ताडी विक्रीच्या नावाखाली काही अधिकृत व अनधिकृत ताडी विक्री केंद्रातून रसायन मिश्रित,पावडर मिश्रित ताडी विक्री केली जात असल्याने दारू परवडत नाही म्हणून ताडी प्राशन करणाऱ्या अनेक गोरगरीब कामगारांना आला जीव गमवावा लागला आहे,विविध गंभीर व्याधीचा सामना करावा लागला आहे असा आरोप सोलापूर शहरातील अनेक कामगार नेत्यांनी वेळोवेळी करत ताडी विक्री विरोधात आवाज उठवला असल्याचे दिसून येते.तर गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्ह्यात ताडी उत्पादनाच्या झाडांच्या अपुरी संख्या,नीरा उत्पादनाची मागणी वाढल्याने ताडी उत्पादन घटल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ताडी विक्री केंद्राचे लिलाव काढण्यात आले नव्हते.मात्र आता राज्य उत्पादन शुल्कचे सोलापूर जिल्हा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी या बाबत निविदा आमंत्रित केल्या असून १४ ऑक्टोबर रोजी या लिलावाची अंतिम बोली लावली जाऊन विक्रेते निश्चित केले जाणार आहेत.
ताडी विक्री केंद्र सुरु करू इच्छिणाऱ्या टेंडर धारकासाठी ताडी पुरवठा करणारी किमान ४०० ते ५०० झाडे उपलब्ध असल्याची हमी देणे तसेच भेसळ युक्त ताडी विकणार नाही याची हमी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.या अटीचा भंग केल्यास कारवाईचा इशाराही उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत कोरोना काळात अनेक ठिकाणी विविध परमिट रूम चालक,अवैध दारू विक्रेते आणि हातभट्टी दारू विक्रेते यांच्यावर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखालील विविध पोलीस ठाण्यांनी शेकडो ६५ इ च्या कारवाया करत गुन्हे दाखल केले आहेत.अनेक वेळा काही अवैध दारू विक्रेत्याकडून लाखो रुपयांचा अवैधरित्या केलेला देशी विदेशी दारुचा साठा जप्त केल्याचे दिसून आले आहे.मे २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने पंढरपुर शहरात मोठी कारवाई केली होती.मात्र याच कालावधीत उत्पादन शुल्क विभाग मात्र केवळ नावालाच उरला आहे कि काय अशी परिस्थिती या शहर तालुक्याने अनुभवली आहे.आता ताडी विक्री बाबत देखील हाच प्रकार होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत असून पंढरपुर शहरात ५ ठिकाणी तर तालुक्यातील करकंब येथे ३ ठिकाणी,भाळवणी,कासेगाव,वाखरी,खर्डी,भोसे,गोपाळपूर येथे प्रत्येकी १ ताडी विक्री केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.या निविदा प्रक्रियेतील गमतीचा भाग म्हणजे ७ लाख ३० हजार ते ७ लाख ५८ हजार अशी किमान अपेक्षित बोली आहे आणि १० लाखाच्या पुढे बोलीस मान्यता नाही. पंढरपूर शहर व तालुक्यातील या १५ ताडी विक्री केंद्राच्या लिलावातून उत्पादन शुल्क विभागास १ कोटी ८ लाख रुपये किमान उप्तन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.
कोरोनामुळे थांबलेले अर्थचक्र अजून फारसे गतिमान झाले नाही,अनेक हातावरले पोट असलेले छोटे मोठे व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत.बेरोजगारी,बेकारी आणि नोकऱ्या गमावल्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे झुकू लागले आहेत.अशातच स्वस्तात नशा करण्याचे साधन म्हणून ताडीकडे पाहिले जाते त्यामुळे हे ताडी विक्री केंद्र सुरु झालेच तर या ठिकाणी उपलब्ध असणारी ताडी हि आरोग्यास हानिकारक ठरू नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाणार का ? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.