विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
कामगारांना १२ टक्के पगार वाढ देणार…
१५ दिवसाचा पगार व 08.33टक्के बोनस जाहीर…
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 21 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार संजय मामा शिंदे यांचे हस्ते वजनकाटा पूजन, गव्हाण पूजन व उसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रम दादा शिंदे, व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव,सर्व संचालक ,शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की कोरोना महामारी च्या निर्बंधांमुळे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या गळीत हंगामाचा शुभारंभ साधेपणाने करण्यात येत आहे,शासनाच्या आदेशाप्रमाणे 15 तारखेपासून रीतसर गाळप सुरू होईल. आमदार संजय मामा शिंदे पुढे म्हणाले की ब्राझील मध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन होते, परंतु सध्या तिथे दुष्काळ असल्यामुळे भारतातील साखरेला मागणी व उठाव वाढलेला आहे व भावही चांगला मिळत आहे ,तसेच खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी’ ऊसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती’ या घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर चांगला भाव मिळणार आहे,तसेच वीज निर्मिती मधून ही चांगली रक्कम कारखान्यांना मिळत आहे व या सर्व बाबींमुळे आगामी दोन-तीन वर्ष साखर उद्योगाला चांगले दिवस येणार आहेत आणि पर्यायाने शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उसाला अतिशय चांगला भाव मिळणार आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ऊसाला चांगला दर देण्यात जिल्ह्यात अव्वल क्रमांकामधे असतो, हीच परंपरा पुढेही कायम राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वासाने आपला ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे .
विशेष माहिती सांगताना संजय मामा शिंदे म्हणाले की खासदार शरच्चंद्र पवार ,साखर आयुक्त व साखर कामगार प्रतिनिधी यांची चर्चा होऊन साखर कामगारांना बारा टक्के पगार वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की , विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या कामगारांना पंधरा दिवसाचा पगार व 8. 33 टक्के बोनस यापूर्वी जाहीर झालाय, तसेच 1 नोव्हेंबर 21 पासून वाढीव बारा टक्के पगार वाढ कामगारांना देण्यात येईल. अधिक माहिती देताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज आहे, एफआरपी प्रमाणे कारखान्याने दर दिलेला आहे व शेवटचे 176 रुपये प्रति टन ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे .सध्या दररोज सर्वत्र पाऊस येत आहे त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच ऊस तोडणी वाहतूक व गळीत हंगामाची रीतसर सुरुवात होईल.
या कार्यक्रमात माजी उपसभापती व बेंबळे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधी बंडुनाना ढवळे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून या कारखान्यास ऊस देण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले व सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रभाकर कुटे, रमेश येवले पाटील, पोपटराव चव्हाण, वेताळ जाधव, सुरेश बागल, शिवाजी डोके, पांडुरंग घाडगे, तसेच कारखान्याचे विभाग प्रमुख संभाजी थीटे, पोपटराव येलपल्ले, सी एस भोगाडे, मुलाणी, चंदनकर, देसाई ,लवटे ,बागल, जगदीश देवडकर, नागेश नाईकुडे ,संजय कैचे, शशिकांत पवार आदी मान्यवरासह शेतकरी व कामगार उपस्थित होते .