चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक ज्येष्ठ नेता भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून त्यांचा लवकरच प्रवेश होणार असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या नेत्याने दोन आजी नगरसेवकांना व दोन माजी नगरसेवकांना भाजप प्रवेशासाठी गळ घातली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या या प्रयत्नामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येऊ लागला आहे. हा प्रवेश झाल्यास अगोदरच कमकुवत असलेली राष्ट्रवादी चिंचवड विधानसभा मतदारसंघात अधिकच कुमकुवत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपाकडून सत्ता टिकविण्यासाठी तर राष्ट्रवादीकडून सत्तेत परतण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अद्यापपर्यंत प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर न झाल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण अद्यापतरी छुप्या पद्धतीने सुरू असले तरी येत्या पंधरा दिवसानंतर मात्र त्याला वेग येण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी भाजपाला राष्ट्रवादी अद्यापपर्यंत तीन धक्के देत एका नगरसेवकासह दोन नगरसेविकांच्या पतीराजांना आपल्या पक्षात आणले आहे. तर भाजपानेही शिवसेनेला धक्का देत थेट शिवसेनेचा जिल्हाध्यक्षच फोडल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेष म्हणजे या सर्व बाबी चिंचवड विधानसभेमध्येच घडल्याने भाजप आणि राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी चालविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या धक्क्याची परतफेड करण्यासाठी भाजपानेही डावपेच आखण्यास सुरूवात केली असून चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यालाच ‘गळ’ लावला आहे. या नेत्यानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांच्या समर्थकांनाही भाजपामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
चिंचवड विधानसभा निवडणुकीवेळी चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात नव्हता. यामुळेकाही जणांनी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. तर काही जणांनी भाजपचा झेंडा हाती घेत नात्यागोत्याचे राजकारण सांगत उघडपणे प्रचार केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या या नेत्याची भाजपसोबतची सलगी वाढत गेली. काही दिवसांपूर्वी पीएमआरडीए निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
पीएमआरडीए निवडणुकीचे वातावरण शांत होताच आता पुन्हा राष्ट्रवादीतून भाजपात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या या नेत्याने राष्ट्रवादीतील काही आजी-माजी नगरसेवकांना ‘गळ’ घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपाच्या उंबरठ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या या नेत्याचे दोन समर्थक नगरसेवक आहेत. तर दोन माजी नगरसेवक आहेत. या चार मातब्बरांना सोबत घेऊन हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘आजीं’ना भीती मतदानाची
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना या दोन नगरसेवकांच्या प्रभागात दीड हजारांचे मताधिक्य होते. तर भाजपचे उमेदवार पिछाडीवर होते. या प्रभागामध्ये भाजपविरोधी मतदार अधिक असल्याने दोनही आजी नगरसेवकांना भाजप विरोधी मताधिक्याची भिती असल्याने त्यांनी अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र फोडाफोडीच्या राजकारणात काही धाडसी निर्णयही घेतले जातात त्यामुळे हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादीत राहणार की भाजपाचे कमळ हाती घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘त्या’ नेत्याला चिंता मुलाची
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022 च्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ नेत्यांची मुले उतरण्याची शक्यता आहे. आपल्या मुलांचा राजकारणासह महापालिकेतील प्रवेश सुकर व्हावा, हा महत्त्वाचा उद्देश या पक्षबदलाच्या मागे असल्याचे बोलले जात आहे. चिंचवडमध्ये असलेले भाजपाचे प्राबल्य येथील नेत्यांची मिळणारी साथ आणि भाजप समर्थक मतदार या जोरावर या नेत्याचा मुलाचा महापालिकेतील प्रवेश सोपा होईल, अशी आशाही या नेत्याला आहे. त्यामुळे भाजपमधील हा प्रवेश कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…