गेल्या तीन वर्षांपासून प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सातत्याने चर्चेत राहिला आहे. कारखान्याच्या वाटचालीत प्रथमच सन १९-२० चा गळीत हंगाम घेता आला नाही.त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती.पुढे राज्यात सत्तांतर झाले आणि कारखान्यास ६० कोटींची थकहमी देण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आला.हि थकहमी देताना कारखान्याची आर्थिक खस्ताहाल परिस्थिती पाहता अनेक अटी घालण्यात आल्याचे दिसून आले होते.२०२०-२१ च्या गळीत हंगामात कारखाना सुरु झाला खरा पण आर्थिक अडचणीतून काही बाहेर पडला नाही.सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शेतकऱ्याचे कोटयवधींचे ऊसबिले थकीत आहेत तर कामगारांचा जवळपास १८ महिन्याचा पगार थकीत आहे.अशातच यंदा कारखाना सुरु न झाल्याने संचालक,सभासद आणि कामगार यांच्यातील नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली असून अशातच कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे नॉट रिचेबल असल्याने यंदा कारखाना सुरु होणार का ? या चर्चेत मागील तीन महिने व्यतीत केलेले अनेक सभासद कामगार यांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला आहे.अशातच राज्य सहकारी बँकेने शरद पवार यांच्या सूचनेने थकीत कर्जाचे पुनर्गठन केले असले तरी कारखाना सुरु झाला तरच व्याजाची आणि टप्प्याटप्याने मुदलाची परतफेड शक्य होणार आहे.अशातच आता विठ्ठल सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास दिला जाणार असल्याची चर्चा होऊ लागली असून त्यामुळे ‘विट्ठल’च्या काही संचालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे तर या कारखान्याचे सभासद हेच मालक आहेत,भाडेतत्वावर देण्यास किंवा खाजगी व्यक्तीशी भागीदारी करण्यास आपला विरोध राहील अशी भूमिका हे संचालक घेऊ लागले आहेत.याचाच एक भाग म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी आता गावोगावी बैठका घेऊन सभासदांसमोर भूमिका मांडत आहेत.
आज सरकोली ता.पंढरपूर येथे त्यांनी अनेक सभासदांशी संवाद साधत विठ्ठल सहकारी साखर कारखाना एका ‘गडगंज सावकारास’ चालविण्यास देण्याचा निर्णय संचालक मंडळ बहुमताच्या घेण्याची शक्यता असल्याचे सांगत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली आहे.निवडणुका पुढे ढकलल्यामुळे हे संचालक मंडळ हे काळजीवाहू संचालक मंडळ म्हणून काम पहात आहे.त्यामुळे या बाबतचा निर्णय हा कारखाना स्थळावर सभासदांची ऑफलाईन सभा घेऊनच घेतला जावा अशी भूमिका ते विठ्ठलच्या सभासदांपुढे मांडत असून हा कारखाना सहकारी आहे,सभासद या कारखान्याचे मालक आहेत.२७ हजार ८०० सभासद आहेत आणि त्यांच्या परस्पर किंवा त्यांची दिशाभूल करून कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये यासाठी आपण विठ्ठलच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात सभासदांची बैठक घेऊन त्यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत ‘विट्ठल’ची सर्वसाधारण सभा ऑफलाईन झाली पाहिजे याच्या समर्थनार्थ सह्या गोळा करत असल्याचे युवराज पाटील यांनी पंढरी वार्ताशी बोलताना सांगितले.