गतवर्षी राज्यात कोरोनाचा कहर सुरु होताच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली राज्यभरात मोठ्या प्रमाणात वीजबिले थकण्यास सुरुवात झाली.राज्य सरकार वीजबिलात किमान ५० टक्के तरी माफी देईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आणि सर्वसामान्य वीजग्राहकांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात थकू लागले,राज्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी दिवाळी पूर्वी गोड बातमी देऊ म्हणत वीजबिल माफीच्या मुद्द्याला पुन्हा हवा दिली आणि वीजबिल वसुलीसाठी लोकांच्या दारोदारी जाणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मात्र गोची होऊ लागली.
वीजबिल वसुलीसाठी तगादा लावल्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी महावितरणचे कर्मचारी आणि सामान्य नागिरक यांच्यात अगदी शिविगाळ ते मारहाण अशा अनेक घटना घडल्या आहेत.एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून वीजबिल वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याची तंबी तर दुसरीकडे वीजग्राहकांकडून वीज बिल वसुलीसाठी दारात गेल्यानंतर मिळणारी वागणूक यामुळे वीज बिल वसुली करणे हे काम जिकरीचे होऊन बसले आहे.आणि यातून अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
असाच एक प्रकार पंढरपूर नजीकच्या लक्ष्मी टाकळी येथे घडला असून महावितरणचे सारंग सिध्देश्वर कोल्हे हे आनंद नगर येथे कुडंलिक देवकते यांच्याकडे थकित असणारे लाईट बिल 5500/- रूपये मागणीसाठी गेले असता देवकते यांनी सोमवार नंतर लाईट बिल भरू असे सांगितले.त्यानंतर वीज कर्मचारी सारंग कोल्हे यांनी सदर ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला.या वरून झालेल्या वादात कुडंलिक देवकते यांनी शिवीगाळी करून धक्काबुक्की केली अशी फिर्याद पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.