श्री विठ्ठल रूक्मिणीच्या ओढीने पायी चालणार्या लाखो वारकर्यांची वाट सुखकर व्हावी म्हणून बांधण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून कोरोनामुळे रखडलेले या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री मा.नितीन गडकरी यांनी करावे यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांची भेट घेतली.
एका कार्यक्रमा निमित्त मा.नितीन गडकरी हे कराड येथे आले असता आ.प्रशांत परिचारक यांनी त्यांची भेट घेवून भूमिपूजन करण्याची विनंती केली. यास मा.गडकरी यांनी संमती दिली असून येत्या महिन्यात याची तारीख निश्चित केली जाणार आहे.
आषाढी वारीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज तर देहू मधून संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पंढरीच्या मार्गावर असतात. वारकर्यांसाठी हा रस्ता महत्वपूर्ण असल्यामुळे तब्बल बारा हजार कोटी रूपये खर्च करून सदर पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सुरू असून संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील भूसंपादन सुरू आहे. दरम्यान राज्यातील लाखो वारकर्यां प्रमाणेच मा.नितीन गडकरी यांची देखील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यावर मोठी श्रध्दा आहे. यामुळे सदर काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी ते जातीने लक्ष देत आहेत. परंतु कोरोनामुळे सदर रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला नाही. यामुळे आ.प्रशांत परिचारक यांनी कराड येथे मा.नितीन गडकरी यांची भेट घेत, या रस्त्यामुळे खर्या अर्थाने वारकर्यांची सेवा होणार असल्याने याचे भूमिपूजन देखील आपल्याच हाताने करावे अशी विनंती केली. यास मा.गडकरी यांनी संमती दिली असून ऑक्टोबर महिन्यातच सदर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.