आज सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र विकास आरखडा आणि यात्रा नियोजनाबाबत पंढरपुरात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा झाली पण एक मुद्दा मला खटकणारा,शंका उत्पन्न करणारा आहे.या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी पंढरपुर शहरात आणखी ६ ठिकाणी नव्याने शौचालये बांधण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
वास्तविक पाहता गेल्या सात ते आठ वर्षात विकास योजनेतून पुण्या मुबंईत बसून निर्णय घेत कोट्यवधी रुपये खर्चून पंढरपुरात बांधण्यात आलेली राजमहाला सारख्या इमारतीच्या रूपातील शौचालये धूळ खात पडून आहेत.या पैकी अनेक ठिकाणी यात्रा कालावधीतही भाविक फिरकत नसल्याचे दिसून येते.त्यामुळे यांची अवस्था बकाल झाली असून कुठे दारे खिडक्या गायब आहेत तर कुठे याचा दुरुपयोग होताना दिसून येतो.
मंदिर समितीने अनेक मठामध्ये अनुदान देऊन संडास बांधले आहेत,नगर पालिकेने विविध योजनेद्वारे खाजगी जागेत,मठात शौचालये बांधण्यासाठी पाठ पुरावा करून कामे पूर्ण करून घेतली आहेत.
आता पुन्हा पंढरपुरात नव्याने काही ठिकाणी शौचालये बांधण्याचा घाट वरिष्ठ पातळीवरून घालण्यात आला आहे नुकत्याच एका पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांनी यांनीही दिली होती ती आज खरी ठरली.या बाबत बोलताना आ.परिचारक यांनी अंबाबाई पटांगणा सारख्या क्रीडांगण म्हणून विकास करण्याचे नियोजन असलेल्या ठिकाणी अगदी मध्यभागी शौचालये बाधण्याचा प्रयत्न होत असून हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असे सांगत यास विरोध दर्शिवला असल्याचे सांगितले होते.
मात्र आज जिल्हाधिकारी यांनी केलेल्या घोषणेत विविध ६ ठिकाणी शौचालये बांधण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.जर या प्रस्तावात अंबाबाई पटांगणाच्या ठिकाणी मध्यभागी शौचालये बाधण्याचा निर्णय होणार असेल तर नगर पालिकेने त्यास प्रखर विरोध केला पाहिजे,आणि सामान्य क्रीडा प्रेमी नागिरकांनीही यासाठी आवाज उठवला पाहिजे.
एक वर्षांपूर्वी या अतिशिक्षित उचपदस्त अधिकाऱ्यांनी पुण्यात बसून एक असाच निर्णय घेतला होता.चंद्रभागेच्या वाळवंटात सुमारे ७४ लाख खर्च करून १३ चेंजिग रूम ठेवण्याचा.या निर्णयास मी कडाडून विरोध करत तत्कालीन कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत यापूर्वीच्या मंदिर समितीने उभारलेल्या चेंजिग रूम,त्याचा खर्च आणि यांचे टेंडर यातील फरक निदर्शनास आणून दिला होता आणि पुढे हे काम बारगळले.आता पुन्हा एकदा लढावे लागणार असे दिसतंय !
– राजकुमार शहापूरकर