कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर जागो जागी विनामास्क तर कधी डबलसीट असलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यासाठी थांबलेले पोलीस कर्मचारी हे दृश्य नित्याचे झाले होते.शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील हेच दृश्य नित्याचे झाले असल्याने या बाबत कुणाला शंका येण्याचीही कारण नव्हते.
मात्र याचाही गैरफायदा उठवत रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या दुचाकी चालकांना अडवून लोकांना मास्क नाही, लायसन नाही ,हेल्मेट नाही,गाडीची कागद नाही अशी कारणे पुढे करत दंडाची रक्कम म्हणुन पैसे घेत वसूल करणाऱ्या एका इसमाविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत विजय केरु गोरवे,पोलीस हवालदार, ब.नं. 959 , नेमणुक – करकंब पोलीस ठाणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 25/09/2021 रोजी दुपारी ३ चे आसपास त्यांच्या ओळखीचे गणेश व्यवहारे यांचा त्यांना फोन आला.नेमतवाडी रोडवरील कनाल जवळ एक इसम मोटार सायकल थांबवुन मी पोलीस आहे म्हणत आहे,त्याच्याजवळ पुढील बाजुस मोटार सायकल वर मराठी मध्ये पोलीस असे लिहलेली होंडा ब्लेड काळया रंगाची गाडी आहे. सदर घटना समजताच विजय केरु गोरवे, पोहवा/424 घोळवे ,पोहवा/1897 जाधव व पोना/1583 मोरे असे मिळुन खाजगी वाहनाने तात्काळ रवाना झाले.पोलीस येत असल्याचे समजताच त्या इसमाने नेमतवाडीच्या दिशेने पळ काढला,जाताना त्याने आपल्या दुचाकीची चावी काढून घेत शेतात पळ काढला.सदरच्या मोटार सायकल नंबर वरुन सदरची मोटार सायकल दादासाहेब लक्ष्मण पवार रा.कोंडारपट्टा ता.माळशिरस यांची असल्याचे निष्पन्न झाले असून मोटार सायकल ही प्रशांत अनिल वाघ रा.वेताळवाडी हा घेवुन गेला होता असे सांगण्यात आले. तेव्हा पोलिसांनी मोटार सायकल ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस घेवुन आले.या प्रकरणी प्रशांत अनिल वाघ,वय – 28 वर्षे, व्यवसाय -शेती रा.वेताळवाडी ता.माढा हा पोलीस असल्याची बतावणी करुन मोटार सायकल क्रमांक एम एच 45 ए एन 2581 वर पोलीस असे लिहुन मोटार सायकली आडवुन लोकांकडुन पैसे वसुल केल्याने त्यांचे विरुध्द भारतिय दंड संहीता चे कलम 170,171 करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.