे अशा अशयाचे लेखी पत्र दिले असून रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंढरपूरचे उपविभागीय अभियंता डी.व्ही.मुकडे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित केलेले आहे अशी प्रतिक्रिया युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.
सदरच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी पत्रदिले होते त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकजी चव्हाण यांनी देखील तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच सदरचे काम मार्गी लागत असल्याची प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.
कोंढारकी मुंढेवाडी चळे आंबे नेपतगाव रांजणी ओझेवाडी सरकोली दामाजी कारखाना या भागातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या भागातील लोकांनी जिल्हाध्यक्ष श्री नितीन नागणे यांचे अभिनंदन केले.
चौकट –
काम सुरू करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई
पंढरपूर – ओझेवाडी रस्त्याच्या कामासाठी टेंडर निघाले, त्याची वर्कऑर्डर देण्यात आली तरीही रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नव्हते यानंतर युवक कॉंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने त्यांना लेखी पत्र देण्यात आले असून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
नितीन नागणेंमुळे रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी
पंढरपूर – ओझेवाडी या रस्त्यावर ये- जा करणाऱ्या नागरिकांना अनेक दिवस त्रास सहन करावा लागत होता याबाबत सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पाठपुरावा करून आक्रमकपणे सदरचा प्रश्न मांडल्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच रस्त्याचे काम पुर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.