ताज्याघडामोडी

”विट्ठल”च्या अर्थकारणाचा ”पॉलिटिकल इफेक्ट” किती खरा किती खोटा !

विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे असा आरोप २०१६ पासूनच सातत्याने होण्यास सुरुवात झाली.स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यावर या बाबत सातत्याने टीका होताना दिसून आली.पण या साऱ्या आरोप प्रत्यारोपाच्या धुळवडीचा परिणाम थेट स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या राजकीय वाटचालीवर,निवडणुकीच्या राजकरणावर होईल असा अंदाज वेळोवेळी व्यक्त होत गेला तरी विधानसभेच्या रणधुमाळीत विठ्ठल कारखान्याची अवस्था हा विरोधकांच्या दृष्टीने प्रचाराचा मुद्दा असूनही याचा इफेक्ट साधण्यात विरोधकांना अपयशच आले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीतच यंदा विठ्ठल सुरु होणार नाही हे जनतेला कळून चुकले होते.आणि त्या निवडणुकीत विठ्ठलच्या खस्ताहाल आर्थिक परिस्थीची जोरदार चर्चा झाली.पण निवडणुकीच्या निकालावर मात्र त्याचा परिणाम झाला नाही.तर स्व.आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत विठ्ठल कारखान्याची थकीत ऊसबिले,कामगारांचे पगार हा मुद्दा पुढे करून चेअरमन भगीरथ भालकेंवर जोरदार टीका करण्यात येत होती,अशातच विरोधात परिचारक आणि आवताडे हे एकत्र येऊन लढले होते.

२०१९ च्या निवडणुकीत आवताडे आणि परिचारक यांना मिळालेल्या मताचे गणित आ.प्रशांत परिचारक हे मांडत होते मात्र स्व.भारत भालकेंना २०१९ च्या निवडणुकीत पडलेल्या मतांपेक्षा सुमारे २५ हजार जास्त मते घेऊन विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालकेंनी विट्ठल कारखान्याच्या आर्थिक अडचणी या विधानसभा निवडणुकीत फारसा परिणाम कारक ठरत नाही हेच जणू दाखवून दिले होते.त्या मुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक दुरवस्था हा केवळ विठ्ठल कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतच कदचित विरोधकांसाठी प्रभावशाली प्रचाराचा प्रभावशाली मुद्दा होऊ शकतो इतर निवडणुकीत नाही असेच म्हणावे लागेल.

 १९८० पासून तत्कालीन अण्णा गट आणि पुढे उद्यास आलेला विठ्ठल परिवार हा आमदारकी आपल्या गटाकडेच असली पाहिजे यासाठी अतिशय निकराचा राजकीय संघर्ष करीत आला.आमदारकी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामाबाबत अडवणूक सहन करावी लागली.विरोधकांच्या गावाला एसटी मिळत नव्हती,डीपी जळला तर अनेक महिने बदलून मिळत नव्हता,सोसायट्या मिळत नव्हत्या,दूध संघाचा फायदा होत नव्हता,विरोधकांचे वर्चस्व असलेल्या गावांच्या रस्त्यांची कामे अडविली जात होती, विविध शासकीय योजनांचा लाभ विरोधी गटाच्या ताब्यात असेलल्या ग्रामपंचायतींना मिळू दिला जात नव्हता अशी टीका अनेक वर्षे करण्यात येत होती आणि त्याचीच परिणीती म्हणून तालुक्याच्या राजकरणात परिचारक गटास कट्टर विरोध हा या गटाच्या दृष्टीने स्वाभिमानाचा मुद्दा ठरला होता.विठ्ठलचे बहुतांश सभासद आणि विठ्ठल परिवाराचे सर्मथक ”विठ्ठल” आर्थिक अडचणी बाबत होणारी चर्चा,टीका बाजूला सारत आले असावेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.       

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद १८ वर्षे भूषविलेले स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये निधन झाल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची सूत्रे संचालक मंडळाने बहुमत लक्षात घेत एकमताने भगीरथ भालकेंच्या हाती सोपवले.मात्र याच काळात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा वाद विकोपाला गेला.विठ्ठल हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका गटाने बैठक घेत या निवडीस विरोध दर्शविला तर याच वेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अर्थकारणावर बोट ठेवत टीकेची झोड उठविली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर स्वर्गीय आ.भारत भालकेंना मंत्रिपद मिळणार अशी समर्थकांना खात्री वाटत होती पण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक अवस्था हि स्व.भालकेंच्या मंत्रिपदास अडसर ठरली होती अशी कार्यकर्त्यांची भावना होती आणि काही प्रमाणात ती योग्यही होती.आणि विठ्ठल कारखान्याची खस्ताहाल आर्थिक परिस्थिती सुधारण्यात अपयश आले तर नव्याने चेअरमनपदी आरूढ झालेले भगीरथ भालके यांची राजकीय वाटचाल हि काटेरीच ठरणार अशी अटकळ बांधली होती.

विधानसभेच्या २०१४ आणि २०१९  दोन्ही विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढलेले राजकीय गट भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येऊनही, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची अवस्था किती वाईट आहे हे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीवस यांच्यापासून ते ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खा.राजू शेट्टी  यांनी वारंवार विधानसभा पोटनिवडणुकीत सांगून सुद्धा भगिरथ भालकेंचा केवळ साडेतीन हजाराच्या आसपास मतांनी झालेला पराभव हा निवडणुकीतील पराभव असला तरी स्व.आमदार भारत भालके यांच्या निधनानंतरही या पंढरपुर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्याच्या राजकारणात कुणीही एकहाती वर्चस्वाचा दावा करू शकत नाही हे दाखवून देणारा ठरला आहे.

पंढरपूर तालुक्याच्या गेल्या ४० वर्षाच्या राजकीय वाटचालीचा विचार केला असता या तालुक्यात परिचारक सर्मथक विरोधात परिचारक विरोधक हे दोनच राजकीय प्रवाह प्रबळ असल्याचे दिसून येते.परिचारक यांचा पक्ष कुठला याचा फारसा विचार कधी परिचारक सर्मथक करत आले नाहीत केवळ तर परिचारक गटास शह देण्याची कुवत असलेला नेताच आपला नेता अशी प्रबळ विचारधारा तालुक्यातील परिचारक विरोधी गटाच्या समर्थकांची असल्याचे दिसून येते.बाकी तालुक्याच्या राजकरणात इतर पक्ष,गट आहेत पण त्यांचे अस्तित्व निवडणुकीच्या राजकारणात फारसे प्रभावशाली नाही असेच म्हणावे लागेल.         

अर्थात या पराकोटीच्या राजकीय संघर्षाचा फायदा हा केवळ राजकारणा पुरता शाबूत असला तरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास आर्थिक अडचणीतून बाहेर काढत लाखो रुपयांची ऊसबिले अनेक महिने थकली तरी पाठीशी ठाम राहणाऱ्या विठ्ठलच्या सभासदांना विठ्ठलला आर्थिक अडचणीतून बाहेर काढून पुन्हा वैभवाचे दिवस दाखविण्याची जबाबदारी चेअरमन या नात्याने भगीरथ भालकेंना पार पाडाविच लागेल.आणि हाच खरा भगीरथ भालकेंच्या पुढील राजकीय वाटचालीतील अडसर आहे.हा अडसर ते कौशल्याने दूर करतात कि लोकांचे फोन न उचलणे,लोकांशी संपर्क टाळणे अशा किरकोळ खुबी वापरत ते वेळ निभावून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात यावरच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरणार आहे.           

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

18 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

18 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago